Goa Beach: गोव्याच्या सुंदर किनाऱ्यांना सुशोभित ठेवणे आपल्या सर्वांचे कर्तव्य

जागतिक तापमानवाढीमुळे जगातील हिमनग वितळू लागले आहेत. त्यामुळे समुद्रही आपली मर्यादा उल्लंघू लागले आहेत. याचा परिणाम गोव्याच्या किनारपट्टीवरही होत आहे.
Goa Beach
Goa BeachDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Beach:

डॉ. संगीता साेनक

लहानपणी समुद्रकिनाऱ्यावर जाताना किती आनंद व्हायचा! तेव्हा अनेक वयस्कर लोक उन्हाळ्यात ‘खारे उदक न्हांवपाक’ समुद्राच्या पाण्यात डुंबायला जायचे. वेळेर (वाळूत) जायला आम्हा मुलांना काय मज्जा यायची! आजीबरोबर मी पण जात होते. तेथून परत येताना पाय निघायचा नाही.

मला वाटते सगळ्याच पिढ्यांतील मुलांना समुद्रकिनाऱ्याचे आकर्षण असेल. आमच्या चिरंजीवांनाही समुद्रकिनारा म्हटले की असाच अतिशय हर्ष व्हायचा. तेथील शंख-शिंपले गोळा करून वाळूत खेळण्यात स्वारी रंगून जायची. शेवटी मिळणाऱ्या मिरामारच्या भेळेचे आकर्षणही असायचे ते वेगळे.

अनेकदा मनात येते की, आपण गोंयकार किती नशीबवान आहोत. उत्तर-दक्षिण दिशेने 105 कि.मी. लांबीची आणि पूर्व-पश्चिम दिशेला 65 कि.मी. रुंदीची कोकणातील अरबी समुद्राची किनारपट्टी आपल्याला गोव्याच्या पश्चिम दिशेला लाभलेली आहे. वाऱ्यामुळे तयार होणाऱ्या व किनाऱ्यावर आदळणाऱ्या समुद्राच्या लाटा, त्यांच्यावर येणारे तरंग आणि लहरी याचा तर किनारपट्टीवर परिणाम होतोच.

पण नद्यांतून येणारा गाळ, खडकांची रचना आणि मुख्यत्वे जागतिक पातळीवर समुद्रात होणारे बदल या सगळ्यांचा आणि अशा इतर अनेक विविध घटकांचाही किनारपट्टीवर परिणाम होतो. गोव्याची किनारपट्टीही अशीच बनली आहे आणि विकसित झाली आहे. या किनारपट्टीच्या स्वाभाविक रचनेमुळे समुद्राच्या भरती-ओहोटीचा परिणाम नदीच्या वरच्या प्रवाहात 40 कि.मी.पर्यंत जाणवतो.

Goa Beach
Indian Freedom Struggle : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात गोव्याचे योगदान अभूतपूर्व

त्यामुळे गोव्याचे बहुतांश भाग भरतीच्या प्रभावाखाली आहेत. हे भरती ओहोटीचे चक्र गोव्यात दर दिवसाला दोनदा असते म्हणजे भरतीनंतर ओहोटी असे दर दिवशी दोनदा होते. आपल्या अरबी समुद्राच्या खारटपणाच्या कमाल आणि किमान सीमा मात्र खूप विस्तृत (0ते 37 पीपीटी) आहेत. पावसाळ्यात शून्य होणारा खारटपणा उन्हाळ्यात वाढतो.

तसेच समुद्राशी एकरूप होणाऱ्या नदीच्या प्रवाहातही ठिकठिकाणी क्षारतेच्या (खारेपणाच्या) श्रेणी वेगळ्या असतात. म्हणूनच वेगवेगळ्या ठिकाणी सापडणारे शंख-शिंपले तसेच वनस्पती आणि प्राणीही वेगळे असतात. गोव्याचा किनारा उत्तरेकडे तिराखोल पासून ते दक्षिणेला पोळेपर्यंत पसरलेला आहे. सलग किनारपट्टी असलेल्या आपल्या किनारपट्टीचे सहा विभाग करता येतात. तिराखोल (तेरेखोल), हरमल, मांद्रे, मोरजी हे किनारे उत्तरेच्या टोकाला आहेत.

गोव्याच्या किनाऱ्याचा अत्यंत गजबजलेला भाग म्हणजे वाघातोर, हणजूण, चापोरा, बागा, कळंगुट, कांदोळी, आणि सिकेरी हा दुसरा विभाग. पर्यटकांची झुंड येथे जास्त दिसते. याच्यापुढे तिसऱ्या विभागात मिरामार, दोना पावला, वांयगिणी, बांबोळी, शिरदोन हे किनारे येतात. चौथा भाग म्हणजे बोगमळो, वेळसांव, उतोर्डा, माजोर्डा, बेताळभाटी हा विभाग.

कोलवा, बाणावली, वार्का, केळशी, मोबोर आणि बेतूल हा पाचवा भाग तर दक्षिणेच्या टोकाला आगोन्दा, पाळोळे, तळपण, गाल्जिबाग, आणि पोळे हे किनारे येतात. पोळे किनारा गोव्याच्या किनारपट्टीच्या दक्षिणेचे टोक आहे. उत्तरेकडच्या टोकाला तिराखोल नदी अरबी समुद्राला मिळते. तिराखोल हे नाव या किनाऱ्याजवळ असलेल्या नदीच्या काठावरील (तीरावरील) खोल पाण्यावरून पडले आहे.

हरमलचा किनारा येथून जवळच आहे. ह्या दोन्ही किनाऱ्यांचा काही भाग खडकाळ तर काही भाग वालुकामय आहे. नजीकचे मांद्रे आणि अश्वे हे किनारेही निवांत वाटतात. एखाद्या एकांताच्या शोधात असलेल्या पर्यटकांना हे किनारे योग्य आहेत. मोरजीचा किनारा नीरव असला तरी ‘ऑलिव रीडली’ नावाच्या कासवाचा विणीच्या हंगामात येथे अधिवास असतो. हे कासव असुरक्षित श्रेणीत आहे.

त्यामुळे काही पर्यावरणप्रेमी ह्याच्या अंड्यांची चोरी आणि भटक्या कुत्र्यांपासून व इतर प्राण्यांपासून स्वेच्छेने रक्षण करतात. ‘ऑलिव रीडली’चा अधिवास गोव्यातील गाल्जिबाग, तळपण, आगोन्दा, मोरजी आणि अश्वे या किनाऱ्यांवर असतो. पर्यटकांची गजबजही ह्यांना विणीपासून परावृत्त करते. किनाऱ्यांवर अनेक परिसंस्था असतात.

गोव्यातील अनेक किनाऱ्यांवरील वाळूचे टेकाड (वालुकागिरी किंवा सेंड ड्यून) आम्हा मुलांना आकर्षित करायचे. या छोट्या वालुकागिरींवरून चढ-उतर करायला मजा यायची. या टेकाडांचे महत्त्व मोठेपणी समजायला लागले. या टेकाडांमुळे किनाऱ्यांचे क्षरण (इरोजन, झीज) कमी होते हे आता कळते. पण आता किनाऱ्यांवरील ही टेकाडे नष्ट होत आहेत.

Goa Beach
पूर्वी वर्ण कशावरून ठरवलं जायचं? ग्रंथांमध्ये काय संदर्भ आहेत वाचा

प्रवाल भित्ती किंवा प्रवाळ खडक (कोरल) आपल्या गोव्यात खूप कमी आहेत. ग्रँड, बॅट आणि सेंट जॉर्ज या तीन बेटांच्या नजीक गोव्यातील प्रवाळ आढळतात. विविध आकारातील हे रंगीबेरंगी प्रवाळ पाण्यात खूप सुंदर दिसतात. प्रवाळ जगातील सर्वांत जास्त उत्पादनक्षम परिसंस्था मानली जाते. प्रवाळ ही खूप संवेदनशील परिसंस्था आहे.

जागतिक तापमानवाढीमुळे सर्वत्र हे प्रवाळ नष्ट होत आहेत. प्रवाळाच्या पाठोपाठ दुसरी उत्पादनक्षम परिसंस्था म्हणजे खारफुटी. गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांलगत खारफुटी जास्त करून आढळतात. कित्येक समुद्री प्राण्यासाठी ही प्रजनन भूमी तर आहेच. आहार प्रदाताही आहेच. पण हिचे पर्यावरणीय महत्त्व फार मोठे आहे. जगात सर्वत्र खारफुटी कमी होत आहेत. आपल्या गोव्यात मात्र यांचे प्रमाण वाढले आहे.

Goa Beach
Environment: तुज सजीव म्हणो की, निर्जीव रे...

गोव्याची खास परिसंस्था म्हणजे खाजन. आपल्या गोव्याचे ‘दायज’. सामान्य यूग पूर्व जवळ-जवळ 1500 वर्षे अस्तित्वात असलेली ही गोव्याची सासाय. आगर, खाजन, मिठागर सगळेच आपल्या परिचयाचे. पण अजून यांचे महत्त्व आपल्याला न कळलेले. किनारी भागात मासेमारीवरही दबाव येतो. आमच्या लहानपणी स्थानिक लोक आणि जाळ्यात (रापणीत) मासे पकडणारे रांपणकार यांनी गोव्याचे किनारे भरलेले असायचे.

पण आजकाल गोव्याबाहेरून येणारे पर्यटक, ‘बीच’वर माल विकणारे विक्रेते, झोपडीवजा असलेली उपहारगृहे किंवा शॅक्स, जलक्रीडा करणारे लोक आणि त्यांच्यासाठी केलेल्या वेगवेगळ्या सोयी यांनी गोव्याचे किनारे गजबजलेले असतात.

काळानुसार गोव्याचे ते समुद्रकिनारे आता बदललेत. किनारी प्रदेशांवर बदलाचा तणाव जरा जास्त असतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे. केवळ आपल्या गोव्यातच नाही तर जगात सर्वत्र. कारण जगातील जवळ-जवळ निम्मी लोकसंख्या किनारी भागात राहते आणि हे प्रमाण वाढत जाण्याची शक्यता जास्त आहे.

किनारी परिसंस्थांची उत्पादनक्षमता जास्त असते. शिवाय पाण्याशी असलेल्या सान्निध्यामुळे येथे अनेक उपक्रमांना वाव मिळतो. पण वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे किनारी परिसरात झपाट्याने होणारा विकास याचा परिणाम या किनारी परिसंस्थांवर होतो.

Goa Beach
Leopard: बांबोळीत बिबट्या येण्याचे कारण काय?

कचऱ्याची व प्लास्टिकची समस्या किनारी भागांवर अधिक तीव्रतेने जाणवते. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची गरज वाढते. अनेक ठिकाणी खोदलेल्या विहिरींमुळे भूजलक्षारता (पाण्याचा खारेपणा) वाढण्याची शक्यता असते.

पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा वाढल्यामुळे किनारी भागातील जमिनीची गरज वाढते. किनाऱ्यांवर असलेल्या खारफुटींवर याचा गैरपरिणाम होतो. पर्यटकांसाठी माशांची मागणी वाढल्यामुळे स्थानिक लोकांना मासे महागलेल्या दरात मिळतात.

मासेमारी अधिक प्रखर झाल्यामुळे याचा परिणाम उत्पादनक्षमतेवर होतो. त्यामुळे अनेक प्रकारचे मासे आता दिसत नाहीत तर इतर कित्येक माशांची संख्या आणि आकार कमी झालेले दिसतात.

आपल्या किनाऱ्यांच्या वहनक्षमतेचे (कॅरींग कॅपेसिटीचे) मोजमाप करून त्या अनुषंगाने पर्यटकांच्या संख्येवर प्रतिबंध घालणे महत्त्वाचे आहे.

जागतिक तापमानवाढीमुळे जगातील हिमनग वितळू लागले आहेत. त्यामुळे समुद्रही आपली मर्यादा उल्लंघू लागले आहेत. याचा परिणाम गोव्याच्या किनारपट्टीवरही होत आहे. गोव्याच्या सुंदर किनाऱ्यांना असेच सुंदर, सुशोभित ठेवणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com