Adolescent Counseling किशोरवयीन मुलांमध्ये विचार करण्याची तसेच आकलनाची बुद्धी वाढली असली तरी भावनात्मक पातळीवर ती परिपूर्ण नसतात. त्यामुळे त्यांच्यात विवेकबुद्धीचा अभाव जाणवतो.
यासाठी पालक, शिक्षक आणि मार्गदर्शकांनी वेळोवेळी त्यांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे, असे मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रियंका सहस्रभोजनी यांनी व्यक्त केले.
डिचोली येथे घडलेल्या घटनेने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजली आहे. यावर मुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिक्षण खात्याला चौकशीचे आदेश दिले आहेत.
या घटनेच्या चौकशीचा तपशीलवार अहवाल येईलच. मात्र या घटनेकडे एकूणच शिक्षण क्षेत्राशी संबंधितांनी गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. याबाबत बोलताना डॉ. सहस्रभोजनी म्हणाल्या की, किशोरवयीन मुलांकडून विवेकबुद्धी कमी वापरली जाते.
कुठे काही पाहिले असेल किंवा अनुभवले असेल ते प्रत्यक्षात करून पाहण्याची तीव्र इच्छा असते. मात्र काय करावे आणि काय करू नये, वा एखाद्या घटनेचा एकूण परिणाम काय होईल? हे पाहण्याच्या दृष्टिकोनाचा अभाव असतो.
याला अनेक बाबी कारणीभूत आहेत. यासाठी पालक, शिक्षकांनी मुलांचे वेळोवेळी समुपदेशन करणे गरजेचे आहे
मुलांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. त्यामुळे स्क्रीनवर घडणाऱ्या थट्टा-मस्करीच्या गोष्टी करून पाहण्याचा कलही वाढत आहे. आपण जगावे कसे हे वारंवार समजावून सांगणे गरजेचे आहे.
आपले वर्तन आणि वागणूक कशी असावी याचे ज्ञान या किशोरवयीन मुलांना देणे गरजेचे आहे. यासाठी चांगले वाचन, संस्कार महत्त्वाचे असून शिक्षक-पालकांनी अधिक सजग रहायला हवे.
- डॉ. पांडुरंग नाडकर्णी, शिक्षणतज्ज्ञ
डिचोलीतील घटनेमागील हेतू समजावून घेणे महत्त्वाचे आहे. एखादी बाब गंमत म्हणून केली असू शकते. मात्र या मुलांना गंमतीचे परिणाम माहीत नसतात.
त्यामुळे त्यांना मार्गदर्शनाची गरज असते. अलीकडच्या काळात मुलांमधील चंचलता वाढीस लागली आहे. त्यास वाढते तंत्रज्ञानही कारणीभूत असू शकते. म्हणून काही शाळांमध्ये मोबाईलवर बंदी घालण्यात आली आहे.
- कालिदास मराठे, शिक्षणतज्ज्ञ
बऱ्याच वेळेला मुलांची संगत त्यांना योग्य-अयोग्य संस्कारांकडे नेते. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांच्या मित्रसंगतीवर लक्ष देणे गरजेचे आहे.
अलीकडच्या काळात तंत्रज्ञानाच्या बदलाचा वेग झपाट्याने वाढला आहे. त्याचा कळत-नकळत या मुलांच्या भावविश्वावर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे त्यांना आपुलकीने विश्वासात घेऊन समजून घेणे गरजेचे आहे.
- डॉ. प्रियंका सहस्रभोजनी, मानसोपचारतज्ज्ञ
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.