रिलिजन म्हणजे धर्म नव्हे

धर्म म्हणून श्रद्धेने झाडांची पूजा करणे याची आम्ही टवाळी केली

Religion
ReligionDainik Gomantak

प्रसन्न शिवराम बर्वे

Religion is not religion गेल्या लेखात आपण सामंजस्य चतुष्टयातील चारही मूल्यांमध्ये सामंजस्य राखणे म्हणजे धर्म हे पाहिले. पिंपळ, वड या प्रकारची देशी वृक्षांचे, झाडांचे संवर्धन व नवीन लागवड बंद केल्यामुळे केवळ पाण्याची पातळी कमी झाली असे नव्हे तर संपूर्ण निसर्गचक्र हलले. पिंपळ कार्बन-डायऑक्साइड 100% शोषून घेतो, तर वड 80% आणि नीम 75% शोषतो.

शेकडो वर्षे जुनी झाडे रस्ता रुंदीकरणासाठी तोडली जातात व त्याजागी विदेशी झाडे लावली जातात. या झाडांवर देशी पक्षी बसत नाहीत. परिणामी अनेक प्रजाति नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

धर्म म्हणून श्रद्धेने झाडांची पूजा करणे याची आम्ही टवाळी केली. याला महत्त्वाचे व मुद्दाम पसरवलेले थोतांड, ‘रिलिजन म्हणजे धर्म’ हे होते. याचा विचार आपण पुरुषार्थ चतुष्टयातील पहिल्या मूल्यात करणार आहोत.

माणसाने आपल्या आयुष्यात कसे वागावे, याची चौकट ठरवणारे हे मूल्य चतुष्टय आहे. आपल्या जीवनाचे ध्येय काय, हेच अनेकांना माहीत नसते. त्यामुळे, येईल तसे दिवस घालवायचे हे सूत्र अवलंबले जाते. आपल्याकडे मोक्ष हेच जीवनाचे ध्येय सांगितले आहे. म्हणूनच या पुरुषार्थातील परम अर्थ असलेला मोक्ष हा परमार्थ आहे.

मोक्ष म्हणजे मुक्तता, सुटका असा अर्थ नाही. स्वर्गाची किंवा नरकाची प्राप्ती नाही. ढोबळमानाने सांगायचे झाल्यास, मिळालेल्या आयुष्यात स्वत:चा विकास करत स्वत:तल्या ऊर्जेला निसर्गातील ऊर्जेशी जोडण्याचा प्रवास म्हणजे मोक्ष. त्यासाठी आधीच्या धर्म, अर्थ आणि काम तीन पायऱ्या पार कराव्या लागतात.

धर्म म्हणजे रिलिजन-पंथ, अर्थ म्हणजे वित्त आणि काम म्हणजे सेक्स, असे विकृत स्वरूप या तीनही पायऱ्यांना देण्यात आले आहे. जगभरातील कुठल्याही माणसाला धर्म, अर्थ आणि काम या पायऱ्या चुकलेल्या नाहीत.

आपला भारतीय समाज अवनत होत होत या पहिल्या पायरीवरही धड पोहोचू शकत नाही, अशी स्थिती आली आहे. त्यामुळे, संपूर्ण ‘धर्म’ या संकल्पनेतील पुरुषार्थाच्या चौकटीतील धर्म तरी समजून घेणे फार आवश्यक आहे.

इथे धर्म म्हणजे जगण्याची पद्धत, करायचे कर्तव्य या अर्थाने धर्म हा शब्द येतो. पुत्रधर्म, पतीधर्म, पत्नीधर्म वगैरे अनेक पद्धतींनी आपण त्याकडे पाहू शकतो. त्यासाठी ‘मी कोण आहे?’ या प्रश्‍नाचे उत्तर शोधणे, मिळवणे आवश्यक आहे. माझ्यामध्ये उपजत काय गुण आहेत, त्याप्रमाणे माझे कर्म असणे हे माझे कर्तव्य आहे. तो माझा धर्म आहे.

पिता म्हणून माझी जी जी कर्तव्ये आहेत, त्यांचे निष्ठेने पालन करणे म्हणजे धर्म आणि त्यांचे पालन न करणे हा अधर्म आहे. पिता आहे आणि मुलांच्याप्रति असलेली कर्तव्ये आपण पार पाडत नसू तर तो अधर्मच आहे. आपण लोकनियुक्त प्रतिनिधी असू तर लोकांच्याप्रति असलेली कर्तव्ये पार पाडणे म्हणजे धर्म आणि त्याविरुद्ध वागणे म्हणजे अधर्म.

इथे लक्षात घेणे आवश्यक आहे की, ही एका व्यक्तीशी संबंधित बाब आहे, समूहाशी संबंधित नाही. केवळ धर्मपालन केले म्हणजे संपले का, तर नाही. धर्माने अर्थ, धर्माने काम असे आचरण करणे आवश्यक व अपेक्षित आहे. असे केल्यास मोक्षासाठी वेगळे काही करावेच लागत नाही. पण आपण हे करतो का, याचा विचार प्रत्येकाने करावा.

धर्माची संकल्पना पाश्‍चिमात्यांनी त्यांच्या पंथ, संप्रदाय, मत, समाज या आकलनातून मांडली. त्याचीच री भारतीय विद्वानांनी ओढली. एक प्रेषित, एक प्रवर्तक, एक उपासना, एक पुस्तक, एक देवता, एक विचारधारा आणि त्या विचारधारेनुरूप जगण्याचे, वागण्याचे नियम म्हणजे पंथ किंवा रिलिजन.

भारतीय भूमीत विविध विचारधारेचे पंथ उदयास आले. शैव, शाक्त, गाणपत्य, वैष्णव, बौद्ध, जैन असे अनेक पंथ व उपपंथ. तसेच भारताबाहेर अब्राहमिक पंथ उदयास आला. त्याचेच पुढे ज्यू, ख्रिश्‍चन आणि इस्लाम असा विस्तार झाला.

हे एकाच विचारधारेचे, पुस्तकाचे विस्तृत स्वरूप असलेले पंथ आहेत. उपासनेचे, विचारांचे वेगवेगळे रस्ते धर्माच्या मार्गाने एकाच शुद्ध चैतन्यास येऊन मिळतात(देव नव्हे). पंथ भिन्न व क्वचितप्रसंगी एकमेकांच्या विरोधी असतात. त्यामुळे ‘सगळे पंथ सारखे’ हा अत्यंत घातक व चुकीचा विचार आहे.


Religion
Hollywood Actor Goa Visit: हैदराबाद ते गोवा; हॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याला फिरायचा आहे साऊथ इंडिया

विषय समजण्यासाठी याचाच थोडा उदाहरणासह विस्तार करू. आपल्याला पणजीला जायचे आहे, त्यासाठी कुठला रस्ता योग्य ठरेल हे आपण कुठे आहोत, आपल्याजवळ जाण्याचे कुठले साधन आहे, त्यावर अवलंबून आहे. मडगावला असलेल्या माणसाने, ‘मडगावतून पणजीला जायचा रस्ताच योग्य व चांगला आहे’, असे म्हणत इतर सर्व रस्ते उखडून टाकले तर काय अनवस्था होईल, तीच आज जगाची अवस्था इस्लाम व ख्रिश्‍चन पंथाने केली आहे.

आपला राजा कुणीही असो, कुठल्याही पंथाचा असो, तो राजधर्मानेच वागला पाहिजे, हे अपेक्षित आहे. ख्रिश्‍चन व इस्लाम पंथाचे राजा झाल्यामुळे जगभरात हे पंथ विस्तारले, सेवा व शांती यामुळे नव्हे. पाश्‍चिमात्य व्यापारी जगभरात गेले तेव्हा त्यांच्यासोबत पंथोपदेशकही असत. गोव्यातही ख्रिश्‍चन पंथ कायदे करून सत्तेच्या बळावर लादला गेला.

पंथ व धर्म एकच असल्याची गल्लत केल्यामुळे आपण त्याला ‘धर्मांतरण’, असे संबोधतो. वास्तविक, ते ख्रिस्तीकरण व इस्लामीकरण आहे. जगाच्या इतिहासात झालेले ख्रिस्तीकरण व इस्लामीकरण स्थानिक निसर्गपूजक संस्कृती बळजबरीने संपवूनच झालेले आहे, अन्य मार्गाने नाही. पुस्तके, माणसे जाळून प्राचीन संस्कृती नष्ट करण्यात आल्या.


Religion
G-20 प्रतिनिधींना घडणार ‘गोवा सफर’

हाच पांथिक संस्कृती-विस्तारवाद लक्षात न घेतल्यामुळे व पंथाला धर्म समजल्यामुळे भारताला फाळणी व काश्मीर समस्येचे आकलनच झाले नाही. उलट ‘सेक्युलरिजम’ किंवा ‘धर्मनिरपेक्षता(हे चुकीचे भाषांतर आहे)’ नावाचे तिरपागडे राजकीय थोतांड जन्मास आले. सेक्युलरिजम म्हणजे इहवाद. सगळ्या पंथांच्या नाकदुऱ्या काढायचे काम भारत करत आहे.

‘सगळे पंथ सारखे नाहीत’, ‘सगळे पंथ एकच गोष्ट सांगत नाहीत’ या दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. भिन्न प्रकृतीच्या, भिन्न विचारसरणीच्या, आक्रमक विस्तारवादी असलेया पंथांना एकत्र ठेवणारा राजधर्मच भारताने नाकारला.

निर्गुण निराकार ब्रह्म मानणारे, सगुण साकार ब्रह्म मानणारे, एकेश्‍वरवादी, बहुइश्‍वरवादी, निरीश्‍वरवादी, शून्यवादी आदी अनेक पंथ भारतात फार पूर्वीपासून होते. पण, ते राजसत्तेपासून दूर होते. संरक्षण वगळता इतर कुठल्याही गोष्टीसाठी राजकीय भूमिकेवर साधा गावही अवलंबून नव्हता. राजा कुणीही असेना, त्याला फारसे महत्त्व नव्हते.

राजकीयदृष्ट्या एकछत्री अंमल म्हणजे देश ही मर्यादित व चुकीची संकल्पना आहे. छोट्या छोट्या प्रदेशांसाठी राजसत्ता वेगवेगळी असली तरी संपूर्ण भारत एकच देश म्हणून ओळखला जाण्याची खूण म्हणजे ‘धर्म’. आपण ही ओळखच गमावून बसलोय. इतकी की, धर्म ही सर्वांत त्याज्य गोष्ट वाटू लागली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com