Election: 'कांटो की टक्कर' विरोधकांची अग्निपरीक्षा घेणारे वर्ष

Election: आगामी वर्षांत दहा राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आहे, त्यात भाजप आणि विरोधी पक्षांचा कस लागणार आहे.
Election
ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

BJP: दिल्ली महापालिकेसोबतच हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभांचे अपेक्षित निकाल लागले. मतदानानंतर मांडण्यात आलेले जय-पराजयाचे अंदाज थोड्याफार फरकाने खरे ठरले, असेच म्हणावे लागेल. हिमाचल प्रदेशमध्ये ‘कांटो की टक्कर’चा अंदाज होता. असे असले तरीही भाजपच निवडणूक जिंकेल याबाबत भाकीत मांडणाऱ्या राजकीय विश्‍लेषकांची घोर निराशा झाली. याची सुरुवात दिल्लीच्या निकालाने झाली.

महापालिकेत आम आदमी पक्षाचा झाडू चालणे हे भाजपच्या चांगलेच जिव्हारी लागले. गुजरात निवडणुकीने तर आधीचे संपूर्ण रेकॉर्ड मोडले. 2002 पासून विधानसभेत भाजपचा सतत घसरता आलेख आणि 2017 मध्ये उच्चतम दोन अंकावर येऊन ठेपलेले पाहून या पक्षाला 27 वर्षांनंतर गुजरातमध्ये पुन्हा संधी नाही, याबाबत विरोधक आडाखे मांडत बसले.

परंतु ‘गणपत वाण्या’चे स्वप्न पाहणाऱ्यांना भाजप नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरात झटका दिला. गुजरातेतील अभूतपूर्व यशाचे एकमेव मानकरी म्हणून मोदींचा गौरव झाला. दिल्ली आणि हिमाचल प्रदेशातील पराजयाचे खापर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या माथी फुटले. गुजरातच्या निकालानंतर 2024 मध्ये मोदींचा विजयरथ अडविणारा एकही विरोधक उरला नसल्याची भविष्यवाणी मोदीप्रिय राजकीय चाणक्यांनी केली आहे.

जिद्द ठेवली की अवघड कामही सोपे होते हे गुजरातच्या निकालाने दिसून आले. भाजपच्या या जिद्दीला सलाम करायलाच पाहिजे! 2017मध्ये भाजप काठावर पास झाला. तेव्हा काँग्रेसची पकड बऱ्यापैकी दिसली. घसरत्या निकालानंतर लगेच मोदी-शहांनी गुजरातची रणनीति आखली. दीडशे जागा जिंकण्याचा संकल्प केला.

Election
Book: 'पोलादी' कडवट आलेखाचा देदीप्यमान विजय

जातीय समीकरणांची गोळाबेरीज केली. विरोधी पक्षातील दमदार नेत्यांना भाजपमध्ये खेचले. तरुण पाटीदार नेता हार्दिक पटेलला काँग्रेसमधून भाजपमध्ये आणणे हा पक्षाच्या रणनीतिचाच भाग होता. गेल्या 27 वर्षांत या राज्यात समस्या उरल्या नव्हत्या का? गुजरातमध्ये महागाई, बेरोजगारीचे प्रश्‍न नव्हते का? मोरबी पूल अपघातात 135 लोकांचा मृत्यू झाला.

पेपरफुटीचे प्रकरण गाजले. अंमली पदार्थांचे साठे पकडण्यात आले. अवैध दारूविक्रीमुळे राज्य गाजले. अनेकदा सरकारला बदनामीचा सामना करावा लागला. दरडोई उत्पन्नात गुजरात अकराव्या, मानवी निर्देशांकात एकविसाव्या क्रमांकावर आहे.

तरीही भाजप जिंकतो. तुम्ही उमेदवार पाहू नका आमच्याकडे पाहा, असे म्हणण्याची वेळ मोदी-शहांवर येते. मतदारांनीही शेवटी ‘आपला माणूस’ म्हणून उत्तम प्रतिसाद दिला. यामुळे भाजपने स्वत:चेच सगळे रेकॉर्ड तोडले. भाजपने जे केले ते काँग्रेसला साधले नाही.

‘आप’चा फटका काँग्रेसला

2017 मध्ये काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी संपूर्ण गुजरात पालथा घातला. त्यांचा एकच ध्यास होता, तो म्हणजे गुजरात जिंकण्याचा! तेव्हा कुठे कॉंग्रेसने 77 जागा जिंकल्या. आताचे चित्र उलट आहे. कोरोनाने सातव यांचे निधन झाले आणि गुजरातेत काँग्रेस मृतावस्थेत गेली. कॉंग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी गुजरातकडे दुर्लक्ष केले.

राहुल गांधी वैराग्याच्या भूमिकेत दिसत होते. कॉंग्रेसच्या निष्क्रियतेचा पुरेपूर लाभ भाजपला मिळाला. केजरीवालांच्या ‘आप’ने गुजरातमध्ये रंगत आणली. ‘बारा आने का माल, चार आने में’ ही मतदारांना आकर्षित करणारी ‘आप’ची योजना सुपरडुपर हिट ठरली. आर्थिकदृष्ट्या दुबळा पक्ष असतांनाही केजरीवालांच्या सभांना गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी कशी होती हासुद्धा संशोधनाचा विषय आहे.

या रॅली, सभांसाठी रसद कोण पुरवत असावे? केजरीवालांनी गुजरात जिंकायचा बिगुल फुंकला तेव्हाच इथले काँग्रेसचे भवितव्य कसे असणार, याची चाहूल लागली होती. निकालही तसाच लागला. काँग्रेसच्या जागा साठने घटल्या. इकडे भाजपची संकल्पपूर्ती झाली ती केजरीवालांच्या एन्ट्रीमुळेच. भाजपने 99 वरून 156 जागा खिशात घालणे साधी बाब नाही. अन्य पक्षांनी यातून धडे घेतले पाहिजेत.

हिमाचलमध्ये काँग्रेस आणि भाजप आमने-सामने होते. त्यांच्यात थेट लढत असल्याने निकाल डोळ्यापुढे आहेत. ‘आप’चे मंत्री सत्येंद्र जैन तुरुंगात आहेत. ते हिमाचलचे प्रभारी होते. ‘आप’कडे हिमाचल सांभाळायला मनुष्यबळ नसल्याने त्यांना या राज्यात दमदारपणे लक्ष घालता आले नाही. केजरीवाल झिरोवर आऊट झाले.

काँग्रसने 40 जागा जिंकल्या असल्या तरी भाजपपेक्षा केवळ 0.9 टक्के मतेच जास्त मिळाली. जैन आत असल्याचा परिणाम भाजपला भोगावा लागला. गुजरातमध्ये केजरीवालांचा पक्ष नसता तर भाजपच्या विजयाचे आकडे वेगळे असते. द्वारका, धोराजी, जसदान, कपराडा अशा कितीतरी ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारास ‘आप’मुळे पराजय पत्करावा लागला. 2017 मधील राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका यावेळी ‘आप’ने पार पाडली.

Election
FIFA World Cup 2022: 'धक्कादायक गोल' विश्वकरंडकसारख्या मेजवानीच्या सर्वच पंगती ठरल्याप्रमाणे होतात असे नव्हे!

विरोधकाला कशी मदत करायची हे या पक्षांकडून शिकावे. गुजरातच्या निवडणुकीत 128 उमेदवारांची अनामत जप्त होऊनही केजरीवाल एकदम खुश आहेत. त्यांच्या पक्षाने 41 लाख (13टक्के) मते घेतली. पाच उमेदवारांचा विजय झाला, त्यामुळे ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. यासाठी त्यांनी गुजरातच्या मतदारांचे आभार मानले.

जगण्याचे प्रश्‍न गौण

‘मोदी हैं तो मुमकीन हैं’ असे म्हटले जाते. त्याचवेळी हिमाचल प्रदेश आणि दिल्लीतील पराभवासोबत पोटनिवडणुकांमध्ये भाजप चीत झाले याकडे दुर्लक्ष करायचे का? गुजरातमध्ये मोदींचा करिष्मा दिसला, असे चित्र जरी देशापुढे उभे केले जात असले आणि त्याचा मोठ्या प्रमाणात जल्लोष होत असला तरी अन्य ठिकाणी भाजपला केवळ पराजयचाच सामना करावा लागला.

तेव्हा मोदींचा करिष्मा कुठे गेला? हा प्रश्‍न निर्माण होतो. जे. पी. नड्डा हिमाचल प्रदेशातील मोठे नेते आहेत. मोदींसह त्यांच्याही सभा, रॅली झाल्या. दिल्लीत नड्डा, नितीन गडकरींपासून सगळेच केंद्रीय मंत्री चौकाचौकात सभा घेत होते. रिंगणातील उमेदवाराला नगरसेवकपदी निवडून देण्यासाठी हात जोडत होते. तरीही भाजप पराभूत झाला.

विधानसभेच्या पाच आणि लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली. त्यापैकी भाजपला विधानसभेची केवळ एकच जागा जिंकता आली. मात्र, या पराभवाची चर्चा अचानक बंद कशी होते? हाही भाजपच्या रणनीतिचाच भाग आहे. आता 2023 वर्ष सुरू होत आहे. या वर्षात मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थानसह दहा राज्यांच्या विधानसभा निवडणुका होतील.

केवळ गुजरातच्या निकालाने 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी देश जिंकतील, असे भाकित करतांना या राज्यातही करिष्मा दाखवावा लागेल. दुसरीकडे भाजपशी सामना करताना सर्वच विरोधी पक्षांसाठी अग्निपथ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणतात त्या प्रमाणे, प्रत्येक प्रादेशिक पक्षाला त्यांच्या राज्यात दमदारपणे लढावे लागणार आहे.

भ्रष्टाचाराच्या संशयावरून सरकारी देखरेख संस्थांची केवळ विरोधकांवर पाळत असल्याचे दिसून येते. आता त्याची तीव्रता वाढेल. भाजपकडे महागाई, बेरोजगारी इत्यादी विषय झाकोळण्यासाठी राम मंदिर, हिंदुत्व असे अनेक प्रभावी विषय आहेत. अशावेळी मतदार यंत्रासमोर उभे राहताना त्यांच्यापुढे दैनंदिन जगण्याचे प्रश्‍न गौण ठरतात. विरोधकांना या अग्निपथात मतदाराला जागे करण्याचे कौशल्य साधावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com