Book: 'पोलादी' कडवट आलेखाचा देदीप्यमान विजय

आपल्या गावी पत-मान- पैसा प्रसिद्धी खेचून आणणाऱ्या अनुजा तेंडोलकर यांचे आत्मचरित्र खूपच प्रेरणादायक आहे.
Book Poladi
Book PoladiDainik Gomantak
Published on
Updated on

संघर्ष व झुंज, आयुष्यात कोणाला चुकलीये ? प्रत्येकजण आपापल्या परीने, संकटांशी दोन हात करतात, परिस्थितीला तोंड देत राहतात. पण, जगात काही जण असे असतात की जे आधी गुमान परिस्थितीला शरण जातात व मग संधी मिळताच सर्व काही झुगारून, दंड थोपटून, दोन हात करण्याकरता उभे राहतात. मग, नुसतेच परिस्थितीला लोळवत नाहीत तर तिच्यावर स्वार होतात, जिंकतात, देदीप्यमान विजय मिळवतात.

अशीच, संघर्षाची एक विलक्षण गाथा आपल्याला वाचायला मिळते, अनुजा तेंडोलकर लिखित-‘पोलादी’या आत्मचरित्रात. डिंपल प्रकाशनाने आपल्या कीर्तीला साजेशा रुबाबात प्रकाशित केलेले. सुप्रसिद्ध नाटककार, श्री. गंगाराम गवाणकर त्यांच्या कौतुकभरल्या, ओघवत्या शैलीतल्या, प्रस्तावनेसह!

तुमच्या आमच्यासारख्याच सर्वसाधारण कुटुंबामध्ये जन्मलेल्या या कन्येचा हा चढता व केवळ चढत जाणारा आलेख! मुंबई ते आशिया खंडात, पॉवर लिफ्टिंगमध्ये क्रमांक एकसह अनेक सुवर्णपदकांची मानकरी.

रंगेल व दारुड्या नवऱ्याच्या संसारातून, सासू-नणंदा-जावांच्या जाच व छळवादातून, फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेत, शेकडो आंबे देणाऱ्या बागा, डोंगर, मळे व शेतीची मालकीण, काजूच्या बागा व दणदणीत चालणाऱ्या दुकानांची व रिसॉर्टची मालकीण, किनाऱ्यावरच्या जागेची मालकीण.

असा हा चमचमता, लखलखता आलेख आहे तिच्या कर्तृत्वाचा, ही कोट्यवधींची मालमत्ता स्वतः कमावलेली! हे यशाचे शिखर म्हणजे एकटीचे प्रयत्न! ना कुणाची साथ, ना कुणाची प्रेरणा पण म्हणतात ना की कोणीही, कोणाचेही नशीब हिरावून घेऊ शकत नाही; त्याची प्रचिती, ही कहाणी वाचताना,पदोपदी येते.

अनुजा तेंडोलकरांचे पूर्वायुष्य म्हणजे फक्त काटेकुटे व दगड धोंड्यांनी भरलेले! सख्या ‘आईच्या’ लांच्छनास्पद शिव्या म्हणजे अन्न व तिचा मार, अपमान, कष्ट म्हणजे पाणी. या अवस्थेत बालपण गेले. जोडीला दिवसभराचे काम असायचेच. या सर्व अडचणींवर मात करून, अनुजा शिकायचा प्रयत्न करीत होत्या. पण मुळात आईच, शिक्षणाच्या विरोधात होती.

Book Poladi
Will Power: ...हे आपल्याला शक्य आहे; गरज आहे ती केवळ प्रबळ इच्छाशक्तीची

इतर अनेक, जुन्या पिढीतल्या खेडवळ स्त्रियांप्रमाणे तिचे याबाबत विचार होते की, शेवटी चूल आणि मूलच करावे लागणार. जर स्त्रीला चूल आणि मूलच करावे लागणार असेल तर शिक्षणाकरता जीव कशाला पाखडायचा? तरीही आईच्या अंगी असलेले भूतदया, धाडसीपणा, रणरागिणीची धाडसी वृत्ती अशा गुणांचीही त्या पारख करतात व तेच गुण आपल्यात आल्यामुळे जीवनाला धीटपणे सामोरे जाऊ शकलो हेही कबूल करतात.

आईने लहान वयातच अनुजाचे लग्न लावून दिले. नवरा नेमका दारुडा व अनेक स्त्रियांना पदरी बाळगणारा निघाला. दुकान होते पण, कामगारांच्या जिवावर चालणारे! घरात अंधार, घाण, जोडीला सासू नणंद व जावांचा जाच. पण तशातही अनुजा संसार रेटत राहिल्या. रोजच्या जेवणात तोंडी लावायला, दिवसभर मिळणाऱ्या असंख्य अश्लील शिव्या होत्याच.

पुढील शिक्षणाला घरात नकार मिळाल्यामुळे, त्यांनी वयाच्या चाळिशीत खडतर तपश्चर्या करून ’संगीत विशारद’ ही पदवी मिळवली. मुले थोडी मोठी होताच दुकान चालवू लागल्या. त्यातूनच घरातला अव्यवहारीपणा, इतरांनी चालवलेली लूट, कर्ज, सर्व समजून आले. आता त्यांनी कंबर कसली स्कूटर शिकल्या.

पैसे जमवून सगळ्यांकरता घर बांधले, नणंदांची लग्न होताच त्या वेगळ्या झाल्या. पण आता नवऱ्याचे (अशोकचे) धंदे आणी वाढले. हळूहळू तारकर्लीला हॉटेल काढले व स्वतंत्र प्लॉटस् विकत घेऊन बागायती सुरू केली. नोटाबंदीमुळे मात्र हजारोंची उधारी परत मिळाली अशोक गेल्यानंतर. 2000 सालानंतर झालेल्या कर्जदार व ठेवीदार यांच्या सेटलमेंटमध्ये त्या खऱ्या अर्थाने सधन झाल्या.

मग गॅस एजन्सी, दुकानांचे गाळे, जमीन, हॉटेल, बागा, कलम, काजू, डोंगर- असा चढत्या भाजणीने विकास होत गेला. लहानपणापासून आडव्या हाडापेराच्या धिप्पाड चणीच्या स्पोर्टस् वुमन होत्या. चित्रकलेची आवड होती. नवऱ्याचे काहीच नको म्हणून तेंडोलीच्या प्रॉपर्टीचे, सर्व घरच्यांना वाटे करून दिले.

लॉकडाऊनच्या तीन वर्षांत तीनशे चित्रे काढून रंगवली. शेकडोंनी कोर्ट केसेस लढवल्या. प्रचंड मनस्ताप सहन केले. नवरा गेल्यावर, जास्त वेळ दुकानात बसल्याने वजन प्रचंड वाढले. गुडघेदुखी सुरू झाली. बॉडी शेपलेस झाली, म्हणून जिम जॉइन. तिथून आयुष्यातले एक नवेच पर्व सुरू झाले.

Book Poladi
PM Narendra Modi: विजयाचे गुजरात मॉडेल अन् मोदींचा डंका!

पॉवर लिफ्टिंग सुरू केले. ’बॉडीला आयडेंटीटी’ देण्याच्या, गुरुजनांच्या सल्ल्यावर, अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. ‘खेळासाठी खेळ’ असे न करता शास्त्रोक्त शिक्षण घेतले. करता करता इंटरनॅशनल पॉवर लिफ्टिंगच्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन तीनतीन गोल्ड मेडल जिंकली.

अनेक स्पर्धांमध्ये ट्रॉफी मेडल जिंकत त्या इंडियाची मास्टर टू ची स्ट्रॉगेस्ट वूमन झाल्या. आता परदेश दौरे सुरू झाले. डायरी लिहायची सवय होतीच, त्या आधारे ब्लॉग्ज व आत्मकथन लिहिणे सुरू झाले. अनुजाताई सेलिब्रिटीच्या पदवीला पोहोचल्याच.

त्यांच्या मते, गावातून शहरात जाऊन सेलिब्रिटी होणे सोपे असते. पण शहरातून गावात येऊन सेलिब्रिटी होणे अवघड असते. अशा परिस्थितीत बाईने हार मानली नाही, जीवबीव दिला नाही. स्वप्न खरी करून दाखवली. अनेक रूपात झळकून यशस्वी झालेली, आपल्या गावी पत-मान- पैसा प्रसिद्धी - खेचून आणणारी ही ‘धाकड गर्ल’ - पर्यटन व्यवसायातही अग्रेसर आहे.

संगीत-चित्रकला- बागाईत व्यायाम शेती प्रत्येक ठिकाणी शास्त्रोक्त शिकण्याची चिकाटी दाखवली. मराठीमध्ये खूप चांगल्या चांगल्या आत्म-चरित्रांची परंपरा आहे. लक्ष्मीबाई टिळकांपासून उर्मिला पवारांपर्यंतच्या सर्व कर्तृत्ववान महिलांच्या रांगेत दिमाखाने झळकेल अशा मूल्याच्या या आत्मचरित्राला मानाचे स्थान नक्कीच मिळेल.

अनेक महिलांना यातून प्रेरणा मिळेल. अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची ही ओळख, वाचकांच्या घरात घर करून असेल. कुठेही नवखेपणाची जाणीव करून देता, अत्यंत सरळ साध्या शैलीत लिहिलेले हे आत्मचरित्र प्रकाशित केल्याबद्दल प्रकाशकांचेही अभिनंदन.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com