FIFA World Cup 2022: 'धक्कादायक गोल' विश्वकरंडकसारख्या मेजवानीच्या सर्वच पंगती ठरल्याप्रमाणे होतात असे नव्हे!

FIFA World Cup 2022: एखाद्या पंगतीत मीठाचा खडा पडतो, तर कोठेतरी गुलाबजामचा ‘गोल’ विस्कटलेला असतो... कतारमधील विश्वकरंडक फुटबॉलची ही पंगत त्याच धर्तीवरची.
FIFA World Cup 2022 |
FIFA World Cup 2022 | Dainik Gomantak
Published on
Updated on

FIFA World Cup 2022: कतारमधील विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या साग्रसंगीत मेजवानीची चव जिभेवर रेंगाळत असताना मात्र कोठेतरी एक गोडवा हिरावल्यासारखा वाटतो आहे. मुळात विश्वकरंडकासारख्या मेजवानीच्या सर्वच पंगती ठरल्याप्रमाणे होतात असे नाही. एखाद्या पंगतीत मीठाचा खडा पडतो, तर कोठेतरी गुलाबजामचा ‘गोल’ विस्कटलेला असतो... कतारमधील विश्वकरंडक फुटबॉलची ही पंगत त्याच धर्तीवरची.

गुणतक्त्यात चढउतार करणारी गटवार साखळी आता संपली असून, उपांत्यपूर्व फेरीतील जबरदस्त संघर्ष आता बघायला मिळणार आहे. म्हटलं तर लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, हॅरी केन, कायलिएन एम्बापे अशी दर्जेदार पक्वान्न आपला पाचकरस सादर करत आहेत. पण कोठेतरी जर्मनी, स्पेन, उरुग्वे, बेल्जियम यांच्यासारखे मातब्बर संघ नसल्यामुळे अंतिम टप्प्याची पंगत बसलेली असताना गोडवा कोठे तरी कमी झाल्याची जाणवत आहे.

हे असे का घडले याची अनेक कारणे आहेत. मुळात अशा बहुराष्ट्रीय स्पर्धांत कोणी मोठा, कोणी लहान नसतोच मुळी. कारण प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील मेहनतीची सर्व कमाई पणास लावत असतो. मैदानात उतरले की सगळे एका माळेचे मणी. येथे मेस्सी पेनल्टी कीक गमावतो, तर रोनाल्डोवर राखीव खेळाडूत बसण्याची वेळ येते आणि तेथेच रामोस नावाचा कधी नाव न ऐकलेला खेळाडू अचानक लकाकतोही.

हे जसे खेळाडूंबाबत घडते तसेच संघांबाबतही यावेळी घडले. एखादी चूक मुळावर येते तशी एखादी संधी शिखरावर नेऊन ठेवत असते. अर्जेंटिना हा खरं तर संभाव्य विजेत्यांच्या शर्यतीतला संघ. परंतु स्पर्धेच्या सुरवातीसच सौदी अरेबियाविरुद्ध केवळ दहा मिनिटे त्यांचा बचाव विस्कळीत झाला आणि त्यांच्यावर पराभवाची नामुष्की आली.

तीही सलग 36 अपराजित सामन्यांनंतर आणि फिफा क्रमवारीत त्यांच्यापेक्षा पन्नासहून अधिक खालच्या क्रमांकावर असलेल्या संघाकडून हे विशेष. कधी कधी स्वतःच्याच खेळाडूंनी केलेला स्वयंगोलही संघांचे आव्हान संपवण्यासाठी कारणीभूत ठरलेला आहे.

‘नजर हटी दुर्घटना घटी’. फुटबॉल हा खेळ पायाने खेळायचा असला तरी पावलोपावली सावधानता बाळगायची असते. तरीही काही जण शेखचिल्लीच्या भूमिकेत जातात तेव्हा आश्चर्य वाटते. ब्राझीलनंतर सर्वाधिक वेळा विश्वकरंडक जिंकलेला संघ म्हणजे जर्मनी.

FIFA World Cup 2022 |
Will Power: ...हे आपल्याला शक्य आहे; गरज आहे ती केवळ प्रबळ इच्छाशक्तीची

विश्वविजेतेपद 2014 मध्ये मिळवल्यानंतर सलग दुसऱ्या स्पर्धेत याच संघाचे आव्हान साखळीत संपुष्टात येणे हे योगायोगाने किंवा दुर्दैवाने घडलेले नाही. मुळात चार वर्षांनी येणारी ही स्पर्धा. त्यात आपल्याला परत खेळायला मिळेल याची शक्यता नसते. म्हणूनच प्रत्येक जण संधीचे सोने करण्यासाठी हिरिरीने लढतो, तोच खेळाडू टिकून राहतो.

जर्मन अर्माडाची रुतलेली चाके चिखलातून बाहेर काढण्याऐवजी त्यांच्या खेळाडूंचे चित्त वेगळीकडेच धावत होते. कतारमधील या स्पर्धेकडे ‘फिफा’ने तंबी दिलेली असतानाही वेगवेगळ्या घटकांवर विरोध किंवा समर्थन दर्शवण्याचे साधन म्हणून काही संघांनी पाहिले.

समलैंगिकतेला मान्यता देण्यासाठी जर्मनीचे खेळाडू सामना सुरू होण्याअगोदरच्या लाइनअपमध्ये तोंडावर हात घेऊन उभे होते. यावरून त्यांचे खेळावर किती लक्ष होते, हे स्पष्ट होते. मग असा संघ जिगरबाज जपानकडून हरला त्यात नवल ते काय? मुळात आपला संघ स्थित्यंतराच्या मार्गावर असताना अशी कृती शेखचिल्लीसारखीच भासते.

बहुतांश नावाजलेले खेळाडू युरोपात सर्वाधिक खेळतात. कतारमध्ये खेळण्याचा तसा कोणालाही अनुभव नाही. तेथील उष्ण आणि आर्द्रता जास्त असलेल्या वातावरणात खेळण्याचा नसलेला अनुभवही नावाजलेल्या संघांना धक्का बसण्यास कारणीभूत ठरला आहे.

अर्जेंटिना, जर्मनी, स्पेन, उरुग्वे इत्यादी संघांना उत्तरार्धात झालेल्या गोलांमुळे पराभवाचा धक्का बसला. कारण युरोपात खेळण्याचा अनुभव असलेल्या काही मातब्बर खेळाडूंना कतारमध्ये वेग कायम राखणे कठीण जात होते.

FIFA World Cup 2022 |
Book: 'पोलादी' कडवट आलेखाचा देदीप्यमान विजय

एकीकडे मातब्बर संघांची दमछाक होताना दुसरीकडे जपान, कोरिया यांच्यासारख्या संघांची धक्कादायक कामगिरी सर्वांनाच दखल घ्यायला लावणारी ठरली. कतारमधील या स्पर्धेची ही दोन टोकं. कडवा निर्धार आणि पराकोटीची जिद्द आणि तयारी असेल तर अशक्यही शक्य करता येते हे जपानने सिद्ध केले.

काही वर्षांपूर्वी ब्राझीलचे दिग्गज खेळाडू झिको जपानचे प्रशिक्षक होते. त्यांनी जपानमध्ये होत असलेल्या फुटबॉल साखळी स्पर्धेमध्ये परदेशी खेळाडूंना अधिक संधी देण्याऐवजी स्थानिकांना प्राधान्य द्या, असा सल्ला दिला होता. 2006 मध्ये त्यांनी घातलेले खतपाणी आणि त्यातून तयार झालेला जपानचा वटवृक्ष हीसुद्धा या विश्वकरंडक स्पर्धेची दुसरी बाजू आहे.

जर्मनीत ‘बुंडेस्लिगा’ तर स्पेनमध्ये ‘ला लीगा’ या प्रतिथयश साखळी स्पर्धा होतात तरी त्यांचा फायदा त्या देशांना झाला नाही. अगदी आपल्याकडील क्रिकेटच्या आयपीएलसारखा. प्रत्येक विश्वकरंडक स्पर्धेचे वैशिष्ट्य असते.

या अगोदर कधी नावाजलेल्या एखाद-दुसऱ्या संघाला अपेक्षेपेक्षा अगोदर गाशा गुंडाळावा लागला नाही असे झाले नाही, पण या वेळी ही यादी फारच लांबलचक आहे, म्हणूनच धक्कादायक निकालांची स्पर्धा म्हणून कतार सर्वांच्या लक्षात राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com