आसावरी कुलकर्णी
पाऊस सुख-आनंद घेऊन येतो. हिरवळ आणि समाधानाबरोबरच तो भक्तिभावही घेऊन येतो. ज्येष्ठ संपला की गोवेकरांना वेध लागतात ते आषाढी एकादशीचे. आषाढ शुक्ल एकादशी, जी देवशयनी एकादशी म्हणूनही साजरी केली जाते, गोव्यातील अत्यंत महत्त्वाचा उत्सव किंवा व्रत आहे. गोव्यात जरी विठ्ठलाची देवळे असली तरी प्रत्यक्ष पंढरपूरला पायी चालत जाण्याचा अपूर्व अनुभव काही गोवेकर दरवर्षी घेतात. खरेतर प्राचीन काळापासून पंढरीची वारी करण्याची परंपरा चालत आलेली आहे. प्रति पंढरपूर म्हणून नावारूपास आलेलं साखळीचे श्री विठ्ठल मंदिर हे अशाच एका हुकलेल्या वारीचे फलित आहे.
मधल्या काळात बऱ्याच कारणामुळे थोडीशी मागे पडलेली ही परंपरा गेल्या पंचवीस एक वर्षात पुनर्जीवित झालेली दिसते. मुळगाव, फोंडा, मडगाव, सत्तरी, सांगे, आमोणा अशा विविध भागांतून वारकऱ्यांची दिंडी दरवर्षी वारीला निघते. ३५० किलोमीटरचे अंतर मोठ्या भक्तिभावाने पार करून हे वारकरी पंढरीच्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनाला पोहोचतात.
यावर्षी पहिल्याच वेळी वारी करून एकादशीला पोहोचलेल्या शिवानी बाक्रे एक युवा उद्योजिका आहे. आपला अनुभव सांगताना ती म्हणते, ‘गेली कित्येक वर्षे वारीला जाण्याचा मानस होता. पण घरातल्या जबाबदाऱ्या आणि इतर कारणांमुळे योग येत नव्हता पण यावर्षी तो आला. अतिशय खडतर असलेला हा प्रवास खूप अनुभव देऊन गेला.
दिवसाला सरासरी २८ कि.मी.चा पल्ला गाठत केलेला हा प्रवास म्हणजे स्वर्गीय असा अनुभव होता. काही ठिकाणी अत्यल्प सोयीसुविधामध्ये सामावून घेत, एकमेकांची काळजी घेत केलेला प्रवास फक्त भक्ती नाही तर मानवतेच्या भावनेला अनुभवसंपन्न बनवतो. देवाला शोधण्याच्या वाटेत आत्मशोध करणे हा अध्यात्माचा धडा आहे, आणि त्याचे प्रात्यक्षिक म्हणजे वारी.’
मुळगावचे फडकेबुवा गेली कित्येक वर्षे मुळगाव येथून वारीचे आयोजन करतात. यावर्षी १६० जणांनी त्यात भाग घेतला होता. या वारीत आबालवृद्धही तितक्याच ऊर्जेने भाग घेतात. अशाच वयाची ८० वर्ष ओलांडलेल्या जांभळे आजीचे वारीतील हे दुसरं वर्ष. २०१७ मध्ये त्या वारीला प्रथम गेल्या होत्या. त्यांनतर यावर्षी त्यांना योग आला.
कम्बरेला पट्टा आणि गुडघ्याला सुरक्षाकवच घालून या आज्जीने मोठ्या हिमतीने वारी पूर्ण केली. घरातून शक्यतो कुठेही बाहेर न पडणाऱ्या आज्जीनी सम्पूर्ण वारी पायात चप्पल न घालता केली हे कौतुकास्पद आहे. या वयात हे धाडस कसं केलं असे विचारल्यावर त्या हसून सांगतात, ‘अगं हा योग असतो आणि पांडुरंगच तो जुळवून आणतो. विठ्ठलाचं दर्शन खरेतर काही क्षणापुरतेच होते, पण देवत्वाचं दर्शन या संपूर्ण प्रवासात होत राहते. सगळ्या सुखसोयी त्यागून, एक ध्येय घेऊन चालल्यामुळे मन सुदृढ होते तसेच चैतन्याचा वेगळा अनुभव देऊन जाते. समूहाने फिरताना एकमेकांच्या सकारात्मक ऊर्जेची देवाण घेवाण होते आणि हाच स्वर्गाचा अनुभव आहे.’
मोर्ले कॉलनी इथल्या विठाबाई गावस या ६५ वर्षीय आज्जी पाचव्यांदा यावर्षी वारीला गेल्या. घरात सतत काम असतानासुद्धा हे पंधरा दिवस त्या वारीसाठी ठेवतात. यावर्षी वाटेत पाऊस नसल्यामुळे आणि रस्ते उन्हाने तापलेले असल्यामुळे कितीतरी लोकांच्या पायाला फोड आले आणि तरीही त्यांनी वारी पूर्ण केली. ही पांडुरंगाचीच कृपा असल्याचे त्यांनी सांगितले. ‘स्त्रियांना बाहेरच्या जगाचे अनुभव फार कमी मिळतात, अशावेळी पंढरपूरची वारी हे माझ्यासारख्या गृहिणीला जग बघण्याचा अनुभव देऊन जातो’.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.