Gomantak Editorial: समर्पित विधिज्ञाचे निर्वाण
एका समर्पित न्यायशलाकेने न्यायाच्या मार्गावर चाचपडणाऱ्या अनेकांना वाट दाखवली. उसगावकरांनी वकिली केली नाही, ते वकिली जगले. म्हणूनच आदर्शवत ठरले. आयुष्याच्या संध्याकाळी शारीरिक जर्जरतेमुळे प्रत्यक्ष कार्य करू न शकणारे उसगावकर कायम कार्यक्षमच राहिले.पोर्तुगिजांच्या निर्गमनानंतर मुक्त गोव्यात जसजशी सामाजिक, सांस्कृतिक स्थित्यंतरे होत गेली, तशी कालपरत्वे नव्या प्रश्नांनी जन्म घेतला.
कायद्याची भाषा आणि सामान्यांचे प्रश्न यातील दुवा ठरणारे वकील अभावानेच असण्याचा तो काळ होता. तेव्हापासून न्यायासाठी, सत्यासाठी लढा देणारे विधिज्ञ म्हणून ऍड. मनोहर उसगावकर यांचा दबदबा कायम राहिला. देशाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल, राज्याचे ऍडव्होकेट जनरल अशा पदांना न्याय देत, वकिली हा आदर्श पेशा आहे, याची संपूर्ण कारकिर्दीतून सार्थ जाणीव करून देणाऱ्या पितामह व्यक्तिमत्त्वाचे निर्वाण मोठी पोकळी निर्माण करणारे आहे. परंतु कार्यरूपी ते कालातीत राहतील, यात संदेह नाही.
उसगावकर यांचा जन्म २३ सप्टेंबर १९३३ रोजी झाला. गोव्यातच शिक्षण घेऊन १९५७ साली त्यांनी प्रत्यक्ष वकिलीला प्रारंभ केला. सदैव ज्ञानलालसेची जिज्ञासा असणाऱ्या उसगावकर यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज असे. चणीने बारीक, अत्यंत साधे राहणीमान, मृदू भाषा, खेळकर-विनोदी वृत्ती असणारे उसगावकर चिडलेले कधीच कुणी पाहिले नसावेत, हे त्यांचे वैशिष्ट्य. ‘वकील सज्जन असतात’, या धारणेला त्यांनी आपल्या कृतीतून सार्थ ठरवले.
जेव्हा गोव्यात ‘ज्युडिशीअल कमिशनर’ होते, त्या काळातही उसगावकर यांनी वकिली केली आहे. पोर्तुगीज काळातील जे काही कायदे आज अमलात आहेत, ते इंग्रजीत भाषांतरित करण्याचे श्रेय उसगावकर यांना जाते. गोव्यासाठी ते अनमोल योगदान आहे. तीन हजारांहून अधिक पोर्तुगीज संहिता त्यांनी भाषांतरित केल्या. त्याचा राज्यातील वकील व न्यायाधीशांना आजही फायदा होत आहे. म्हणूनच उसगावकर यांचे महत्त्व अनन्यसाधारण! सामाजिक, प्रशासकीय पातळीवर त्यांना प्रचंड मान होता.
अनेकदा प्रशासकीय कारभारात त्यांचे सल्ले घेतले गेले, जे नागरी हितार्थ कामी आले. कोमुनिदाद प्रॉपर्टी संदर्भात त्यांचा गाढा अभ्यास अनेकांसाठी नशीब ‘घडवणारा’ ठरला. पोर्तुगीज भाषा आणि कायद्यावरील त्यांचा वकूब पथदर्शी ठरला. पोर्तुगीज नागरिकत्वाच्या विषयावरून अनेक बारकावे त्यांनी वेळोवेळी सरकारांना समजावून सांगितले आहेत. स्वच्छ चारित्र्य हे उसगावकरांचे बलस्थान राहिले. त्याला धार्मिकतेची जोड होतीच.
काही दशकांपूर्वी बहुतांश महत्त्वाच्या दिवाणी खटल्यांत वादी वा प्रतिवादीचे वकील म्हणून उसगावकर यांचे नाव कायम असे. कोर्टात दाखल होताना त्यांच्या हातातील ‘एआरआर’ निवाड्यांचा संच बघूनच अनेकांची पाचावर धारण बसे. त्यांचे युक्तिवाद म्हणजे वस्तुपाठ असत. ते ऐकण्यासाठी अनेक वकील मुद्दामहून येत. रमाकांत खलप कायदामंत्री असताना उसगावकरांच्या साथीने न्याय पालिका कारभारात सुधारणा आणण्याचा कसोशीने प्रयत्न झाला. ऍडिशनल सॉलिसिटर जनरल म्हणून दिल्लीत जाणारे उसगावकर हे पहिले ‘गोंयकार’.
पोर्तुगीज न्याय यंत्रणेप्रमाणेच भारतीय व्यवस्थेत कालनियंत्रित सेवेचा अंगीकार केला जावा, या धारणेतून ‘दिवाणी न्यायालय कार्यपद्धती संहिता’ तयार केली गेली. त्यातील तरतुदी अत्यंत प्रभावी होत्या; अर्थात दुर्दैवाने सत्ताबदल झाला, पुढील सरकारात सदर संहितेत अनेक बदल केले गेले. परंतु जी काही आज अमलात आहे, त्याच्या उपयुक्ततेचे श्रेय उसगावकर यांनाच जाते. त्यांनी लढलेल्या एका प्रकरणात आल्वारा जमिनी ताब्यात घेण्याचा सरकारचा डाव फसला आणि श्रमजीवी घटकांना मोठा दिलासा मिळाला, याची आठवण आजही जुनी मंडळी काढतात.
वकिली व्यवसायात नव्याने पदार्पण करणाऱ्यांना उसगावकरांनी सदोदित मार्गदर्शन केले. ‘आपलेच युक्तिवाद आपण खोडून पाहावे’, अशा प्रयोगांतून त्यांनी नववकिलांना घडवले. सहकार क्षेत्रापासून कोर्टविषयक माध्यम पत्रिकेपर्यंत त्यांची चौफेर मुशाफिरी झाली. वयाची ८० ओलांडली तरीही ते खटले लढवत होते. प्रकृती साथ देत नसल्याने मनात असूनही ते कोर्टात जाऊ शकत नव्हते. उच्च न्यायालयाची नवी इमारत बांधल्यानंतर झेपत नसतानाही खास व्हिलचेअरवरून त्यांनी ती पाहिली होती.
पेशा जगणं बनून गेलेल्या या ज्येष्ठ विधिज्ञाने वकील कसा असावा, याचे जळी, स्थळी दर्शन घडवले. पैशांसाठी नाडणे हा प्रकार त्यांच्या सावलीलाही कधी शिवला नाही. ‘वादातीत’ राहिलेले हे दुर्मीळ उदाहरण ठरावे. एका समर्पित न्यायशलाकेने न्यायाच्या मार्गावर चाचपडणाऱ्या अनेकांना वाट दाखवली. उसगावकरांनी वकिली केली नाही, ते वकिली जगले. म्हणूनच आदर्शवत ठरले.
आयुष्याच्या संध्याकाळी शारीरिक जर्जरतेमुळे प्रत्यक्ष कार्य करू न शकणारे उसगावकर कायम कार्यक्षमच राहिले. वकिली पेशाला न्याय देणारे वकिलांचे पितामह कालवश झाले असले तरीही त्यांच्या शिष्यांच्या रूपाने ते यापुढेही कार्यदक्षच राहतील! कायद्याचा विधायक वापर करणाऱ्या उसगावकरांचे नाव न्यायपालिकेच्या इतिहासात सुवर्णअक्षरांत कोरले जाईल!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.