

India Own Smartphone Brand By 2028: भारतात महागड्या स्मार्टफोनची क्रेझ किती प्रचंड आहे, याची नुकतीच कल्पना आली. तब्बल 3 लाख रुपये किंमत असलेला 'आयफोन ड्युओ' भारतात विक्रीसाठी उपलब्ध होताच काही वेळातच आऊट ऑफ स्टॉक झाला. यावरुन देशात प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांची कोणतीही कमतरता नाही हे स्पष्ट होते. अशातच आता भारतीय स्मार्टफोन बाजारातील स्पर्धा अधिक रंजक होणार असून, लवकरच देशात स्वतःचा स्वदेशी ब्रँड पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका कार्यक्रमात मोठा दावा केला की, येत्या ऑक्टोबर 2028 पर्यंत भारताचा स्वतःचा असा स्मार्टफोन ब्रँड तयार होईल, ज्याचे डिझाइन, मॅन्युफॅक्चरिंग पूर्णपणे भारतातच केले जाईल. ॲपल (Apple) आणि सॅमसंग सारख्या जागतिक दिग्गजांच्या तुलनेत भारताची स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
एनडीटीव्हीच्या कार्यक्रमात बोलताना मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही महत्त्वाची अपडेट दिली. त्यांनी स्पष्ट केले की, 23 ऑक्टोबर 2028 पर्यंत देशात असे मोबाईल फोन बाजारात आणले जातील, जे भारतातच डिझाइन आणि तयार केले जातील तसेच त्यांची ब्रँडिंग देखील भारतीय असेल. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी त्यांनी उपस्थितांना दोन वर्षांनंतरची म्हणजेच 2028 ची तारीख लक्षात ठेवण्याचे आवाहन केले.
सध्या भारतात मोठ्या प्रमाणावर मोबाईल तयार होत असले आणि अनेक परदेशी कंपन्यांचे फोन येथे असेंबल केले जात असले, तरी एखाद्या फोनचे संपूर्ण तंत्रज्ञान आणि डिझाइन स्वतःच्या देशात विकसित करणे ही पूर्णपणे वेगळी बाब आहे. सरकार आता याच दिशेने वेगाने पावले टाकत आहे, जेणेकरुन भारतीय कंपन्या देखील जागतिक स्मार्टफोन बाजारात आपले वर्चस्व प्रस्थापित करु शकतील. एक आधुनिक स्मार्टफोन तयार करणे केवळ त्याचे वेगवेगळे पार्ट्स एकत्र जोडण्यापुरते मर्यादित नाही. त्यासाठी नेटवर्क कनेक्टिव्हिटी, अँटेना, प्रोसेसर, मेमरी, कॅमेरा, डिस्प्ले आणि बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम यांसारख्या अनेक जटिल तंत्रज्ञानांचा समन्वय साधावा लागतो.
वैष्णव यांनी स्मार्टफोनमधील अंतर्गत घटकांचा दाखला देत मोबाईल इंजिनिअरिंगमधील आव्हानांवर प्रकाश टाकला. मोबाईलच्या लहान आकारात सर्व आवश्यक पार्ट्स अशा प्रकारे बसवावे लागतात की, त्यामुळे फोनची परफॉर्मन्स, नेटवर्क आणि बॅटरी लाइफवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. तसेच फोनचे वजन देखील मर्यादित राखणे गरजेचे असते. हे सर्व तंत्रज्ञान यशस्वी करण्यासाठी उच्च दर्जाचे डिझाइन आणि विशेष तांत्रिक कौशल्याची आवश्यकता असते.
भारताची ही स्वदेशी स्मार्टफोन मोहीम बऱ्याच वर्षांपूर्वी सुरु झाली होती, ज्या अंतर्गत सरकारने देशातील डिझायर्सना मोबाईलसाठी प्रिंटेड सर्किट बोर्ड तयार करण्याचे आव्हान दिले होते. भारत हा केवळ फोन असेंबल करणारा देश न राहता स्वतःचे तंत्रज्ञान आणि डिझाइन विकसित करणारा देश बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. जर हे लक्ष्य ठरलेल्या वेळेत साध्य झाले, तर भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या इतिहासात हा एक अत्यंत सुवर्णकाळ ठरेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.