

Edible Oil Price Hike In India: सणासुदीच्या काळात गृहिणींच्या बजेटला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसात शेंगदाणा, सोयाबीन आणि पाम तेलासह सर्वच प्रकारच्या खाद्यतेलांच्या किमतींमध्ये वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे जगातील पाम तेलाचा सर्वात मोठा पुरवठादार देश असलेल्या इंडोनेशियामध्ये पडलेला दुष्काळ आणि ‘अल निनो’चा झालेला गंभीर परिणाम.
इंडोनेशियामध्ये (Indonesia) पाम तेलाचे उत्पादन रोडावल्यामुळे त्याचा थेट परिणाम जागतिक बाजारावर होत आहे. इंडोनेशियन पाम ऑइल असोसिएशनच्या अहवालानुसार, दुष्काळामुळे पाम तेलाचे उत्पादन तब्बल 50 लाख टनांपर्यंत घटू शकते. याशिवाय इंडोनेशिया आपली नवी ‘B50’ धोरणात्मक नीति लागू करत असून, याद्वारे पाम तेलाचा वापर देशांतर्गत बायोडिजल तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जाणार आहे. बायोडिजलसाठी सुमारे 1.63 ते 1.7 कोटी टन पाम तेलाची आवश्यकता भासणार असल्यामुळे भारत यांसारख्या आयातदार देशांना निर्यात करण्यासाठी पाम तेलाचा तुटवडा भासणार आहे.
भारत आपल्या एकूण गरजेच्या जवळपास 55 ते 60 टक्के खाद्यातेल परदेशातून आयात करतो आणि आपला मोठा हिस्सा इंडोनेशिया व मलेशियामधून येतो. जेव्हा पाम तेल महाग होते, तेव्हा साहजिकच नागरिक सोयाबीन आणि शेंगदाणा तेलाचा पर्याय निवडतात, ज्यामुळे इतर तेलांची मागणी वाढून त्यांच्याही किमती झपाट्याने वाढतात. आधीच सप्टेंबर महिन्यात जागतिक बाजारात खाद्यतेलांच्या किमती 11.2 टक्क्यांपर्यंत वाढल्या असून, कच्चा पाम तेल प्रति टन 1285 डॉलर आणि सोयाबीन तेल प्रति टन 1314 डॉलरच्या पातळीवर पोहोचले आहे.
भारतासारख्या देशात सणांच्या दिवसांत तेलाची मागणी नेहमीच जास्त असते, अशा परिस्थितीत जागतिक पातळीवर पुरवठा घटल्यामुळे रिफाइंडसह इतर खाद्य तेलांचे दर चढे राहण्याची दाट शक्यता आहे. या वाढत्या किमतींमुळे सामान्यांच्या खिशाला मोठा ताण सहन करावा लागणार असून, गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.