

आजच्या काळात स्मार्टफोन खरेदी करताना ग्राहक केवळ कॉलिंग किंवा इंटरनेटपुरता फोन पाहत नाहीत. चांगला कॅमेरा, मोठी बॅटरी, वेगवान प्रोसेसर, 5G कनेक्टिव्हिटी आणि आकर्षक डिस्प्ले या सर्व गोष्टींचा विचार केला जातो. विशेष म्हणजे 20 हजारांच्या बजेटमध्ये आता अनेक कंपन्या प्रीमियम फीचर्स देत आहेत. त्यामुळे कमी बजेटमध्येही दमदार स्मार्टफोन घेण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे. जर तुमचे बजेट 20 हजारांपेक्षा कमी असेल आणि तुम्ही नवीन 5G स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर खालील पाच पर्याय तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतात.
सुमारे 16,999 किमतीत उपलब्ध असलेला CMF Phone 2 Pro हा या यादीतील आकर्षक पर्याय आहे. फोनमध्ये 6.77 इंचांचा Full HD+ AMOLED डिस्प्ले असून 120Hz रिफ्रेश रेट मिळतो. त्यामुळे व्हिडिओ पाहणे, सोशल मीडिया वापरणे किंवा गेमिंग करताना स्क्रीनचा अनुभव स्मूथ राहतो. फोनमध्ये MediaTek Dimensity 7300 Pro चिपसेट, 8GB RAM आणि 128GB स्टोरेज देण्यात आले आहे. रोजच्या वापरासोबत मल्टीटास्किंगसाठीही हा सेटअप सक्षम आहे.
फोटोग्राफीसाठी या फोनच्या मागील बाजूस 50MP मुख्य कॅमेऱ्यासोबत 50MP टेलिफोटो आणि 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा मिळतो. सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 5,000mAh बॅटरीमुळे सामान्य वापरात चांगला बॅकअप मिळू शकतो. साधे सॉफ्टवेअर आणि वेगळे डिझाइन हीदेखील या फोनची वैशिष्ट्ये आहेत.
Motorola चा Moto G96 5G सुमारे ₹18,499 किमतीत येतो. यात 6.67 इंचांचा Full HD+ कर्व्ह्ड pOLED डिस्प्ले असून तब्बल 144Hz रिफ्रेश रेट आहे. त्यामुळे डिस्प्ले हा या फोनच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक ठरतो. Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसरसोबत 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळते. फोनला IP68 रेटिंग असल्याने पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठीही अतिरिक्त फायदा मिळतो.
कॅमेरा विभागात 50MP मुख्य कॅमेरा आणि 8MP अल्ट्रावाइड लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 5,500mAh बॅटरीमुळे दिवसभराचा वापर सहज करण्यासाठी पुरेसा बॅकअप मिळू शकतो.
18,999 च्या आसपासच्या किमतीत Realme P4x 5G हा बॅटरीवर अधिक भर देणारा पर्याय आहे. फोनमध्ये 6.72 इंचांचा डिस्प्ले असून 144Hz रिफ्रेश रेट मिळतो. MediaTek Dimensity 7400 Ultra प्रोसेसरसोबत 6GB RAM आणि 128GB स्टोरेज दिले आहे. सोशल मीडिया, व्हिडिओ स्ट्रीमिंग, दैनंदिन कामे आणि गेमिंगसाठी हा फोन उपयोगी ठरू शकतो.
या फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे 7,000mAh क्षमतेची बॅटरी. हलक्या वापरात याचा बॅकअप दोन दिवसांपर्यंत जाऊ शकतो. मागील बाजूस 50MP मुख्य कॅमेरा आणि 2MP सेकेंडरी कॅमेरा आहे, तर सेल्फीसाठी 8MP कॅमेरा मिळतो. त्यामुळे बॅटरी आणि परफॉर्मन्सला प्राधान्य देणाऱ्यांसाठी हा पर्याय विचारात घेता येईल.
सुमारे ₹18,729 किमतीचा iQOO Z10R 5G देखील या बजेटमध्ये लक्षवेधी आहे. फोनमध्ये 6.77 इंचांचा Full HD+ AMOLED डिस्प्ले असून 120Hz रिफ्रेश रेट आहे. MediaTek Dimensity 7400 प्रोसेसर, 8GB RAM आणि 128GB स्टोरेजचे कॉम्बिनेशन मिळते. स्लिम डिझाइनसोबत IP69 रेटिंग हा फोनचा आणखी एक महत्त्वाचा फायदा आहे.
फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आणि 2MP सेकेंडरी सेन्सर आहे. सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 5,700mAh बॅटरीमुळे बॅटरी बॅकअपच्या बाबतीत हा फोन चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र, कॅमेरा हा या फोनचा सर्वात मजबूत भाग मानला जात नाही.
Poco X7 5G ची किंमत सुमारे 17,999 आहे. या फोनमध्ये 6.67 इंचांचा AMOLED डिस्प्ले असून उच्च रिफ्रेश रेट आणि चांगली ब्राइटनेस मिळते. MediaTek Dimensity 7300 Ultra प्रोसेसरसोबत 8GB RAM आणि 128GB स्टोरेज देण्यात आले आहे. IP68 रेटिंग आणि प्रीमियम डिझाइनमुळे फोनला अतिरिक्त आकर्षण मिळते.
Poco X7 5G मध्ये 50MP मुख्य कॅमेरा आणि 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. सेल्फीसाठी 20MP फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनमध्ये 5,500mAh बॅटरी देण्यात आली आहे. त्यामुळे दैनंदिन वापरासोबत परफॉर्मन्सला महत्त्व देणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. याशिवाय काही AI फीचर्सही मिळतात.
20 हजारांच्या आत फोन घेताना तुमची प्राथमिकता काय आहे, यावर योग्य पर्याय अवलंबून आहे. कॅमेरा आणि ऑलराउंड वापरासाठी CMF Phone 2 Pro, प्रीमियम डिस्प्ले व सेल्फीसाठी Moto G96 5G, मोठ्या बॅटरीसाठी Realme P4x 5G, बॅटरीसोबत स्लिम डिझाइनसाठी iQOO Z10R 5G आणि परफॉर्मन्ससाठी Poco X7 5G विचारात घेता येऊ शकतात. मात्र, प्रत्यक्ष खरेदीपूर्वी आपल्या पसंतीच्या व्हेरिएंटची सध्याची किंमत, ऑफर्स आणि उपलब्धता तपासणे महत्त्वाचे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.