Problems After Renovation of Kala Academy
पणजी: कला अकादमीच्या नूतनीकरणानंतर निदर्शनास आलेल्या उणिवांची तपासणी करण्यासाठी राज्य सरकारने विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. त्यामुळे अकादमीचे सभागृह नाटक सादरीकरण किंवा नाट्यस्पर्धा घेण्याच्या दृष्टिकोनातून सदोष असल्याचे स्पष्ट होत आहे. असे असताना अकादमीने गट ‘अ’ मराठी नाट्यस्पर्धा आयोजित करण्याचा घाट घालणे अयोग्य असल्याचे नाट्यकला क्षेत्रातील मान्यवर कलावंत, दिग्दर्शक आदींनी ठणकावून सांगत या स्पर्धेच्या आयोजनाला विरोध केला.
‘गोमन्तक टीव्ही’वरील मंगळवारी सायंकाळी झालेल्या ‘सडेतोड नायक'' कार्यक्रमात संपादक-संचालक राजू नायक यांनी नाट्य स्पर्धेच्या अनुषंगाने राज्यातील कला क्षेत्रातील दिग्दर्शक ज्ञानेश मोघे, दिग्दर्शक सतीश गावस, दिग्दर्शक आणि प्रकाश निर्देशक नीलेश महाले यांच्याशी चर्चा केली.
सुरुवातील सतीश गावस म्हणाले, अकादमीची नाट्य स्पर्धा होत असल्याचे ऐकून सुरुवातीला आनंद झाला; पण त्यानंतर काळजात चर्र झाले. कारण कला अकादमीत ही स्पर्धा होणार आहे. सध्या तेथील पायाभूत सुविधा स्पर्धा आयोजित करण्यासाठी योग्य नाहीत, अजून त्यावर काम करावे लागेल. अकादमीच्या समितीला विचारावेच असे नाही, पण नाट्य स्पर्धेत सहभाग घेतात त्यांना (नाट्य संस्थाना) बोलावून, त्यांना विचारून ही स्पर्धा घ्यायला हवी.
नीलेश महाले म्हणतात, कला अकादमीच्या व्यासपीठावर नव्या कलाकारांना आपली नाटके आणताना बराच आनंद वाटतो. जे नाट्यकलेचे शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत, नवे कलाकार आहेत, त्यांच्यासाठी स्पर्धा होत असल्याने ही बाब निश्चित चांगली आहे; पण सद्यःस्थिती पाहता अकादमीत स्पर्धा कशी होईल, असा प्रश्न आहे. उत्सवी रंगभूमीत तांत्रिक क्षेत्रात काम करणारे युवक पुढे सरसावले आहेत. तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट असे युवक काम करीत आहेत, त्यांच्यासाठी स्पर्धा ही पुढे जाण्यासाठीचे पाऊल असते. त्यासाठी तशा पद्धतीच्या सुविधा असाव्यात.
अकादमीच्या त्रुटी काढण्यासाठी समिती स्थापन झालेली असताना ही स्पर्धा आयोजित करणे अयोग्य आहे, असे सांगत मोघे म्हणतात- मराठीतील ‘अ’ गट नाट्यस्पर्धा विशेष काहीतरी कलाकारांना देते. नाटकांचा आशय, तांत्रिक बाजूवर विचार होतो. म्हणून स्पर्धा कला अकादमी नव्हे तर इतर ठिकाणच्या नाट्यसभागृहात नेली जावी.
तीन वर्षे नाटक सादरीकरण करणाऱ्या संस्थांना बोलावून सुविधांबाबत विचारणा करावी.
इतर ठिकाणची सुविधा आणून नाटक करणे अवघड आहे. पायाभूत सुविधा असणे गरजेचे आहे, प्रत्येक गोष्टीसाठी वाद घातल्यास त्याचा परिणाम कलात्मकतेवर होतो.
कला अकादमीचा दर्जा तर खालावला तर ती खरोखरच दुःखद बाब. महाराष्ट्रात गोव्यातील नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.
केवळ अधिकाऱ्यांना हवी म्हणून ती स्पर्धा असू नये, तर प्रेक्षकांसाठी आणि कलाकारांसाठी ती असावी. देशात या राज्य नाट्यस्पर्धेचे योगदान मोठे आहे. अकादमीत आपण नाटक सादर केले, तेव्हा ६० स्पॉट होते आता तेथे अवघेच लाइट्स आहेत.
कला अकादमीची स्थिती जाणून असतानाही इतर नाट्यगृहाच्या तारखा मिळत नाहीत, हे सांगितले जाते. अकादमीची स्थिती पाहता उलट अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करायला हवे; पण त्यांच्यात बेजबाबदारपणा दिसून येतो.
फोंड्यासारख्या थिएटरमध्ये नाट्यप्रयोग होताना तेथेही प्रकाश योजना नीट नाही. तसेच दीड महिन्यांपूर्वी तसा अहवाल दिला, तरीही कार्यवाही होत नाही.
नाट्य स्पर्धा घेण्यासाठी एक महिन्याचा कालावधी आहे. परंतु तेथे नसलेल्या सुविधांविषयी अधिकारी उत्तर देतात की, ‘समिती काढलेली आहे, ते काही उपाय काढतील’. त्यामुळे अशा उत्तरावर हसावे की रडावे हेच कळत नाही.
‘गोमन्तक''ने जर अशापद्धतीने नाट्यस्पर्धेसाठी रंगमंच उपलब्ध करून दिला तर नक्कीच राज्यातील कलाकारांना ती एक चांगली संधी ठरेल. त्यासाठी फारसा खर्च करण्याची गरजही नाही.
प्रकाश योजना पाहण्यासाठी आपण गेलो होतो, तेव्हा यापूर्वी जी प्रकाश योजना होती ती नाही. (गोव्यातील) इतर ठिकाणच्या थिएटरमध्ये अकादमीपेक्षा चांगल्या दर्जाची प्रकाशयोजना आहे. सध्याची सुविधा पाहता नाट्यप्रयोग सादर करणे अवघड आहे.
एखाद्या संस्थेला एखादे नाटक तयार करणे खर्चिक आहे, त्यामुळे मेहनत घेतलेल्या कलाकारांना स्पर्धेच्या रूपाने निर्माण झालेल्या रंगमंचावर आवश्यक सुविधा न मिळाल्यास त्यांना त्रास होऊ शकतो. त्याशिवाय स्पर्धेचा दर्जाही खाली येऊ शकतो.
कला अकादमी ही स्वायत्त संस्थाच! दहा वर्षांपूर्वी स्पर्धेतील पहिले बक्षीस एक लाख रुपये ठेवण्यात आले. ते दहा वर्षांत वाढले नाही. आजच्या स्थितीत तीन लाखांचे बक्षीस हवे, दोन वर्षांनी ते वाढवावे. अकादमी आपली ग्रँट वाढवून घेत असेल तर ही बक्षीस रक्कम वाढ गरजेचीच.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.