Singham: अजय देवगणचा सिंघम अगेन हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. अलीकडेच, रोहित शेट्टी आणि अजय देवगणने सिंघम अगेनचे शूटिंग सुरु करण्यासाठी पूजा केली.
मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या ताज्या वक्तव्यामुळे चित्रपट अडचणीत येऊ शकतो, असे दिसते. सिंघमसारखे चित्रपट चुकीचा संदेश देतात, असे न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भारतीय पोलीस फाउंडेशनने वार्षिक दिन आणि पोलीस सुधारणा दिनानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना न्यायमूर्ती गौतम पटेल म्हणाले की, 'चित्रपटांमध्ये पोलीस न्यायाधीशांविरुद्ध कारवाई करतात, ज्यांना भित्रा, जाड चष्मा घातलेला आणि अतिशय खराब कपडे घातलेले दाखवले जाते.' त्यांनी याला चित्रपटाने दिलेला चुकीचा संदेश असल्याचे म्हटले आहे.
न्यायमूर्ती पटेल म्हणाले की, 'जेव्हा लोकांना वाटते की न्यायालयं त्यांचं काम करत नाही, तेव्हा ते पोलिसांच्या कारवाईचा आनंद साजरा करतात. त्यामुळेच जेव्हा बलात्काराचे आरोपी चकमकीत मारले जातात तेव्हा लोकांना न्याय मिळाला असे वाटते आणि लोक आनंद साजरा करतात.'
न्यायमूर्ती पटेल पुढे असेही म्हणाले की, 'विशेषत: सिंघम चित्रपटाच्या शेवटी, संपूर्ण पोलीस दल राजकारणी प्रकाश राज यांच्यावर झडप घातल्याचे दाखवले होते... त्यानंतर न्याय मिळाला असे दाखवण्यात आले होते, पण तसे झाले का, असे मी विचारतो. ते किती चुकीचे आहे, याचा विचार करायला हवा.'
न्यायमूर्ती पटेल पुढे म्हणाले की, 'एवढी घाई कशासाठी? कोण दोषी आणि कोण निर्दोष हे ठरवण्यासाठी एक न्यायिक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया संथ आहे, पण या प्रक्रियेत पवित्र तत्त्वांचे पालन केले जाते.'
न्यायमूर्ती पटेल शेवटी म्हणाले की, 'अनेकदा पोलिसांना (Police) भ्रष्ट आणि बेजबाबदार दाखवले जाते.' पोलिस सुधारणांसाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणाऱ्या उत्तर प्रदेशचे माजी डीजीपी प्रकाश सिंह यांचेही त्यांनी यावेळी कौतुक केले.
दुसरीकडे, सिंघम जुलै 2011 मध्ये रिलीज झाला आणि चाहते आता सिंघम अगेनची वाट पाहत आहेत. सिंघम अगेन बद्दल बोलायचे झाल्यास, या चित्रपटात अजय देवगणसोबत (Ajay Devgn) सिंघमच्या भूमिकेत रणवीर सिंग देखील सिम्बाच्या भूमिकेत दिसणार असून अक्षय कुमार वीर सूर्यवंशीच्या भूमिकेत दिसणार आहे.
रोहित शेट्टीच्या या चित्रपटात बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर आणि श्वेता तिवारी देखील भूमिका साकारणार असल्याचे वृत्त आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.