गोव्यात सातत्याने नाट्य निर्मिती करणाऱ्या पणजीच्या ‘अभिव्यक्ती’ या संस्थेने ‘गोधुली’ या हिंदी नाटकाचा प्रथम प्रयोग कुडचडे येथील रवींद्र भवनामध्ये 20 डिसेंबर रोजी सादर केला.हे नाटक एका नगरात राहणाऱ्या उर्मिलेची गोष्ट सांगते. गोष्ट ‘एका उर्मिले’ ची असली तरी आजच्या समाज व्यवस्थेतील समस्त स्त्रीवर्गाच्या अपरिहार्य जीवनक्रमाची ती गोष्ट बनते. या नाटकात ख्रिस्तोत्तर काळात जन्मलेली हिपेशिया या तत्त्वज्ञानी आणि विचारवंत असलेल्या स्त्रीचाही महत्त्वाचा संदर्भ आहे. जिला त्याकाळात पुरुषसत्ताक व्यवस्थेकडून मृत्यू पत्करावा लागला. ‘हिपेशिया’ च्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करणाऱ्या उर्मिलेलादेखील एका मानसिक संघर्षातून पार व्हावे लागते आणि शेवटी ‘स्त्री जन्माच्या’ विदारक कहाणीचाच तीदेखील भाग असल्याचे वास्तव तिला स्वीकारावे लागते.
या नाटकाच्या (Drama) निर्मितीची प्रक्रियादेखील बरीच वेगळी होती. गेल्या एप्रिल महिन्यात ‘अभिव्यक्ती’ या संस्थेच्या सदस्य राजस्थानी नाट्य लेखक राजकुमार यांच्याबरोबर ‘रामायणातील’ उर्मिला’ या व्यक्तिरेखेबद्दल चर्चा करताना ‘स्त्री’ या विषयावरून कवी ग्रेस यांची ‘उर्मिला’, मैथिलीशरण गुप्त यांच्या ‘उर्मिला आणि ‘साकेत’, मामा वरेरकर यांची ‘भूमिकन्या सीता’ या साऱ्या संदर्भासंबंधी बोलणी झाली व पुढे या साहित्याचे वाचनदेखील केले गेले. त्यानंतर मे - 2021 या काळात रामकुमार रजक यांनी ‘कथा’ लिहून पूर्ण केली जी ‘अभिव्यक्ती’ द्वारे डॉ. चंद्रहासन यांना पाठवली गेली. डॉ. चंद्रहासन हे केरलामधील सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक आहेत. या नाटकाच्या संदर्भात पुढे मग ‘हिपेशिया’ या रोमन व्यक्तिरेखेचा समावेश नाटकाच्या कथानकात करण्याचे ठरले. ‘स्त्रीची व्यथा वैश्विक आहे. हाच विचार त्यामागे होता.
साधारण जुलै - 2021 ते ऑगस्ट 2021 या काळात दिग्दर्शक डॉ. चंद्रहासन यांनी नाटकातल्या प्रवेशाचा क्रम ठरवला, त्यातल्या व्यक्तिरेखा नक्की केल्या. सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात, ठरवलेले सारे प्रवेश विकसित करण्याची प्रक्रिया सुरू झाली. संवाद लिहिले गेले व त्यात इष्ट बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने ते रद्दही केले गेले.नोव्हेंबरच्या दरम्यान डॉ. चंद्रहासन पणजीत आले. त्यांनी साधारण 20 कलाकारांबरोबर कार्यशाळा घेतली व सारे प्रवेश अभिनंत्यांच्या वकुबाप्रमाणे व भाषिक क्षमतेप्रमाणे इम्प्रुव्हायजेशन करून बांधण्यावर भर दिला गेला. या प्रक्रियेतून संवादाबरोबर गाणी / काव्य, संगीत, चाली इत्यादी नाट्य-घटक तयार होत गेले आणि नाट्यसंहिता तयार झाली.
डिसेंबर महिन्यात पुन्हा डॉ. चंद्रहासांनी गोव्यात परतून प्रत्येक व्यक्तिरेखांवर काम करण्यास सुरुवात केली. कलाकारांना गायन, नृत्य यांची दिक्षा दिली गेली. शारीरिक हालचाली, आवाज प्रशिक्षण यांचीही तालीम होत होतीच आणि अशातऱ्हेने हे नाटक प्रयोगासाठी सिद्ध झाले आणि डिसेंबर २० रोजी त्याचा पहिला प्रयोग पार पडला. नाटकाची संहिता एका लेखकाने लिहिणे व एखाद्या कथानकावर समग्र विचार करून दिग्दर्शकाच्या सहाय्याने नाटकांची बांधणी होणे हे दोन्ही प्रकार वेगळे आहेत. परंतु दुसरा प्रकार कलाकारांना संहितेत गुंतवून घेतल्यामुळे प्रयोगात अधिक समज व सखोलता आणतो हे निश्चित. राजस्थानी कथालेखक, केरळचा दिग्दर्शक आणि नाटक सादरकर्ती संस्था गोव्याची. अशा या आंतरराज्य प्रयोगातून निर्माण केलेल्या ‘गोधुली’साठी ‘अभिव्यक्ती’ अभिनंदनास निश्चितच पात्र आहे.
भाषेचा अडसर न मानणारे...
दिग्दर्शक डॉक्टर चंद्राहासन हे कोची, केरळ येथील ‘लोकधर्मी सेंटर ऑफ थिएटर’चे संस्थापक आणि क्रिएटिव्ह संचालक आहेत. भारतीय तसेच विदेशी अभिजात नाटकांच्या निर्मितीत त्यांचा सहभाग लेखक, अनुवादक, अभिनेता आणि दिग्दर्शक या नात्याने राहिला आहे. मल्याळम. कन्नड, हिंदी, तमिळ, संस्कृत, इंग्लिश, फिनिश आणि लिथुआनियन इत्यादी भाषांमधून त्यानी आजवर पन्नास नाटकांची निर्मिती केली आहे. 2014 साली त्यांना फुलब्राईट-नेहरू स्कॉलरशिप, त्यांच्या व्यावसायिक आणि अकॅडमिक गुणवत्तेसाठी लाभली. त्याशिवाय ‘केरळ संगीत अकादमी’ आणि भारत सरकारच्या सांस्कृतीक खात्याची फेलोशिप त्यांच्या नाट्यक्षेत्रातल्या कामगिरीसाठी त्यांना त्याशिवाय लाभली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.