Drama Dainik Gomantak
मनोरंजन

Goan Drama: ललना देवता जयाची

केरी येथील ‘स्वर सत्तरी’ या या संस्थेने आतापर्यंत फोंडा येथील ‘राजीव गांधी कला मंदिर’ने आयोजित केलेल्या ‘अखिल गोवा महिला संगीत नाट्यस्पर्धे’त पाच वेळा भाग घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

केरी येथील ‘स्वर सत्तरी’ या या संस्थेने आतापर्यंत फोंडा येथील ‘राजीव गांधी कला मंदिर’ने आयोजित केलेल्या ‘अखिल गोवा महिला संगीत नाट्यस्पर्धे’त पाच वेळा भाग घेतला आहे. पहिल्या वर्षी त्यांना दुसरे इनाम मिळाले मात्र त्यानंतर पुढील चार वर्षात त्यांनी ओळीने पहिला क्रमांक पटकावला. केरीसारख्या ग्रामीण भागातल्या महिला, ज्यांनी अभिनयाचे कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही, तरीसुद्धा केवळ आपल्या उत्साहाच्या आणि शिस्तप्रियतेच्या बळावर त्यांनी दिग्दर्शक शिवनाथ नाईक त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश मिळवले आहे. (Goa News Update)

यंदा त्यांच्या ‘संगीत रणदुंदुभी’ या नाटकाला (Drama) पहिले पारितोषिक प्राप्त झाले. दिग्दर्शक शिवनाथ नाईक सांगतात, या नाटकासाठी त्यांची टीम सतत दोन महिने तालीम घेत होती. यंदाचे हे नाटक भाषेवर अधिक भर देणारे असल्यामुळे ‘वाचिक’ अभिनयावर अधिक कष्ट घेणे आवश्यक होते. त्यांच्या नाटकांमधल्या बहुतेक कलाकार स्त्रिया या गृहिणी आहेत. अनेकजणी शेतात काम करणाऱ्या आहेत. आपापली कामे आटपून त्या ठीक पाच वाजता तालमीला हजर राहायच्या. त्यांनी या नाटकासाठी खरोखरच खूप प्रामाणिकपणे कष्ट घेतले आहेत.

शिवनाथ नाईक यांनीच, या संस्थेने आतापर्यंत स्पर्धेत सादर केलेली सारी नाटके दिग्दर्शित केली आहेत. केवळ स्त्रिया काम करत असलेले नाटक आणि इतर नाटकांमधला फरक सांगताना ते म्हणतात, निःसंशयपणे स्त्री कलाकार या अधिक शिस्तशीर व नम्र असतात. जरी त्यांचा अनुभव पुरुष कलाकारांपेक्षा कमी असला तरी जेव्हा त्या नाटकात काम करायचे ठरवतात तेव्हा त्या नाटकात तालमीशी, नाटकाशी बांधील राहतात.

संगीत रणदुंदुभी’ या नाटकात काम करणाऱ्या या स्त्रिया केरी, पर्ये, मोर्ले, अशा चार-पाच किलोमीटरच्या परिघातल्या निरनिराळ्या गावात राहणाऱ्या होत्या. तालीम केरी या गावात व्हायची. नवरा, भाऊ किंवा अन्य कुटुंबीय त्यांना तालमीच्या ठिकाणी सोडायचे. पाच वाजल्यापासून साधारण दोन-अडीच तास तालीम चालायची पण तालमीच्या संपूर्ण काळात त्यातल्या साऱ्या कलाकारांनी आपला तो वेळ केवळ नाटकासाठी वाहिला होता. या नाटकाला उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट संगीत दिग्दर्शन, उत्कृष्ट अभिनेत्री (मनीषा परब) आणि उत्कृष्ट ‘गायिका अभिनेत्री’ असे चार प्रथम पुरस्कार मिळाले. नाटकाचे संगीत दिग्दर्शक दीपक गावस हे या संस्थेचे सदस्य. त्यांनीदेखील नाटकाचे संगीत आणि त्यातल्या कलाकारांच्या गायनावर खूप काम केले. ‘गायिका अभिनेत्री’ म्हणून प्रथम बक्षीस मिळवणारी नियती गावस ही संगीत महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे.

या नाटकाचे दिग्दर्शक शिवनाथ नाईक हे कला अकादमीच्या नाट्य विद्यालयाचे माजी विद्यार्थी. ते आता नाट्यशिक्षक म्हणून शाळेत कार्यरत आहेत. ओळीने त्यांना चार वर्षे उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार लाभला आहे. एरवी आपल्या शेता-परसात काम करणाऱ्या गृहिणींना घेऊन सातत्याने यश मिळवणे हे सोपे काम नाही. दिग्दर्शक म्हणून प्रथम, त्या साऱ्या नवोदित स्त्री कलाकारांना नाटकासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक बाबींचे शिक्षण द्यावे लागले असणार. अर्थात या कलाकारांपैकी अनेक जणी लोककलाकार आहेत. रंगमंचासंबंधीचे प्राथमिक ज्ञान त्यांना असेलच. परंतु रंगमंच तोच असला तरी ‘नाटक’ या माध्यमासाठी वेगळ्या प्रकारची वाचिक आणि आंगिक कौशल्ये लागतात. गेल्या पाच वर्षांच्या अनुभवाने या संस्थेमधल्या स्त्री कलाकारांनी ती बरीच अवगतही केली असतील आणि आज त्या अभिनेत्री म्हणून अधिक विकसित झाल्या असतील. ‘नाटक’ या माध्यमाचे पाणिग्रहण कौशल्याने करूनच त्या घडल्या असतील. त्यांच्या त्या घडण्यात, त्यांच्याबरोबर गेली पाच वर्षे सातत्याने काम करणाऱ्या शिवनाथ नाईक यांचे योगदान नक्कीच महत्वाचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

Islamic State Rebels Attack: कांगोमध्ये रक्तपात! चर्चवरील हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, IS समर्थित दहशतवाद्यांचा हात

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT