यशवंत पाटील
पणजी: कोविड काळातील मानवी संबंध उलगडण्याचा प्रयत्न मी ‘विषय हार्ड’ चित्रपटातून केला आहे. माझ्या या चित्रपटाची ५५ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘फिल्म बझार’ विभागात निवड केल्याबद्दल मी महाराष्ट्र शासन चित्रपट रंगभूमी आणि संस्कृती विकास महामंडळाचे विशेष आभार मानतो. महाराष्ट्र सरकारकडून चित्रपट क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या होतकरू नवयुवकांना प्रोत्साहन देण्याचे मोठे कार्य होत आहे हे अभिनंदनीय आहे, असे ‘विषय हार्ड’चे अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, लेखक सुमीत पाटील यांनी सांगितले.
२०२० मध्ये कोरोना च्या साथीमुळे संपूर्ण जग होरपळून निघाले होते. सर्वचजण आपल्या अस्तित्वासाठी, जगण्यासाठी धडपडत असतानाच एक प्रेमी युगूल आपले प्रेम जिवंत ठेवण्यासाठी धडपडत होते, अशा आशयावर बेतलेले ‘विषय हार्ड’ या चित्रपटाचे कथानक आहे. समाजाला चांगले ते देण्याच्या प्रयत्नातून या चित्रपट निर्मितीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यासाठी गीतांजली सर्जेराव पाटील आणि सर्जेराव बाबुराव पाटील यांच्यासह सौरभ प्रभुदेसाई, रोहित प्रधान, अवी लोहार, अभिषेक शेटे यांचाही मोलाचा सहयोग लाभला आहे.
निर्मितीबरोबरच या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून मी आपली भूमिका उत्कृष्टपणे सादर करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. अभिनेत्री पर्ण पेठे हिनेही भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. त्याशिवाय नितीन कुलकर्णी, हसन शेख, विपीन बोराटे, प्रताप सोनाळे यांच्याही भूमिका आहेत, असे सुमीत म्हणाले.
२०२० मधील कोरोना काळातील कडक निर्बंधांमध्ये एक ३२ वर्षीय पोलिस हवालदार किशोर हा २२ वर्षीय डॉलीसोबत गुपचूप लग्न ठरवतो. मात्र, किशोरच्या भेटीबद्दल डॉली चिंतेत पडते आणि ती तिच्या प्रियकर संदीपला फोन करते, जो ‘क्वारंटाईन’ इमारतीत अडकलेला असतो.
डॉलीकडून बातमी ऐकून, संदीप पळून जाण्याची एक धाडसी योजना आखतो. तो पळून जाताना सरपंचाला त्याची माहिती मिळते आणि पोलिसांना कळवले जाते. पोलिस हवालदार किशोरलाच संदीपला पकडण्याची जबाबदारी दिली जाते. मात्र, स्थिती आणखीनच गुंतागुंतीची होते. तेव्हाच सरपंचाला समजते की, संदीपचा कोविड अहवाल पॉझिटीव्ह आला आहे आणि त्याचे पळून जाणे, इतरांना धोक्याचे ठरू शकते.
पळून गेल्यानंतर संदीपला जगणे मुश्कीलीचे होते. पैशांसाठी तो चोरी करतो, त्याचा फोनही बंद पडतो. ‘विषय हार्ड’ ही प्रेम, विरह, खंबीरपणाची कथा आहे, जी विनोद आणि अनपेक्षित वळणांनी भरलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, ती मानवी संबंधांतील गुंतागुंत आणि प्रेमासाठी माणसं कोणत्या थराला जातात हे उलगडते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.