पुणे: आयुर्वेद आणि योग शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे व्रत घेतलेल्या श्रीगुरू बालाजी तांबे (वय 81) यांची प्राणज्योत मंगळवारी मालवली. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनिल आणि संजय आणि स्नूषा व नातवंडे असा परिवार आहे.
तांबे यांची गेल्या आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.
श्रीगुरु बालाजी तांबे यांनी ‘सकाळ’च्या ‘फॅमिली डॉक्टर’ या पुरविण्याच्या माध्यमातून आरोग्य विषयक जागृती केली. त्यातून त्यांनी विविध विषयांवर शेकडो लेख लिहीले. तसेच, नागरिकांमध्ये आयुर्वेदाबद्दल जिज्ञासा निर्माण करण्यात त्यांचे मोठे योगदान होते.
श्रीगुरु तांबे यांनी आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीतोपचार यांचा पाच दशके प्रचार व प्रसार केला. शास्त्रशुद्ध आणि गुणत्तापूर्ण आयुर्वेदीक औषधांची संशोधन निर्मिती करून ती सामान्यांपर्यंत पोचविण्याचे कार्य त्यांनी केले. तसेच, त्यातून विविध समाज घटकांना आयुर्वेदाशी जोडले. आयुर्वेद हे केवळ भारतापुरते मर्यादीत न ठेवता त्याचा प्रसार केला आणि त्याचे महत्त्व परदेशातील नागरिकांनाही आपल्या ओघवत्या शैलीतून पटवून दिले.
लोणावळ्याजवळील कार्ला येथील ‘आत्मसंतूलन व्हिलेज’ या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी आयुर्वेदाबद्दल जनजागृती केली. त्या निमित्ताने राजकीय, अभिनेते, संगीत, साहित्य, कला अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर या आश्रमाला भेटी देत असत. परदेशातील नागरिकही त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी आवर्जून कार्ल्यात येत होते.
‘सकाळ’च्या ‘साम’ वाहिनीवर श्रीमत भगवद्त गीतेचे निरूपण ते करत होते. त्याला मोठा प्रेक्षक वर्ग होता. तसेच, विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आयुर्वेदाचे महत्त्व त्यांनी लोकांपर्यंत पोचवले.
सुदृढ नवीन पिढीसाठी श्रीगुरू तांबे यांनी ‘गर्भसंस्कार’ या पुस्तकाचे लेखन केले. त्याच्या लाखोप्रती वाचकांनी घेतल्या. इंग्रजीसह सहा भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.