भारतातील विविध राज्यांमध्ये हिंदू धर्म संसदेचे आयोजन केले जात असून तेथून वादग्रस्त विधाने समोर येत आहेत. रायपूरमध्ये एका संघटनेने आयोजित केलेल्या धर्मसंसदेत धर्मगुरु कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी महात्मा गांधींबद्दल अपमानास्पद शब्द बोलून बापूंच्या हत्येसाठी नथुराम गोडसेला न्याय दिला. त्यावरुन आज महाराष्ट्रातील विधीमंडळ अधिवेशनात वादंग निर्माण झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांनी धर्मगुरु कालीचरण महाराज यांच्यावर निशाणा साधत राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, हिवाळी अधिवेशनात बोलताना महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक म्हणाले, ''देशातील प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी श्रध्दास्थान आहेत. मात्र आपल्या राज्यात एक भोंदू बाबा आहे त्याचं नाव कालीचरण महाराज असून तो अकोल्याचा मूळ रहिवासी आहे. त्याने आपल्या देशाचे श्रध्दास्थान असणाऱ्या राष्ट्रपित्याबद्दल अपमानास्पद अपशब्द वापरले आहेत. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या विचारांचा विरोध होऊ शकतो, मात्र त्यांची हत्या करणाऱ्याचे काही लोकांकडून गोडवे गायले जात आहे. दोन विचारधारांमध्ये मतमतांतरे, वादविवाद असू शकतो. परंतु महात्मा गांधींचा अपमानास्पद शब्दांमध्ये जे लोक उल्लेख करतायेत त्यांना कदापि खपवून घेतले जाणार नाही. तात्काळ कालीचरण महाराज यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. आणि त्यांना गजाआड टाका. राष्ट्रपित्याला शिवीगाळ केलेलं महाराष्ट्र आणि देश कदापि सहन करणार नाही, त्यांच्यावर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात यावी.''
काँग्रेस नेत्यांनीही टीका केली
धर्माच्या रक्षणासाठी जनतेने कट्टर हिंदू नेत्याला सरकारचे प्रमुख म्हणून निवडले पाहिजे, असे कालीचरण महाराज म्हणाले. छत्तीसगड सरकारमधील काँग्रेस नेत्यांवरही त्यांनी टीका केली. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
महिलांबाबतही ही गोष्ट सांगितली
रायपूर येथील रावण भटा मैदानावर हिंदू धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कालीचरण महाराज म्हणाले की, धर्माचे रक्षण करणे हे आपले मुख्य कर्तव्य आहे. आपण सरकारमध्ये कट्टर हिंदू राजा (नेता) निवडला पाहिजे, मग तो कोणीही असो.
पुढे बोलताना ते म्हणाले की "आमच्या घरातील महिला खूप छान आणि सुसंस्कृत आहेत मात्र त्या मतदानाला जात नाहीत. जेव्हा सामूहिक बलात्कार होतात तेव्हा तुमच्या घरातील महिलांचे काय होईल. महान मूर्ख... जे करत नाहीत त्यांना मी म्हणत आहे. मतदानासाठी बाहेर जा."
पोलीस प्रशासनाचा गुलाम
कालीचरण महाराज पुढे म्हणाले की, मुस्लिमबहुल भागातून भगव्या मिरवणुका काढू नका असे पोलीस सांगतात. यात पोलिसांचा दोष नाही. पोलिस हे प्रशासनाचे गुलाम आहेत, जे सरकारचे गुलाम आहेत. सरकार हे नेत्याचे गुलाम आहे. त्यामुळे कट्टर हिंदू नेता मुख्यमंत्री झाल्याशिवाय पोलीस साथ देणार नाहीत.
दरम्यान, दुधाधारी मठाचे महंत संत रामसुंदर दास यांनी मंचावर महात्मा गांधी यांच्यावर अपमानास्पद शब्द बोलल्याची टीका करत मंचापासून फारकत घेतली. छत्तीसगड गौ सेवा आयोगाचे अध्यक्ष महंत रामसुंदर दास म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या राष्ट्रपितांबद्दल असे अपमानास्पद शब्द वापरले जाऊ नयेत.
ज्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तो मार्ग भरकटला असल्याचे देखील त्यांनी या मंचावर म्हटले. स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या महात्मा गांधींना देशद्रोही म्हटले जात आहे. मला आयोजकांना विचारायचे होते की, त्यांनी त्यावर आक्षेप का घेतला नाही. राष्ट्रपिताबद्दल चुकीचे शब्द वापरले जात होते.
कालिचरण : आधी सिद्ध करा की तो संत आहे
यानंतर आयोजक नीलकंठ त्रिपाठी यांना कालीचरण यांच्या वक्तव्याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, ते विधानाशी पूर्णपणे असहमत आहेत. प्रदेश काँग्रेस कम्युनिकेशन विंगचे प्रमुख सुशील आनंद शुक्ला म्हणाले की, कालीचरण यांनी आधी ते संत असल्याचे सिद्ध करावे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.