Dussehra Rally: बाण गेले तरी धनुष्य माझ्याकडे आहे असे 'ते' म्हणतात. ही 'तुमची' प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला. शिवसेनेच्या शिवतीर्थावर झालेल्या दसरा मेळाव्याला प्रत्युत्तर म्हणून बीकेसी मैदानावर झालेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते.
आनंद दिघेंचे निधन झाल्यावर यांनी मला त्यांची प्रॉपर्टी किती आहे, असे विचारले. यांना मुख्यमंत्रीपदाची लालसा असल्याने त्यांनी पक्षातील इतरांचे पाय कापले. आमच्यावर केसेस आहेत, तुमच्यावर किती केसेस आहेत? माझ्या दीड वर्षांच्या नातवावर टीका करता? तुम्ही मुख्यमंत्री झालात, तुमचा मुलगा मंत्री झाला, एखाद्या ग्रामीण भागातील नेत्याला करता आले असते. सर्वसामान्य माणूस मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांनीच मुख्यमंत्री व्हायचे काय? असा सवालही त्यांनी केला. शिंदे म्हणाले, बाळासाहेब सर्वांच्या पाठीशी उभे राहायचे, तुम्ही कुणाच्या पाठीशी उभे राहिला. येथे निहार आहे, स्मिता ताई आहेत, थापा जो बाळासाहेबांची सावली होता तोही तुमच्यासोबत राहिला नाही. त्याची तुम्ही खिल्ली उडवली. बाळासाहेबांच्या वाट्याला अखेरच्या काळात अवहेलना आली.
डॉक्टर एकनाथ शिंदेंनी 'त्यांना' बरे केले
शिंदे म्हणाले, सत्ता गेल्यानंतर शाखाप्रमुख, गटप्रमुख, शिवसैनिकांची आठवण आली. ज्यांना दारावरून हुसकावून लावले त्यांची आता भेट घेतली. मी सगळ्यांनाचा कामाला लावले. मी सोशल मीडियात वाचले, 'डॉक्टर' एकनाथ शिंदेंनी 'त्यांना' बरे केले. त्यांच्या गळ्यातला पट्टा काढला. त्यांना फिरायला लावले. तुम्ही वर्क फ्रॉम केले, आम्ही वर्क विदाऊट होम केले, हे जनतेने पाहिले आहे.
आमच्यावर बोलल्यावर काय होते ते माहिती आहे ना?
ते म्हणाले, आमच्याकडे आत्मबल आहे. विचारांची लढाई लढताना कुणाचीही तमा बाळगायची गरज नाही. शिवसेनेच्या घामातून शिवसेना उभी राहिली. आमच्याविषयी बोलल्यावर काय होते हे माहिती आहे ना? संजय जेवढे सांगतो तेवढचे ऐकल्याने हे महाभारत घडले. प्रत्येकाने आपला तालुका, जिल्हा शिवसेनामय केला नसता तर तुम्ही या पदापर्यंत पोहचला असता का?
अमित शहांना कमजोर समजू नका
शिंदे म्हणाले, बाळासाहेबांचे विचार मोदी, अमित शहांनी पुर्ण केले आणि तुम्ही त्यांची टिंगल करता?अमित शाहंना अफजलखान म्हणता? त्यांना कमजोर समजू नका. नारायण राणेंनी टीका केल्यावर तुम्ही त्यांना अटक केली. जेवताना ताटावरून उठवले. आता तुम्हीच म्हणता की एकनाथ शिंदे कंत्राटी मुख्यमंत्री आहे? सर्वांना न्याय देण्याचे कंत्राट मी घेतले आहे. हे सरकार योग्य कंत्राटदाराच्या हाती आहे.
आम्ही मदत करत होतो, तुम्ही फोटो काढत होता
एकनाथ शिंदे म्हणाले, काँग्रेस राष्ट्रवादी तुम्हाला मित्र वाटतात. ज्यांनी बाळासाहेंबवर टीका केली, ज्यांनी बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता. दाऊदशी संबंधित लोकांना मंत्रीमंडळात घेतले. सावरकरांचा अवमान करणाऱ्यांसोबत बसला. तुमच्यात आणि माझ्यात काय ठरले होते, ते मी जाहीर करू इच्छित नाही, ते योग्य वेळी करेन. एकनाथ शिंदे फक्त देणारा आहे, घेणारा नाही. आम्ही दुष्काळात मदत करत होतो, तुम्ही फोटा काढालया येत होता, अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
मोदींना हिणवणाऱ्या पक्षाला अध्यक्ष मिळेना
शिंदे म्हणाले, मोदींना चहावाला म्हणून हिणवणारा पक्ष आता कुठे आहे, त्यांना अध्यक्ष मिळत नाही. मोदींनी जगाला देशाची भुरळ घातली आहे. त्याचा अभिमान वाटला पाहिजे. इंदिरा गांधींही डॅशिंग पंतप्रधान होत्या. पण आता मोदींनी जगभर देशाचे नाव पसरवले आहे. बाहेर संकट येते तेव्हा आपल्या देशातून मदत जाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.