Mumbai-Goa Highway: रस्ते, महामार्ग हे विकासाला हातभार लावत असतात. रस्त्यांमुळे कनेक्टिव्हिटी वाढते, व्यापाराची मोठी संधी निर्माण होते. पण, मुंबई-गोवा महामार्गामुळे एका गावाला मोठा तोटा झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या रूंदीकरणामुळे या गावातील अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे.
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. या गावाचे नाव आहे बिबवणे. मुंबई-गोवा महामार्ग दोन पदरी असताना या गावातील लोक आनंदी होते. त्याचे कारण असे की या गावात मोठ्या प्रमाणात कलिंगडे पिकवली जाते. गोड, रसाळ कलिंगडांसाठी हे गाव प्रसिद्ध आहे.
पिकलेली कलिंगडे महामार्गालगत विकली जात होती. महामार्गाचा विस्तार सुरू होण्यापुर्वी हे गाव हायवेलगतचे कलिंगड विक्रीचे मोठे केंद्रच बनले होते. पुर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजुला झाडे होती. तसेच गावकऱ्यांनी तात्पुरती दुकाने उभी केली होती.
तात्पुरती बैठक व्यवस्था कलिंगड उत्पादकांनी हायवेलगत केली होती. प्रवाशांच्या गाड्या यायच्या, येथे विसावा घ्यायच्या आणि कलिंगड खाऊन, खरेदी करून पुन्हा प्रवासाला मार्गी लागायच्या. तेव्हा येथे दुकांनांची संख्याही अधिक होती. सध्याही येथे सुमारे 30 दुकाने आहेत.
गेल्या काही वर्षात हा महामार्ग चौपदरी झाला आणि तेव्हापासून या गावाचे उत्पन्नही घटू लागले. कलिंगड विक्रेते हायवेलगत झाडाखाली कलिंगड विक्रीसाठी बसायचे. पण हा मार्ग चौपदरी झाल्यापासून येथे एकही गाडी थांबत नाही.
त्यामुळे येथील कलिंगड उत्पादकांना मोठा तोटा झाला आहे. हा मार्ग दुपदरी असताना येथील एका शेतकऱ्याची दिवसाची कमाई 5000 रूपये असायची. सध्या ती दिवसाकाठी 1500 रुपयांवर आली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.