रत्नागिरी: गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला आता गती मिळण्याची शक्यता आहे. कोकणवासीयांसाठी हा महामार्ग जीवनवाहिनी मानला जात असून, वर्षानुवर्षे सुरू असलेली प्रतिक्षा लवकरच संपुष्टात येईल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. रायगड जिल्ह्यातील महामार्गाच्या कामाची त्यांनी नुकतीच हवाई आणि प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी विविध अडचणींचा आढावा घेत कामांना गती देण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.
माणगाव येथील आनंद भुवन सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, महामार्गावरील अपूर्ण पूल, बाह्य वळणे आणि सर्व्हिस रोडसारखी प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावीत. यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून निधी न मिळाल्यास राज्य शासन स्वतः निधी पुरवेल, असं आश्वासनही त्यांनी दिले.
पर्यायी मार्गाचा विचार
माणगाव बायपास तातडीने पूर्ण होणे शक्य नसल्याने काही पर्यायी मार्गांचा विचार करण्यात आला आहे. इंदापूर ते कशेणे कालवा रोड, मोर्बा रोड, भादाव ते विंचवली मार्ग यासारख्या पर्यायांवर काम सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे पवार यांनी सांगितले.
नगरपंचायत हद्दीतील उपकालव्यासह पाटबंधारे विभागाच्या जागेतून मार्ग तयार केल्यास वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळू शकतो.
अजित पवार यांनी सांगितले की, केंद्र सरकारकडून निधी न मिळाल्यास राज्य शासन आवश्यक निधी उपलब्ध करून देईल. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर प्रस्ताव सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकमध्ये राहणारे अनेक कोकणी माणसं वर्षभरात अनेकदा आपल्या गावी ये-जा करत असतात. होळी, गणेशोत्सव, दिवाळी यांसारख्या सणांच्या काळात तर ही चाकरमानी मंडळी मोठ्या प्रमाणावर कोकणात परततात.
अशावेळी सध्याच्या अरुंद रस्त्यांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. अपघातांचाही धोका वाढतो. अशा परिस्थितीत हा महामार्ग सुलभ, जलद आणि सुरक्षित प्रवास करण्यास मोठी मदत होणार आहे.
कोकणात सिंधुदुर्ग किल्ला, गणपतिपुळे, मालवण, आंबोली, देवगड, विजयदुर्ग, राजापूर, दापोली, अलिबाग अशा अनेक ठिकाणांमध्ये स्थानिक आणि परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येतात.
मात्र, अपुऱ्या रस्ते सुविधा, वेळखाऊ प्रवास यामुळे अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण झाल्यास ही सर्व ठिकाणं अधिक सुलभतेने गाठता येतील, त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.