भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंड विरुद्ध रांचीमध्ये पार पडलेल्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात 5 विकेट्सने विजय मिळवला. भारताच्या या विजयात ध्रुव जुरेल, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल अशा युवा खेळाडूंनी मोलाचा वाटा उचलला.
त्याचे बक्षीस आता त्यांना मिळाले असून या तिघांनीही आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत सर्वोत्तम रेटींग पाँइंट्स मिळवले आहेत. या तिघांनीही रांची कसोटीत अर्धशतके केली होती.
कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत रांची कसोटीत इंग्लंडकडून शतक केलेल्या जो रुटने तिसरे स्थान पटकावले आहे. त्याने या कसोटीदरम्यान नाबाद 122 धावांची खेळी करताना 31 वे शतक केले होते. या यादीत न्यूझीलंडचा फलंदाज केन विलियम्सन अव्वल क्रमांकावर कायम आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर स्टीव्ह स्मिथ कायम आहे.
याशिवाय रांची कसोटीत पहिल्या डावात 73 धावांची खेळी करणाऱ्या यशस्वी जयस्वालने ३ स्थानांची प्रगती करत 727 रेंटिंग पाँइंट्ससह 12 वे स्थान पटकावले आहे. त्यामुळे त्याने रोहित शर्मालाही मागे टाकले आहे. रोहित 13 व्या क्रमांकावर आहे.
शुभमन गिलने 4 स्थानांची प्रगती करत 616 रेटिंग पाँइंट्ससह 31 वा क्रमांक मिळवला आहे. गिलने रांची कसोटीत दुसऱ्या डावात महत्त्वपूर्ण 52 धावांची नाबाद खेळी केली होती. तसेच या कसोटीतील सामनावीर ठरलेल्या जुरेलने तब्बल 31 स्थानांची प्रगती करत 461 रेटिंग पाँइंट्ससह 69 वा क्रमांक मिळवला आहे.
फलंदाजांच्या यादीत पहिल्या 10 मध्ये भारताचा केवळ विराट कोहली आहे. तो 9 व्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर या सामन्यात 42 आणि 60 धावांची खेळी करणाऱ्या इंग्लंडचा झॅक क्रावली आता 10 स्थानांनी पुढे येत 17 व्या क्रमांकावर आला आहे.
त्याचबरोबर जो रुटने केवळ फलंदाजीच नाही, तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतही तीन स्थानांची झेप घेत चौथा क्रमांक मिळवला आहे. या यादीत रविंद्र जडेजा अव्वल क्रमांकावर आणि आर अश्विन दुसऱ्या क्रमांकावर कायम आहेत. या यादीत भारताचा अक्षर पटेलही पाचव्या क्रमांकावर आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीत रांची कसोटीत विश्रांती दिल्यानंतरही जसप्रीत बुमराहने अव्वल क्रमांक कायम राखला आहे. तसेच रांची कसोटीत दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेणारा आर अश्विन गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे.
या क्रमवारीत कुलदीप यादवने 10 स्थांनांची प्रगती केली आहे. तो आता 32 व्या क्रमांकावर आला आहे, ही त्याची सर्वोत्तम क्रमवारी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.