WWE विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. आपल्या आक्रमक रेसलिंग शैलीने आणि दमदार व्यक्तिमत्त्वाने जगभरातील चाहत्यांच्या मनावर छाप पाडणारा सुपरस्टार ब्रॉन्सन रीडचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या निधनाच्या वृत्तामुळे WWE विश्वात शोककळा पसरली असून, चाहते आणि सहकारी रेसलर्सकडून दुःख व्यक्त केले जात आहे. रिंगमध्ये प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारणारा हा बलाढ्य रेसलर इतक्या कमी वयात जगाचा निरोप घेईल, अशी अपेक्षा कोणालाही नव्हती.
WWE ने सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्रॉन्सन रीडच्या निधनाची माहिती दिल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचे खरे नाव जर्मेन हॅली असे होते. WWE ने आपल्या पोस्टमध्ये त्याच्या रेसलिंगमधील योगदानासोबतच त्यांच्या वैयक्तिक स्वभावाचाही उल्लेख केला. रिंगमध्ये आक्रमक प्रतिस्पर्धी म्हणून ओळख असलेला ब्रॉन्सन प्रत्यक्ष आयुष्यात कुटुंबावर प्रेम करणारे आणि सहकाऱ्यांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व होते, असे WWE ने म्हटल्याचे वृत्त आहे.
त्याच्या पश्चात गर्भवती पत्नी पेज आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यामुळे त्याच्या निधनाच्या बातमीने कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. WWE ने त्याच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि चाहत्यांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत.
ब्रॉन्सन रीडचा WWE मधील प्रवास अनेकदा दुखापतींमुळे अडचणीत आला होता. त्याच्या कारकिर्दीत वेगवेगळ्या दुखापतींचा सामना करावा लागला. 7 नोव्हेंबर 2026 रोजी तो शेवटचा WWE च्या टेलिव्हिजन कार्यक्रमात दिसल्याची माहिती आहे. Crown Jewel या कार्यक्रमात त्यांची ओबा फेमी यांच्यासोबत चकमक झाली होती.
या कार्यक्रमादरम्यान ओबा फेमीन ब्रॉन्सनला स्टेजवरून खाली टेबलांच्या ढिगाऱ्यावर फेकल्याचे सांगितले जाते. या घटनेत त्यांच्या बरगड्या आणि किडनीला दुखापत झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांना सौदी अरेबियातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. 18 नोव्हेंबर रोजी तो उपचारानंतर अमेरिकेत परतला होता. मात्र, त्यानंतर त्याची प्रकृती खालावल्याचे वृत्त आहे.
ब्रॉन्सन रीडने WWE मध्ये आपल्या ताकदीच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याचा आक्रमक अंदाज आणि प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवण्याची क्षमता यामुळे ते चाहत्यांच्या पसंतीस उतरला. 2 नोव्हेंबर 2026 रोजी WWE Raw च्या भागात त्याने अखेरचा सामना खेळला होता.
या सामन्यात त्याने ब्रॉन ब्रेकर आणि ऑस्टिन थिअरीसोबत संघ तयार केला होता. सहा रेसलर्सच्या टॅग टीम सामन्यात त्यांनी ड्रॅगन ली, पेंटा आणि जे'व्हॉन इव्हान्स यांच्या संघाचा पराभव केला होता.
ब्रॉन्सन रीडच्या कारकिर्दीतील अनेक कामगिरी चाहत्यांच्या कायम स्मरणात राहतील. 2024 मध्ये त्याने आंद्रे द जायंट मेमोरियल बॅटल रॉयल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. याशिवाय NXT नॉर्थ अमेरिकन चॅम्पियनशिपही एकदा जिंकली होती.
त्याच्या निधनाच्या वृत्तामुळे WWE चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. रिंगमधील त्यांची आक्रमक शैली, दमदार खेळ आणि लक्षवेधी कामगिरी चाहत्यांच्या स्मरणात कायम राहील
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.