CSK Opener Ruturaj Gaikwad's Instagram post: चेन्नई सुपर किंग्सचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड सध्या त्याच्या मैदानावरील कामगिरीमुळे बराच चर्चेत आहे. त्याने सध्या सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत खेळताना शानदार कामगिरी बजावली आहे. तो चालू आयपीएल हंगामात चेन्नईकडून सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे.
पण, मैदानातील कामगिरीबरोबरच नुकतीच ऋतुराजने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले आहे. या पोस्टमध्ये त्याने एका मुलीचाही उल्लेख केला आहे. २६ वर्षीय ऋतुराज सोशल मीडियावरही बराच सक्रिय असतो.
त्याने नुकताच 20 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्सकडून 50 वा आयपीएल सामना खेळला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईने 77 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात ऋतुराजने केलेल्या 50 चेंडूतील 79 धावांच्या खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळवला.
या खास सामन्यानंतर त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने एका मुलीचाही उल्लेख केला असून तिचा फोटोही त्या पोस्टमध्ये शेअर केला आहे.
ऋतुराजने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की 'चेन्नई सुपर किंग्ससाठी 50 वा सामना. चेन्नई सुपर किंग्सचा भाग झाल्याचा अभिमान वाटतो. आम्ही प्लेऑफला गेल्याने आपल्यासाठी हा खास सामना होता. चेपॉकमध्ये भेटू.' या कॅप्शनमध्येच त्याने शेवटी लिहिले आहे की 'सरप्राईज भेटीसाठी थँक्यू @utkarshaaa13'.
तसेच त्याने शेअर केलेल्या या पोस्टच्या शेवटच्या फोटोमध्ये डेवॉन कॉनवेची पत्नी किम असून तिच्यासह एक मुलगी चेन्नईची जर्सी घातलेली दिसून येत आहे. तिला त्याने टॅग केले असल्याने ती उत्कर्षा असल्याचे स्पष्ट होत आहे.
पण त्याच्या याच पोस्टनंतर उत्कर्षा कोण आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. याच पोस्टच्या कमेंटमध्ये @utkarshaaa13 नावाच्या अकाउंटवरून कमेंट करण्यात आली आहे की 'तिथे असताना आणि तुला खेळताना पाहण्यात नेहमीच आनंद होतो.' या कमेंटवर ऋतुराजने हार्टचा इमोजी रिप्लाय केला आहे.
विशेष म्हणजे 20 मे रोजी झालेल्या सामन्यानंतर ऋतुराजने @utkarshaaa13 याच अकाउंटवरील एक स्टोरीही रिपोस्ट केली होती. त्याचमुळे सध्या ऋतुराज आणि उत्कर्षा यांच्यात नक्की काय नाते आहे, याबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, उत्कर्षाने ऋतुराजच्या पोस्टवर कमेंट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा तिने कमेंट केलेले दिसून येत आल्या होत्या.
ऋतुराजने आयपीएल 2023 स्पर्धेत आत्तापर्यंत 15 सामने खेळले असून 43.38 च्या सरासरीने 564 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 4 अर्धशतकांचा समावेश आहे. तो डेवॉन कॉनवेनंतर (625 धावा) यंदाच्या हंगामात चेन्नईकडून सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.