जून 2024 मध्ये टी20 वर्ल्डकप स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. आता या स्पर्धेसाठी तीन महिन्यापेक्षाही कमी वेळ राहिल्याने सहभागी संघाने त्यादृष्टीने तयारी करायला सुरुवात केली आहे. अशातच अशी माहिती समोर आली आहे की भारतीय संघाची निवड समिती विराट कोहलीबाबत कठोर निर्णय घेऊ शकते.
दरम्यान, आयसीसीच्या या स्पर्धेपूर्वी मार्च ते मे दरम्यान इंडियन प्रीमियर लीगचा 17 वा हंगाम खेळवला जाणार आहे. त्यामुळे जर विराटसाठी हा हंगाम अतिशय चांगला राहिला, तर मात्र तो हा वर्ल्डकप खेळण्याची शक्यता आहे, असे काही मीडिया रिपोर्ट्सनुसार सांगण्यात येत आहे.
जून 2024 मध्ये होणारी टी20 वर्ल्डकप स्पर्धा कॅरेबियन बेटे (वेस्ट इंडिज) आणि अमेरिकेत खेळवली जाणार असून 20 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
दरम्यान, या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार असल्याचे यापूर्वीच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले आहे. मात्र आता विराट कोहलीच्या समावेशाबाबत मात्र संभ्रम आहे.
मे महिन्याच्या सुरुवातीला आयसीसीकडे टी20 वर्ल्डकपसाठी संघातील खेळाडूंची प्राथमिक यादी सुपूर्त करायची आहे. त्यामुळे या टी20 वर्ल्डकपसाठी मे महिन्याच्या सुरुवातीला भारतीय संघाची निवड होऊ शकते.
द टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार एका सुत्राने सांगितले की भारतीय संघाने 2013 पासून एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. त्यामुळे अजित अगरकरच्या अध्यक्षतेखालील भारतीय संघाची निवड समिती काही कठोर निर्णय घेऊ शकतात, ज्यात विराटला वगळण्याचा निर्णयही सामील असू शकतो.
याशिवाय अशीही शक्यता वर्तवली जात आहे की वेस्ट इंडिजमध्ये असलेल्या धीम्या गतीच्या खेळपट्ट्यांवर विराटचा खेळ साजेसा नाही, त्यामुळेही त्याच्या भारतीय संघातील निवडीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच याबाबत विराटशी निवड समिती अध्यक्ष अजित अगरकर चर्चा करणार असल्याचेही म्हटले जात आहे.
मात्र, जर विराट आयपीएलमध्ये खूपच चांगला खेळला, तर मात्र त्याचा विचार आगामी टी20 वर्ल्डकपसाठी होऊ शकतो. निवड समितीच्या मते विराट टी20 क्रिकेट प्रकारात सध्या सर्वोत्तम कामगिरी करू शकत नाही.
दरम्यान, द टेलिग्राफच्या रिपोर्टमध्ये सुत्राने असेही सांगितले आहे की अनेकांना या प्रकरणात लक्ष घालायची इच्छा नाही. हा निर्णय निवड समितीवर आणि संघव्यवस्थापनेवर सोपवण्यात आला आहे.
आता निवड समिती मे महिन्यात काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.
विराट आणि रोहित यांनी 2022 टी20 वर्ल्डकपनंतर जवळपास 14 महिने भारताकडून टी20 क्रिकेट खेळले नव्हते. परंतु, जानेवारीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या टी20 मालिकेतून या दोघांनीही भारताच्या संघात पुनरागमन केले. पण विराटने या मालिकेत खेळलेल्या दोन सामन्यात फक्त 29 धावा केल्या होत्या.
दरम्यान, विराटला आगामी टी20 वर्ल्डकपमध्ये खेळवले नाही, तर भारताकडे त्याच्या जागेसाठी अनेक खेळाडूंचा पर्याय उपलब्ध आहे. सध्या यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर अशी अनेक नावांची चर्चा आहे.
तसेच सूर्यकुमार यादवलाही तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी बढती मिळू शकते. तसेच यष्टीरक्षक फलंदाज म्हणून पर्याय असलेल्या केएल राहुल, संजू सॅमसन आणि इशान किशन यांच्यापैकी देखील तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतात.
याशिवाय भारतीय टी20 संघात गेल्या काही सामन्यांमध्ये आपली क्षमता दाखवलेले रिंकू सिंग, शिवम दुबे असे खेळाडूही टी20 वर्ल्डकपमध्ये स्थान मिळवण्यासाठी उत्सुक असतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.