UAE मध्ये खेळल्या जात असलेल्या अंडर-19 आशिया कपमध्ये भारताने विजयाचा तिरंगा फडकावला आहे. यश धुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) अंडर-19 आशिया कप जिंकला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 9 गडी राखून पराभव केला. पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने (Sri Lanka) 38 षटकांत केवळ 106 धावा केल्या.
दरम्यान, प्रत्युत्तरात टीम इंडियाने केवळ एक गडी गमावून लक्ष्य गाठले. डकवर्थ-लुईस नियमानुसार, भारतीय संघाला 38 षटकांत 102 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी अंगक्रिश रघुवंशी आणि शेख रशीद यांच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर पूर्ण केले. भारताने अवघ्या 8 धावांत सलामीवीर हरनूर सिंगची विकेट गमावली होती, मात्र यानंतर अंगक्रिश रघुवंशीने नाबाद 56 आणि शेख रशीदने नाबाद 31 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 96 धावांची अजिंक्य भागीदारी झाली.
भारतीय संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरले ते गोलंदाज. विशेषत: डावखुरा फिरकी गोलंदाज विकी ओस्तवाल आणि ऑफस्पिनर कौशल तांबे यांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना पळता भुई थोडे केले. विकी ओस्तवालने 8 षटकात केवळ 11 धावा देत 3 बळी घेतले. त्याने 3 ओव्हर मेडन्स टाकल्या. कौशल तांबेनेही 6 षटकांत 23 धावा देत 2 बळी घेतले. राज्यवर्धन, रवी कुमार आणि राज बावा यांनी 1-1 बळी घेतला.
भारत 8व्यांदा चॅम्पियन झाला
अंडर-19 आशिया चषक (U19 Asia Cup) स्पर्धेत भारतीय संघाचे वर्चस्व कायम आहे. टीम इंडियाने 8व्यांदा आशिया कप जिंकला. भारताने पहिल्यांदा ही स्पर्धा १९८९ मध्ये जिंकली होती. यानंतर 2003 मध्ये तो पुन्हा चॅम्पियन बनला. 2012 मध्ये त्याने ट्रॉफी पाकिस्तानसोबत शेअर केली होती. यानंतर 2013, 2016 मध्येही भारताने ही स्पर्धा जिंकली होती. 2017 मध्ये अफगाणिस्तान आशियाचा बॉस बनला. आता टीम इंडियाने 2018, 2019 आणि आता 2021 मध्ये आशिया कप चॅम्पियन बनून विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे.
अंडर-19 आशिया कपमध्ये भारताचा प्रवास
भारताने या स्पर्धेत 5 सामने खेळले आणि फक्त एकच पराभव पत्करावा लागला. भारताने पहिल्या सामन्यात यजमान यूएईचा 154 धावांनी पराभव केला. यानंतर त्यांना पाकिस्तानविरुद्ध 2 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. यानंतर टीम इंडियाने चांगले पुनरागमन करत अफगाणिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. उपांत्य फेरीत त्याने बांगलादेशचा एकतर्फी 103 धावांनी पराभव केला आणि अंतिम फेरीत त्याने श्रीलंकेचा 9 गडी राखून पराभव करून 8व्यांदा आशिया कप ट्रॉफी जिंकली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.