Sunil Gavaskar: क्रिकेट जगतात लिटल मास्टर अशी ओळख मिळवलेल्या सुनिल गावस्करांचा आज 74 वा वाढदिवस आहे. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुनिल गावस्करांच्या आयुष्यातील काही आश्चर्य वाटायला भाग पाडणाऱ्या आणि काही गमतीदार गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.
सुनिल गावस्करांचे मैदानातले किस्से जगप्रसिद्ध आहे मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अशी एक गोष्ट आहे जी फार कमी लोकांना माहीत असेल. सुनिल गावस्करांच्या जन्मानंतर घडलेल्या घटनेने त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलवले असते.
गावस्कर या घटनेबद्दल बोलताना म्हणतात की, ज्यांना मी नन काका म्हणायचो ते रोज हॉस्पीटलमध्ये मला बघण्यासाठी येत असत. त्यांनी माझ्या कानावर एक बर्थमार्क पाहिला होता. ते जेव्हा दुसऱ्या दिवशी हॉस्पीटलमध्ये मला बघण्यासाठी आले तेव्हा तो मार्क त्यांनी हातात घेतलल्या बाळाच्या कानावर त्यांना दिसला नाही.
मग त्यांनी संपूर्ण हॉस्पीटलभर त्या बाळाचा शोध घेतला आणि तो मार्क असलेले बाळ त्यांना एका मासेमाऱ्याच्या पत्नीजवळ झोपलेले दिसले. पुढे ते म्हणतात, हॉस्पीटलच्या नर्सकडून चुकून अंघोळ घालताना आमची अदलाबदल झाली होती.
जर माझ्या काकांनी लक्ष दिले नसते तर मी क्रिकेटर नाही मासेमारी करत असतो. ते त्यांच्या ऑटोबायोग्राफी 'Sunny Days' म्हणतात, जर माझ्या आयुष्यात तेज नजरेचे नारायण मासुरकर नसते तर मी कधीच क्रिकेटर बनू शकलो नसतो आणि हे पुस्तकसुद्धा लिहले नसते.
सुनिल गावस्करांच्या क्रिकेट करियरमध्ये त्यांचे वडील मनोहर गावस्कर यांच्यासोबतच आई मीनल यांचेदेखील मोठे योगदान असल्याचे म्हटले जाते.
दरम्यान, सुनील गावस्कर यांनी 1971 साली वेस्ट इंडिज दौऱ्यावर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्या पदार्पणाच्या मालिकेत गावसकरांनी 4 कसोटी सामन्यांमध्ये विक्रम करत 774 धावा काढल्या होत्या.
यादरम्यान गावस्कर यांची सरासरी 154.80 होती. पदार्पणाच्या मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा आजही हा जागतिक विक्रम आहे. सुनिल गावस्करांनी 47 टेस्ट आणि 37 वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाची कॅप्टन्सी केली आहे.
गावस्करांच्या कॅप्टन्सीच्या कालावधीत टेस्ट क्रिकेटमध्ये भारताने 9 सामने जिंकले आहेत तर 8 सामन्यात संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. याशिवाय 30 टेस्ट मॅच ड्रॉ झाले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.