पणजी: राज्य सरकारने पाठिंब्याबाबत सातत्याने डावलल्याची खंत बाळगून अमेरिकेत गेलेला गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्कॉशपटू यश फडते तेथे चांगलाच रुळला आहे. पहिल्याच वर्षी त्याने न्यूयॉर्कमधील रॉचस्टर विद्यापीठाचा वर्षातील सर्वोत्तम नवोदित स्कॉशपटू किताब पटकावला. (Squash player Yash Phadte disappointed with Goa government playing in America)
वीस वर्षीय यशला रॉचस्टर विद्यापीठाकडून चार वर्षांची क्रीडा शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्यांअतर्गत तो गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तेथील शैक्षणिक अभ्यासक्रमात दाखल झाला, सोबत स्क्वॉश प्रशिक्षणही सुरू झाले. क्रीडा सुविधांबाबत हे विद्यापीठ अमेरिकेत प्रमुख गणले जाते. विद्यापीठास सुट्टी असल्याने तो सध्या गोव्यात परतला आहे.
सरकारकडून अपमानजनक वागणूक
यशने सांगितले, की ‘‘राज्य सरकारकडून पाठिंबा आणि प्रोत्साहनाचा अभाव, अपमानजनक वागणूक यामुळे मी दुखावलो गेलो. कारकिर्दीबाबत निर्णायक टप्प्यावर असताना रॉचस्टर विद्यापीठाकडून क्रीडा शिष्टवृत्तीचे पत्र आले. तेथे दर्जेदार स्क्वॉश प्रशिक्षणाचीही सुविधा होती. गोव्यात स्क्वॉश खेळाच्या पायाभूत सुविधांचा अभाव आहे. राज्य सरकार सातत्याने दुर्लक्ष करत होते. त्यामुळेच मी अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच वर्षी मी तेथील क्रीडा वातावरणात रुळलो. कामगिरीत खूप सुधारणा झाली. आता नवा आत्मविश्वास गवसला असून ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याबाबत विश्वास वाटतोय.’’
राष्ट्रीय पुरस्कारासाठी दुर्लक्ष
यश फडते याने दिलेल्या माहितीनुसार, 2020 मधील प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी त्याने अर्ज केलेला होता. तेव्हा राज्य सरकारने त्याची पाठराखण केली नाही. ‘‘राज्य सरकारने माझ्या अर्जाकडे दुर्लक्ष केले. सफल कामगिरी सोबत असूनही डावलण्यात आले. ती घटना माझ्यासाठी खूपच धक्कादायक होती, मी खूपच निराश झालो होतो,’’ अशी प्रतिक्रिया यशने दिली.
आशियाई स्पर्धेचे लक्ष्य
रॉचस्टर विद्यापीठास सध्या उन्हाळी सुट्टी आहे. येत्या ऑगस्टमध्ये यश पुन्हा न्यूयॉर्कला रवाना होईल. तो आता इजिप्तमधील प्रगत प्रशिक्षणास जाणार आहे, त्यानंतर चेन्नई येथे होणाऱ्या भारतीय सीनियर संघ निवड चाचणी स्पर्धेतही भाग घेईल. जुलैमध्ये दक्षिण कोरियात होणाऱ्या आशियाई सांघिक स्क्वॉश स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळविण्याचे त्याचे लक्ष्य आहे.
अव्वल ज्युनियर स्कॉशपटू
राष्ट्रीय ज्युनियर स्क्वॉश स्पर्धेत यशने विजेतेपद मिळविले आहे. शिवाय फ्रान्स, अमेरिका, जर्मनीत त्याने ज्युनियर स्क्वॉशमध्ये मुलांचा किताब जिंकला. कोविडमुळे देशातील स्क्वॉश क्षेत्र ठप्प झाले, त्यापूर्वी तो भारताचा अव्वल मानांकित ज्युनियर स्क्वॉशपटू होता. ‘‘कोविडमुळे स्क्वॉश थांबले, सारे वेळापत्रक विस्कळित झाले. परिस्थिती पूर्वपदावर येत ही समाधानाची बाब आहे. मी आता सीनियर गटात खेळणार आहे. पूर्वीप्रमाणे भरारी घेण्याचे ध्येय आहे,’’ असे यश भावी कारकिर्दीविषयी म्हणाला.
यश फडतेची सफल ज्युनियर कारकीर्द
- 2018 मध्ये यूएस ज्युनियर ओपन स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय स्क्वॉशपटू
- आशियाई ज्युनियर स्पर्धेत 3 पदके, 2014 मध्ये रौप्य, 2016 मध्ये ब्राँझ, 2019 मध्ये रौप्य
- 2016, 2019 मध्ये जागतिक ज्युनियर स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व, 2019 मध्ये स्पर्धेतील सर्वोत्तम भारतीय खेळाडू
- 2014 मध्ये युरोप, आशिया व भारतातील अव्वल मानांकित स्क्वॉशपटू
- इंडियन ज्युनियर ओपन स्पर्धेत 2014, 2015, 2017, 2018, 2019 मध्ये विजेता
- राष्ट्रीय ज्युनियर स्पर्धेत 2014, 2016, 2019 मध्ये विजेतेपद
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.