Spanish football player Iker Guarrotxena : इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत गतमोसमात एफसी गोवाच्या आक्रमणात यशस्वी ठरलेला स्पॅनिश खेळाडू इकेर ग्वॉर्रोचेना (Iker Guarrotxena) याने करार न वाढविण्याचे ठरविल्यानंतर परस्पर सामंजस्याने एकमेकांचा निरोप घेण्यावर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले.
ग्वॉर्रोचेनाच्या निर्णयाविषयी एफसी गोवाने सोशल मीडिया हँडलवर शुक्रवारी माहिती दिली. वैयक्तिक कारणास्तव ग्वॉर्रोचेना याने संघात न परतण्याविषयी एफसी गोवाला कळविले. त्यानंतर विचारांती दोन्ही बाजूकडून वेगळे होण्याचा निर्णय सामंजस्याने घेण्यात आला, असे एफसी गोवाने स्पष्ट केले.
गतमोसमात ग्वॉर्रोचेना याने एफसी गोवासाठी आयएसएल स्पर्धेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. या ३० वर्षीय खेळाडूने २० सामन्यांत ११ गोल नोंदवून एफसी गोवातर्फे सर्वोत्तम कामगिरी नोंदविली. त्याबद्दल क्लबने खेळाडूचे आभार मानले.
‘‘त्याची व्यावसायिकता आणि खिलाडूवृत्ती सदैव जपली जाईल,’’ असे एफसी गोवाने संदेशात म्हटले आहे. त्यापूर्वी, शुक्रवारी ग्वॉर्रोचेना याने सोशल मीडियावरील संदेशाद्वारे आपण एफसी गोवातर्फे खेळणार नसल्याचे जाहीर केले.
‘‘क्लबशी संबंधित सर्व लोकांचे आभार मानताना मला आनंद होतोय, ज्यांनी मागील वर्षभरातील कालावधी माझ्यासाठी आतापर्यंतच्या कारकिर्दीत सर्वांत यशस्वी बनविला. नम्र आणि प्रेमळ लोकांसह मी एक मोठे आणि मजबूत कुटुंब सोडले आहे. सतत संघाला पाठिंबा दिलेल्या गोव्यातील चाहत्यांना धन्यवाद,’’ असे ग्वॉर्रोचेना याने नमूद केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.