रणजी ट्रॉफी 2023-24 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारपासून (10 मार्च) मुंबई विरुद्ध विदर्भ या संघात सुरू झाला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या या अंतिम सामन्यात मुंबईच्या शार्दुल ठाकूरने मैफल लुटली आहे.
वेगवान गोलंदाज शार्दुलने गेल्या काही वर्षात तो चांगली फलंदाजीही करू शकतो, हे दाखवले आहे. त्याचाच प्रत्येय त्याने विदर्भ विरुद्धच्या अंतिम सामन्यातही तडाखेबंद अर्धशतक करत दिला आहे.
या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर मुंबईला पृथ्वी शॉ (46) आणि भूपेन ललवानी (37) यांनी 81 धावांची सलामी भागीदारी करत चांगली सुरुवात दिली होती. परंतु, मुंबईची मधली फळी कोलमडली.
त्यामुळे 81 धावांवर 1 बाद वरून मुंबईची अवस्था 111 धावांवर 6 विकेट्स अशी झाली होती. परंतु नंतर शम्स मुलानीला साथ देण्यासाठी शार्दुल ठाकूर आला. त्याने फार वेळ न घेता विदर्भाच्या गोलंदाजीवर आक्रमण करण्यास सुरुवात केली.
त्याला शम्स मुलानीनंतर (13) तनुष कोटीयन (8) आणि तुषार देशपांडे (14) यांनी साथ देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या विकेट्सही स्वस्तात गेल्या. परंतु, समोरून विकेट्स गेल्या, तरी शार्दुलने आपला आक्रमक अंदाज कायम ठेवत 37 चेंडूत अर्धशतक झळकावलं.
अखेर त्याची ही तुफानी खेळी उमेश यादवने 65 व्या षटकात संपवली. त्यामुळे मुंबईचा पहिला डावही 64.3 षटकात 224 धावांवर संपला. शार्दुलने 69 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारांसह 75 धावा केल्या.
विदर्भकडून गोलंदाजी करताना पहिल्या डावात हर्ष दुबे आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
दरम्यान, शार्दुलने नंतर गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली. त्याने विदर्भाच्या पहिल्या डावात सलामीवीर ध्रुव शोरेला पायचीत करत मुंबईला पहिले यश मिळवून दिले होते.
विदर्भाचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी अवघ्या 105 धावातच संपुष्टात आला. त्यामुळे मुंबईला 119 धावांची आघाडी मिळाली.
दरम्यान, शार्दुलने तमिळनाडू विरुद्ध झालेल्या रणजी ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात शतक देखील केले होते. त्याने 105 चेंडूत 109 धावांची खेळी करताना 13 चौकार आणि 4 षटकार मारले होते. इतकेच नाही, तर त्याने दोन्ही डावात मिळून 4 विकेट्सही घेतल्या होत्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही मिळाला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.