Shafali Verma Birthday: भारताचा 19 वर्षांखालील महिला संघ दक्षिण आफ्रिकेत होत असलेला पहिला 19 वर्षांखालील महिला टी20 वर्ल्डकप खेळण्यात व्यस्त आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम सामन्यातही धडक मारली असून भारताला रविवारी इंग्लंडविरुद्ध विश्वविजेतेपदासाठी दोन हात करायचे आहेत.
दरम्यान, या अंतिम सामन्यापूर्वी शनिवारी 19 वर्षांखालील भारतीय महिला संघाची कर्णधार शफाली वर्माने तिचा 19 वा वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसानिमित्त भारतीय संघातील खेळाडूंनी तिला शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनवेळी भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राही उपस्थित होता.
नीरजची विशेष उपस्थिती
शफालीने शनिवारी भारतीय खेळाडूंच्या उपस्थितीतमध्ये केक कापत वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले. यावेळी नीरजही तिथे होता. केक कापल्यानंतर शफाली आणि त्याने एकमेकांना केक भरवला. शफालीच्या वाढदिवसाच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे.
तसेच शफालीनेही या सेलिब्रेशनदरम्यानचा व्हिडिओ शेअर केला असून तिने तिला दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार मानले आहेत. तसेच तिने तिचा वाढदिवस आणखी खास करण्याबद्दल नीरज चोप्राचेही आभार मानले आहेत.
(Shafali Verma's Birthday Celebration in presence of Neeraj Chopra)
नीरजने दिले भारतीय संघाला प्रोत्साहन
दक्षिण आफ्रिकेत वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळण्यापूर्वी 19 वर्षांखालील भारतीय महिला संघाची भेट घेण्यासाठी नीरज शनिवारी गेला होता. यावेळी त्याने संपूर्ण संघाला काही सल्ले दिले. तसेच त्यांना अंतिम सामन्यासाठी आत्मविश्वास आणि प्रोत्साहन दिले.
तो भारतीय खेळाडूंशी संवाद साधतानाचे फोटोही बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याचदिवशी शफालीचा वाढदिवसही असल्याने तो तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाला होता.
नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक जिंकले आहे. तो ऍथलेटिक्समध्ये वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा भारताचा पहिला खेळाडू आहे.
भारतीय संघाला खेळायचाय अंतिम सामना
यावर्षी पहिल्यांदाच 19 वर्षांखालील महिला टी20 वर्ल्डकप खेळवण्यात येत आहे. त्यामुळे या स्पर्धेचा पहिला अंतिम सामना खेळण्याचा मान भारत आणि इंग्लंड या संघांना मिळाला आहे. हा अंतिम सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 5.15 वाजता पॉचेफस्ट्रूम येथे सुरू होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.