India vs Afghanistan U19 ODI at Johannesburg, Saumy Pandey 6 Wickets with Hat-Trick:
भारताचा 19 वर्षांखाली क्रिकेट संघही सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात सध्या भारत, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्या 19 वर्षांखालील संघात तिरंगी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानला ६ विकेट्सने पराभूत केले आहे. या विजयात सौम्य पांडेने हॅट्रिकसह 6 विकेट्स घेत मोलाचा वाटा उचलला.
जानेवारी 2024 मध्ये सुरु होणाऱ्या 19 वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची मानली जात आहे.
जोहान्सबर्गला भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने भारतासमोर 199 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग भारताने 36.4 षटकात 4 बाद 202 धावा करत पूर्ण केला.
भारताकडून आदर्श सिंगने नाबाद 112 धावांची शतकी खेळी केली. 108 चेंडूत 15 चौकार आणि 2 षटकार मारले. तसेच अर्शिन कुलकर्णीने 20 धावा केल्या. त्याचबरोबर मुशीर खानने 39 धावांची नाबाद खेळी केली.
अफगाणिस्तानकडून गोलंदाजी करताना अल्ला घजनफरने 2 विकेट्स घेतल्या. तसेच बाशिर अहमद आणि नासिर हसन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
तत्पुर्वी, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अफगाणिस्तान संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. अफगाणिस्तीनने पहिल्याच षटकात वफ्युल्ला ताराखिलची विकेट शुन्यावर गमावली.
मात्र नंतर मोहम्मद नबीचा मुलगा हसन एसाखिल आणि जमशिद झाद्रान यांनी 85 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. आक्रमक खेळणाऱ्या हसनला मुरुगम अभिषेकने बाद केले. हसनने 40 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 54 धावांची खेळी केली.
त्यानंतर लगेचच 17व्या षटकात सौम्य पांडेने तिसऱ्या चेंडूवर जमशिद झाद्रानला 26 धावांवर बाद केले. त्याच्या पुढच्याच सलग दोन चेंडूंवर त्याने नुमन शाह आणि रहिमुल्लाह झुर्मती यांना बाद करत हॅट्रिक पूर्ण केली. 19 व्या षटकाच सौम्य पांडेनेच नासीर हसनलाही 1 धावेवर बाद केले.
मात्र यानंतर कर्णधार नासीर खान माफुफखिलने सोहेल खानला दमदार साथ दिली. त्यांच्यात 79 धावांची भागीदारी झाली. त्यामुळे अफगाणिस्तानने 170 धावांचा टप्पा सहज पूर्ण केला. अखेर सौम्य पांडेनेच 44 व्या षटकात नासीरला 25 धावांवर बाद करत अफगाणिस्तानला ७ वा धक्का दिला.
त्यानंतर अल्लाह घजनफरला राज लिंबानीने बाद केले, तर खलील अहमदला पांडेने त्रिफळाचीत केले. अखेर अर्धशतकी खेळी केलेल्या सोहेल खानला नमन तिवारी आणि पांडेने मिळून धावबाद करत अफगाणिस्तानचा डाव संपवला.
सोहेलने 112 चेंडूत 71 धावांची खेळी केली. यात 4 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. त्याच्या या खेळीमुळे अफगाणिस्तानने 48.2 षटकात सर्वबाद 198 धावा केल्या.
भारताकडून गोलंदाजीत सौम्य पांडेने 6 विकेट्स घेतल्या, तर राज लिंबानीने 2 विकेट्स घेतल्या आणि मुरुगन अभिषेकने 1 विकेट घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.