Bangladesh won Under19 Asia Cup 2023:
दुबईमध्ये नुकताच 19 वर्षांखालील आशिया चषक खेळवण्यात आला. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (17 डिसेंबर) बांगलादेश विरुद्ध संयुक्त अरब अमिराती (UAE) संघात पार पडला. अंतिम सामन्यात बांगलादेशने तब्बल 195 धावांनी विजय मिळवत पहिल्यांदाच 19 वर्षांखालील आशिया चषकावर नाव कोरले.
या सामन्यानंतर सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कार आशिकूर रेहमान शिबलीने जिंकला. त्याने बांगलादेशला ही स्पर्धा जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात बांगलादेशने युएईसमोर 283 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, युएईचा संघ 24.5 षटकात 87 धावांवरच सर्वबाद झाला.
युएईकडून ध्रुव पराशरने सर्वाधिक 25 धावांची नाबाद खेळी केली. तसेच अक्षत रायने 11 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त एकालाही 10 धावांचा टप्पा पार करता आला नाही. त्यामुळे संघाला 100 धावांचा टप्पाही पार करता आला नाही.
बांगलादेशकडून गोलंदाजीत मारुफ मृधा आणि रोहनत डौल्ला बोरसन यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच इक्बाल हुसेन इमॉन आणि शेख परवेझ जिबॉन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
तत्पुर्वी, युएईने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. त्यांनी सलामीवीर जिशन आलमची विकेट 7 धावांवरच गमावली.
पण त्यानंतर आशिकूर रेहमान शिबलीने चौधरी मोहम्मद रिझवानला साथीला घेत शतकी भागीदारी केली. पण ही भागीदारी अयमन अहमदने तोडली. त्याने रिझवानला 60 धावांवर बाद केले. असे असले तरी नंतर अरिफूल इस्लामनेही शिबलीला चांगली साथ दिली. त्यांच्यातही 86 धावांची भागीदारी झाली.
मात्र अरिफूल इस्लाम 50 धावांवर बाद झाला. त्यानंतर मात्र बांगलादेशची मधली फळी झटपट बाद झाली. अखेरीस कर्णधार मेहरुफ रेहमान रब्बी याने थोडी झुंज दिली. मात्र शेवटच्या षटकात बांगलादेशने तीन विकेट्स गमावल्या.
यात शिबलीही अखेरच्या षटकात बाद झाला. त्याने 149 चेंडूत 129 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 1 षटकार मारला. मेहरुफने 21 धावा केल्या. त्यामुळे बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 282 धावा केल्या.
युएईकडून अयमन अहमदने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच ओमिद रेहमानने 2 विकेट्स घेतल्या, तर हार्दिक पै आणि ध्रुव पराशर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.