जानेवारी २०२४ महिन्यात एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता, ज्यावर खुद्द मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील प्रतिक्रिया दिली होती. हा व्हिडिओ होता जम्मू-काश्मीरचा क्रिकेटपटू अमीर हुसेन लोनचा. एका अपघातात त्याने दोन्ही हात गमावले असतानाही क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवली. त्याला नुकतीच सचिनने भेट दिली आहे.
सचिन सध्या कुटुंबासह जम्मू-काश्मीरला सहलीसाठी गेला आहे. त्याच्या या सहलीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ तो सोशल मीडियावरही शेअर करत आहे. याच सहलीदरम्यान, सचिनने अमीरचीही भेट घेतली. त्याचा व्हिडिओही त्याने शेअर केला आहे.
34 वर्षीय अमीर जम्मू-काश्मीर पॅरा क्रिकेट संघाचा कर्णधार असून पायाने गोलंदाजी करतो आणि मान व खांद्याच्या मध्ये बॅट धरून फलंदाजी करतो.
अमीर असाच सचिनच्या नावाची जर्सी घालून क्रिकेट खेळत असतानाचा व्हिडिओ एएनआयने जानेवारीमध्ये पोस्ट केला होता, ज्यावर सचिननेही कमेंट करताना लिहिले होते की त्याला पाहून तो भारावला आहे. त्याचबरोबर सचिनने तेव्हा त्याच्या ट्वीटमध्ये लिहिले होते की तो एकदिवस अमीरची भेट घेईल आणि त्याच्या नावाची जर्सी घेईल.
आता सचिनने त्याचा शब्द पाळला असून त्याने अमीरसह त्याच्या कुटुंबियांचीही भेट घेतली. इतकेच नाही, तर त्यांना बॅटही स्वाक्षरी करून भेट दिली. त्याच्या भेटीचा जो व्हिडिओ सचिनने शेअर केला आहे, त्यात दिसते की सचिनला भेटून त्याला खूप आनंद झाला आहे.
तसेच अमीरने सचिनला भेटल्यानंतर त्याच्या प्रवासाबद्दल सांगितले. त्याचबरोबर त्याने सांगितले की त्याला नेहमीच सचिनमुळे प्रेरणा मिळाली आहे.
हे एकून सचिन अमीरला म्हणाला, 'तू जे केले आहेस, ते कोणी करू शकत नाही. म्हणून मी तुला अपघातावेळीचे वय विचारले. साधारण 8 वर्षांचा असताना तुझा अपघात झाला, असे असतानाही अशा आव्हानांचा सामना करून आणि मानसिक आघातातून बाहेर येऊन आयुष्यात पुढे जाणे, दुसऱ्यांसाठी प्रेरणा बनणे, हे खूप मोठे यश आहे. तुला कदाचित माहित नसेल की तू काय केले आहेस.'
हे ऐकून अमीर भारवला होता आणि त्याच्या डोळ्यातूनही पाणी आले होते. ते पाहून सचिनने त्याला सावरले आणि त्याला स्वाक्षरी करत बॅट भेट दिली आणि त्याला म्हणाला, 'तू खरा हिरो आहेस.'
इतकेच नाही तर सचिनने अमीरकडून तो कशाप्रकारे फलंदाजीचा स्टान्स घेतो हे देखील जाणून घेतले आणि त्याच्याबरोबर फॉरवर्ड डिफेन्सच्या फटक्याची कृती केली. यानंतर सचिनने अमीरच्या कुटुंबियांचीही भेट घेतली.
अमीरने 1997 साली त्याच्या कुटुंबाच्या सॉमिलमध्ये झालेल्या अपघातात दोन्ही हात गमावले होते. पण त्यानंतर त्याने 2013 साली क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. तो अजूनही क्रिकेट खेळत असतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.