FIFA World Cup 2022: कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 स्पर्धेत रविवारी मोरोक्कोने बेल्जियमला 2-0 अशा फरकाने पराभवाचा जोरदार धक्का दिला. फिफा रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या बेल्जियमला अशा प्रकारे हार पत्करावी लागल्याने बेल्जियम आणि नेदरलँड्सच्या काही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात दंगली उसळल्या होत्या.
दंगलखोरांनी कार, इलेक्ट्रिक स्कूटर पेटवल्या. त्याचबरोबर गाड्यांवर दगडफेक केली. याबद्दल ब्रुसेल्स पोलिसांकडून सांगण्यात आले. बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये दंगलीदरम्यानचा जमाव पांगवण्यासाठी पाण्याचा फवारा करण्यात आला. तसेच टिअर गॅसही वापरण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी डझनभर लोकांना ब्रुसेल्समधून, तर अँटवर्पमधून आठ जणांना ताब्यात घेतले आहे.
त्याचबरोबर या दंगलींदरम्यान नेदरलँड्समधील रॉटरडॅममध्ये दोन पोलीस अधिकारी जखमीही झाले. या दंगलींच्या परिणामांमुळे रविवारी रात्री बेल्जियम आणि नेदरलँड्समधील अनेक ठिकाणी अस्वस्थ वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, या दंगलींमुळे ब्रुसेल्सचे महापौर फिलिप क्लोज यांनी नागरिकांना मुख्य केंद्रांपासून दूर राहा, असे आवाहन केले. त्याचबरोबर त्यांनी असेही सांगितले की सुव्यवस्था राहावी म्हणून अधिकारी सर्व प्रयत्न करत आहेत. या घटनांमुळे वाहतूकही खंडीत करायला लागलेली.
मोरोक्को विरुद्ध झालेला बेल्जियमचा (Belgium vs Morocco) पराभव फिफा वर्ल्डकप 2022 मधील (FIFA World Cup 2022) मोठा धक्का मानला जात आहे. कारण बेल्जियम विजयाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक संघ म्हणून या स्पर्धेत दाखल झाला होता.
या सामन्यात पुर्णवेळेत मोरक्को संघाने 1-0 अशी आघाडी घेतली होती. भरपाई वेळेत मोरक्कोच्या झकारिया अबुखलाल याने आणखी एक गोल नोंदवून मोरक्कोची आघाडी 2-0 अशी वाढवली. त्यानंतर बेल्जियमला पुनरागमनाची संधी नव्हती. त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
त्यामुळे आता ग्रुप एफ मधून अंतिम 16 संघांमध्ये स्थान मिळवायचे असेल, तर बेल्जियमला 1 डिसेंबर रोजी क्रोएशियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजय आवश्यक आहे. सध्या बेल्जियम या ग्रुपमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असून क्रोएशिया अव्वल क्रमांकावर आहे आणि मोरोक्को दुसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकावर कॅनडा आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.