Rinku Singh KKR Captain Dainik Gomantak
क्रीडा

फिनिशर आता बनणार थेट कर्णधार! IPL 2027 मध्ये रिंकू सिंहच्या हाती KKR ची कमान? दिग्गजांची मोठी भविष्यवाणी

Rinku Singh KKR Captain: आयपीएल २०२७ च्या हंगामाआधी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघात नेतृत्वबदलाची चर्चा रंगू लागली आहे.

Sameer Amunekar

आयपीएल २०२७ च्या हंगामाआधी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघात नेतृत्वबदलाची चर्चा रंगू लागली आहे. तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या केकेआरला आगामी हंगामासाठी नव्या कर्णधाराचा शोध घ्यावा लागू शकतो. अशा परिस्थितीत भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज रिंकू सिंह याचे नाव कर्णधारपदासाठी चर्चेत आले आहे. भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाण आणि माजी सलामीवीर आकाश चोप्रा यांनी रिंकूच्या नावाला पसंती दर्शवली आहे. त्यामुळे आगामी हंगामात रिंकूच्या हाती केकेआरची धुरा सोपवली जाणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

रिंकू सिंहकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्याची शक्यता

केकेआरच्या नेतृत्वाबाबत बोलताना इरफान पठाणने रिंकू सिंह हा सध्याच्या परिस्थितीत संघासाठी योग्य पर्याय असल्याचे मत व्यक्त केले. त्याच्या मते, संघाकडे नेतृत्वासाठी फारसे पर्याय उपलब्ध नसल्याने रिंकूच्या नावाचा गांभीर्याने विचार होऊ शकतो. यापूर्वी त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे संघातील खेळाडू आणि व्यवस्थापनाशी असलेली त्याची जवळीक त्याच्या दाव्याला बळ देऊ शकते.

इरफान पठाणच्या मते, केकेआर व्यवस्थापनाच्या निर्णयप्रक्रियेचा विचार करता रिंकूला कर्णधार बनवण्याची शक्यता अधिक वाटते. मात्र, फ्रँचायझी मिनी लिलावातून एखाद्या अनुभवी खेळाडूला खरेदी करून त्याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी देण्याचाही पर्याय खुला ठेवू शकते.

Rinku Singh KKR Captain

शाई होपचाही कर्णधारपदासाठी पर्याय

रिंकू सिंहच्या नावाला पसंती देतानाच इरफान पठाण यांनी वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक फलंदाज शाई होप याचाही उल्लेख केला. त्याच्या मते, केकेआरला लिलावातून कर्णधारपदासाठी अनुभवी खेळाडू हवा असल्यास शाई होपचा विचार करता येऊ शकतो. भारताविरुद्धच्या मालिकेत त्याने केलेल्या कामगिरीचाही पठाणने संदर्भ दिला.

मात्र, केकेआर व्यवस्थापनाची कार्यपद्धती पाहता रिंकू सिंहलाच नेतृत्वाची संधी मिळू शकते, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे मिनी लिलावात केकेआर कोणत्या खेळाडूंवर बोली लावते आणि कर्णधारपदासाठी कोणता निर्णय घेते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

आकाश चोप्रांनीही रिंकूच्या नावाला दिली पसंती

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रानेही केकेआरच्या कर्णधारपदासाठी रिंकू सिंहचे समर्थन केले आहे. मागील हंगामात रिंकूकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी होती. त्यामुळे त्याला थेट कर्णधारपद देणे हा संघासाठी योग्य निर्णय ठरू शकतो, असे चोप्राचे मत आहे.

याशिवाय त्यांनी सुनील नरेन याचाही पर्याय म्हणून उल्लेख केला. नरेनला यापूर्वी नेतृत्वाचा अनुभव असल्याने त्याच्याकडेही ही जबाबदारी सोपवता येऊ शकते. मात्र, रिंकूला उपकर्णधारपदाचा अनुभव असल्याने त्याचा दावा अधिक मजबूत असल्याचे चोप्राने स्पष्ट केले.

कॅमेरून ग्रीनला रिटेन करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

दरम्यान, आकाश चोप्राने केकेआरच्या संघबांधणीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन याला २५.२० कोटी रुपयांमध्ये रिटेन करण्याच्या निर्णयाबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यांच्या मते, एवढी मोठी रक्कम एका खेळाडूसाठी राखून ठेवल्यामुळे लिलावात इतर खेळाडूंवर बोली लावण्याची केकेआरची क्षमता मर्यादित होऊ शकते.

चोप्राच्या मते, ग्रीनला रिलीज केले असते तर केकेआरकडे लिलावासाठी अधिक रक्कम उपलब्ध झाली असती. त्यानंतर त्याला तुलनेने कमी किमतीत पुन्हा संघात घेण्याची संधीही मिळाली असती. विशेष म्हणजे, आगामी आयपीएलनंतर ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडविरुद्ध अ‍ॅशेस मालिकेत सहभाग असणार असल्याने ग्रीनच्या उपलब्धतेबाबतही प्रश्न निर्माण होऊ शकतात.

केकेआरसमोर कर्णधार निवडीचे मोठे आव्हान

केकेआरसाठी आगामी हंगामाची तयारी करताना कर्णधाराची निवड हा महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे. रिंकू सिंह, सुनील नरेन किंवा लिलावातून संघात येणारा एखादा अनुभवी खेळाडू, यापैकी कोणाला नेतृत्वाची संधी मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. इरफान पठाण आणि आकाश चोप्रा यांसारख्या माजी क्रिकेटपटूंनी रिंकूच्या नावाला पाठिंबा दिल्याने त्याच्या कर्णधारपदाच्या चर्चेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, अंतिम निर्णय केकेआरचे संघव्यवस्थापनच घेणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रॉय नाईक-एकनाथ शिंदे भेटीने फोंड्यात राजकीय खळबळ; महादेव नाईकही उपस्थित

World Junior Chess Champion: वय अवघे 15 वर्षे; गोव्याच्या एथन वाझने जिंकले ज्युनियर बुद्धिबळाचे जगज्जेतेपद!

IND vs NZ: आकाश दीप OUT, प्रसिद्ध कृष्णा IN! सामन्यादरम्यान टीम इंडियात मोठा बदल; कारण काय?

Goa Sports Director Transfer: क्रीडामंत्री तवडकर आणि संचालक गावडे यांच्यातील संघर्ष विकोपाला; बदलीच्या हालचाली सुरू?

IFFI 2026 Golden Peacock Award Winner: स्पेनच्या 'आक्वी'ला सुवर्णमयूर; 'रहमा'ला गांधी पुरस्कार, 'कांतारा'चीही पुरस्कारांवर मोहोर

SCROLL FOR NEXT