Brazil vs Serbia: फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 मध्ये गुरुवारी रात्री उशीरा ब्राझील विरुद्ध सर्बिया यांच्यात ग्रुप जी मधील सामना पार पडला. लुसेल स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात बलाढ्य ब्राझीलने 2-0 अशा गोलफरकाने सहज विजय मिळवत स्पर्धेत आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. ब्राझीलकडून रिचार्लिसनने दोन्ही गोल केले.
सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी खेळ चांगला दाखवला होता. त्यामुळे पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांकडून एकही गोल झाला नाही. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये मात्र ब्राझीलने सर्बियावर पूर्ण वर्चस्व राखले.
ब्राझीलकडून (Brazil) नेमार, विनिशियस ज्युनियर, राफिन्हा आणि रिचार्लिसन (Richarlison) हे चार खेळाडू फॉरवर्डला खेळत होते. त्यामुळे त्यांचे आक्रमण सर्बियावर वरचढ ठरत होते. विनिशियसचा खेळण्यातला वेगही वाखाणण्याजोगा होता. नेमार गरज पडेल तिथे खेळत असल्याने सर्बियाला ब्राझीलच्या फॉरवर्डविरुद्ध खेळताना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली.
त्याचबरोबर सर्बियाचा स्टार खेळाडू ऍलेक्झँडर मित्रोविच याच्या फिटनेसबाबत साशंकता असतानाही तो मैदानात खेळण्यासाठी उतरला होता.
दरम्यान, सामन्यातील एकूणच ब्राझीलचे पूर्ण वर्चस्व राहिल्याचे दिसले. ब्राझीलचे 59 टक्के ताबा चेंडूवर होता. तसेच पासेसमधील अजूकता ब्राझीलची 86 टक्के होती, तर सर्बियाची 80 टक्के होती.
रिचार्लिसनचा अफलातून गोल
25 वर्षीय रिचार्लिसनने 62 व्या मिनिटाला ब्राझीलसाठी पहिला गोल नोंदवला होता. यासह त्याने संघाला आघाडीही मिळवून दिली होती. पण त्यानंतर 11 मिनिटांनी म्हणजेच सामन्याच्या 73 व्या मिनिटाला त्याने केलेल्या अफलातून गोलची चर्चा अधिक झाली.
त्याने 73 व्या मिनिटाला विनिशियसने दिलेल्या पासवर शानदार ऍक्रोबायोटीक सिसर किकसह गोल करत सामन्यातील दुसरा गोल नोंदवला. त्याचा हा गोल इतका शानदार होता, की त्याचे सध्या मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
नेमार दुखापतग्रस्त
मात्र, सामन्यात विजय मिळवला असला तरी ब्राझीलला धक्का बसला आहे. त्यांचा स्टार खेळाडू नेमार (Neymar) याच्या पायाच्या घोटाला दुखापत झाली आहे. त्याची घोटाही सुजला होता. त्यामुळे आता तो पुढील सामन्यापर्यंत फिट होणार का हे पाहावे लागेल. ब्राझीलला पुढील सामना 28 नोव्हेंबरला स्वित्झर्लंड विरुद्ध खेळायचा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.