ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Australia Final:
रविवारी (19 नोव्हेंबर) वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पार पडला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने विजय मिळवला आणि वर्ल्डकपवर सहाव्यांदा नाव कोरले.
या सामन्यात भारताने 50 षटकात सर्वबाद 240 धावा केल्या होत्या. त्यानंतर 241 धावांच्या आव्हानाचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने 43 षटकात 4 विकेट्स गमावत पूर्ण केला. त्यामुळे भारताला हा सामना आणि वर्ल्डकप गमवावा लागला. पण, अंतिम सामन्यात भारताच्या पराभवाची 5 प्रमुख कारणे कोणती, यावर एक नजर टाकू.
महत्त्वाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय योग्य ठरला.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की रोहितने नाणेफेक गमावल्यानंतर त्यांना प्रथम फलंदाजीच करायची होती, कारण खेळपट्टी चांगली असल्याचे म्हटले होते. मात्र, सामना सुरु झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधाराचा निर्णय योग्य होता, हे सिद्ध होत गेले.
सुरुवातीला भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या आक्रमणानंतरही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी लय बिघडू दिली नव्हती. त्यांनी आधी अहमदाबादमध्ये दमदार रेकॉर्ड असलेल्या शुभमन गिलला अवघ्या ४ धावांवर माघारी धाडले. त्यानंतर आक्रमक खेळणाऱ्या रोहितलाही फार काळ टीकू दिले नाही. रोहितची विकेट भारताच्या डावाला वळण देणारी ठरली.
खरंतर ट्रेविस हेडने मागे पळत जाऊन सूर मारत रोहितचा अफलातून झेल घेतला होता. हा कठीण झेलने रोहितला माघारी जाण्यास भाग पाडले. पाठोपाठ ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने श्रेयस अय्यरलाही माघारी धाडले.
यानंतर मात्र, विराट कोहली आणि केएल राहुल यांची जोडी जमल्यानंतरही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी त्यांना मोठ्या धावा घेण्यापासून रोखले. ऑस्ट्रेलियाच्या अचूक गोलंदाजीमुळे भारतीय संघाला पहिल्या 10 षटकानंतर पुढच्या 40 षटकात फक्त 4 चौकार मारता आले. त्यामुळे भारतीय संघ 250 धावांचा टप्पाही पार करू शकले नाहीत.
ऑस्ट्रेलियाच्या विजयात अचूक गोलंदाजी आणि ट्रेविस हेड व मार्नस लॅब्युशेन यांच्यातील 192 धावांच्या भागीदारीबरोबरच कमालीच्या क्षेत्ररक्षणाचाही महत्त्वाचा वाटा होता.
रोहित शर्माचा झेल असो किंवा बाऊंड्री जाण्यापासून रोखलेले चेंडू असो, ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षकांनी झोकुन देत धावा रोखल्या. त्यांच्या धाडसी क्षेत्ररक्षणामुळे भारतीय संघातील खेळाडूंना धावा जमवण्यातही संघर्ष करावा लागला. ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षकांनी रोखलेल्या धावा या सामन्यात महत्त्वाच्या ठरल्या.
खरंतर भारतीय संघाने 240 धावांचा बचाव करताना चांगली सुरुवात केली होती. धोकादायक डेव्हिड वॉर्नरला मोहम्मद शमीने त्याच्या पहिल्याच चेंडूवर अवघ्या ७ धावांवर माघारी धाडले होते.
त्यानंतर जसप्रीत बुमराहने मिचेल मार्श आणि स्टीव्ह स्मिथ या प्रमुख फलंदाजांचा अडथळाही लवकर दूर केला होता. त्यामुळे एका क्षणी ऑस्ट्रेलिया 47 धावांवर 3 विकेट्स अशा कठीण परिस्थितीत अडकले होते. मात्र, त्यानंतर ट्रेविस हेडने मार्नस लॅब्युशेनला साथीला घेतले.
भारतीय गोलंदाजांनी या दोघांना नंतर काही कठीण प्रश्नही विचारले. मात्र, त्यात या दोघांनी धैर्याने फलंदाजी केली. हेडने मात्र खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर आणि दुसऱ्या बाजू लॅब्युशेनने खंबीर साथ देण्यास सुरुवात केल्यानंतर आक्रमक पवित्रा घेतला. त्याने खराब चेंडूंचा समाचार घेतला.
त्यामुळे या दोघांमध्ये तब्बल 192 धावांची भागीदारी झाली, जी ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी ठरली. हेडने 120 चेंडूत 15 चौकार आणि 4 षटकारांसह 137 धावांची खेळी केली. लॅब्युशेन 110 चेंडूत 4 चौकारांसह 58 धावांवर नाबाद राहिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.