पणजी: गोव्याविरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट सामन्यासाठी बिहार संघात नेतृत्वबदल करण्यात आला आहे. मागील तीन सामन्यातील कर्णधार सकिबुल गनी याची उपकर्णधारपदी पदावनती झाली असून फलंदाज मंगल महरौर संघाचे नेतृत्व करेल.
गोवा आणि बिहार यांच्यातील चार दिवसीय रणजी करंडक एलिट अ गट सामना २ ते ५ नोव्हेंबर या कालावधीत पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर खेळला जाईल. स्पर्धेत आतापर्यंत तिन्ही लढतीत गोवा, तसेच बिहारला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
बिहारचा मध्य प्रदेशविरुद्धचा मागील सामना इंदूर येथे अवघ्या दोन दिवसांत संपला होता. पहिल्या डावात ९९ व दुसऱ्या डावात १३४ धावांत गारद झालेल्या बिहारला मध्य प्रदेशने डाव व १७४ धावांच्या फरकाने हरविले होते. त्यापूर्वी त्यांना उत्तर प्रदेशने डाव व २६७ धावांनी, तर बडोद्याने १० विकेट्स राखून पराभूत केले होते. मंगल हा हुकमी फलंदाज असून बडोद्याविरुद्ध दुसऱ्या डावात त्याने शतक (१३८) नोंदविले होते.
गोव्याविरुद्धच्या बिहारच्या संघात २३ वर्षांखालील तिघा खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यामध्ये फलंदाज पृथ्वी राज, फिरकी गोलंदाज सुमन कुमार व वेगवान गोलंदाज वासुदेव प्रसाद यांचा समावेश आहे. सुमन कुमार याने गोव्याविरुद्ध हल्लीच राजगीर येथे झालेल्या कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट सामन्यात दुसऱ्या डावात ४४ धावांत ६ गडी बाद केले होते.
बिहारचा संघ: मंगल महरौर (कर्णधार), सकिबुल गनी (उपकर्णधार), आयुष लोहारुका, नमन गौरव, बिपिन सौरभ, श्रमन निगरोध, आकाश राज, पृथ्वी राज, खलिद आलम, सूरज कश्यप, महंमद इझहर, आमोद यादव, सुमन कुमार, वासुदेव प्रसाद सिंग, मलय राज, हिमांशू सिंग.
यापूर्वीची एकमेव लढत अनिर्णित
गोवा व बिहार यांच्यातील एकमेव रणजी सामना प्लेट गटात २०१९-२० मोसमात झाला होता. पाटणा येथील मोईन उल हक स्टेडियमवर २५ ते २८ डिसेंबर २०१९ या कालावधीत झालेला सामना अनिर्णित राहिला होता व गोव्याने पहिल्या डावात १४४ धावांची आघाडी संपादली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.