Goa Politics: काँग्रेसचा आदर्शवाद, भाजपची वास्तववादी रणनीती; गोव्याच्या राजकारणात नवी लढाई

Congress BJP Political Strategy Goa: सध्या गोव्यातील राजकारण आदर्शवाद आणि वास्तववाद (रिअलिझम) यामध्ये हेलकावे खात आहे.
Congress BJP Political Strategy Goa
Goa PoliticsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

डॉ. नाऊ वरक

सध्या गोव्यातील राजकारण आदर्शवाद आणि वास्तववाद (रिअलिझम) यामध्ये हेलकावे खात आहे. काँग्रेस लोकांसमोर आदर्शवादी नीती मांडत आहे, तर भाजप वास्तववादी व्युहरचनेकडे झुकलेला दिसतो. त्यामुळे येणारी विधानसभा निवडणूक ही ‘वास्तववाद’ विरुद्ध ‘आदर्शवाद’ अशी होणार आहे.

पूर्वी चित्रपटसृष्टीतले कलाकार जनमानसात आदर्शवाद निर्माण करायचे. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या क्रांतिवीर चित्रपटातील नाना पाटेकर यांचे अन्यायाविरुद्ध बंड पुकारणारे पात्र, १९७५ च्या आंधीमधील आरती देवी, २००१ च्या ‘नायक’ चित्रपटातील ‘शिवाजी राव गायकवाड’ अशा पात्रांनी राजकारण व प्रशासनात समाजोपयोगी बदल शक्य आहेत, असा आशावाद रुजविला. मात्र ‘बाजीराव सिंघम’, ‘चुलबुल पांडे’ किंवा ‘दसवी’ मधील ‘बिम्मो देवी’ सारख्या हिंदी चित्रपटांतील व्यक्तिरेखांनी राजकारणात आदर्शवादाची गंभीरता कमी करून ‘कृती’ महत्वाची आहे, हा वास्तववादी दृष्टिकोन लोकप्रिय केला.

Congress BJP Political Strategy Goa
Goa Politics: मगोपला 16, आरजीला 15 जागा हव्यात; भाजप-काँग्रेससमोर प्रादेशिक पक्षांचे दबावतंत्र!

राज्यकारभारात नीतीनुसार कृती अपेक्षित असते. कृतीच नीती बनते तेव्हा राज्यव्यवस्था ढासळते. फ्रान्स व पोर्तुगालमधील महागाई व निवारा टंचाई पाहता ते वास्तववादाचे दूरगामी परिणाम आहेत. त्यामुळे गोव्याला आदर्शवादाची नितांत गरज आहे. सध्या गोव्यातील राजकारण आदर्शवाद आणि वास्तववाद (रिअलिझम) यामध्ये हेलकावे खात आहे. काँग्रेस लोकांसमोर आदर्शवादी नीती मांडत आहे, तर भाजप वास्तववादी व्युहरचनेकडे झुकलेला दिसतो. त्यामुळे येणारी विधानसभा निवडणूक ही ‘वास्तववाद’ विरुद्ध ‘आदर्शवाद’ अशी होणार आहे. गोवा कसा असायला पाहिजे? याचे आदर्शवादी चित्र काँग्रेस जनतेसमोर रंगवत आहे. राहुल गांधींच्या शैलीत घेतलेल्या २६ ऑक्टोबरच्या पत्रकार परिषदेत गिरीश चोडणकर यांनी जमीन गैरव्यवहार प्रकरणे व बेरोजगारीविषयी आदर्शवादी मुद्दे मांडले.

कुठ्ठाळी येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी संबोधलेल्या गोंय राखण यात्रेच्या सभेत बिगर-कोकणी आणि बिगर-मराठी भाषिकांचा भरणा होता. गोव्यात स्थलांतरित कामगार व व्यावसायिक हा मतदार वर्ग आहे. मुरगाव तालुक्यात अशा मतदारांची संख्या लक्षणीय आहे. शिवकुमार यांनी थेट कन्नड भाषेत बोलून लोकांना चक्रावून सोडले. त्यांचे कन्नड भाषण कन्नड लोकांनी उचलून धरले. सभा यशस्वी झाल्याचे अनेकांना वाटले. सभेची गर्दी पाहून भाजपलाही धक्का बसला. दाबोळी, वास्को, मुरगाव व कुठ्ठाळी भागातील कन्नड भाषिकांना संघटित करण्याचा काँग्रेसचा हा वास्तववादी प्रयत्न होता. त्यामुळे मुरगाव तालुक्यात काँग्रेससाठी ‘गोंय विकपाक दिवचे ना!’ सारख्या आदर्शवादी घोषणा परिणामकारक ठरतील याची शाश्वती नाही. या भागातील कन्नड नेते सिद्दण्णा मेटी हे कानडी समाजाच्या आर्थिक व सामाजिक हक्कांविषयी बोलत असतात.

गोव्याच्या विकासातील त्यांचे योगदान अधोरेखित करतात. काँग्रेस व रेव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाच्या युतीवरही त्यांनी अगोदरच बोट ठेवले आहे. म्हणून काँग्रेसला आदर्शवादाकडून वास्तववादाकडे हेलपाटे मारणे फायद्याचे नाही. वास्तववादाची भाषा परिवर्तनाविषयी भीती निर्माण करते. आदर्शवादाची भाषा परिस्थितीची चीड निर्माण करते. आदर्शवादी प्रचारमोहीम जेव्हा वास्तववादाकडे झुकू लागते तेव्हा जमविलेला आदर्शवाद लोकांना फिका वाटू लागतो. आदर्शवादी राजकारण हे एक दीर्घकालीन योजना असते, वास्तववादी राजकारण हे समाजातील विविध घटकांच्या हक्क व मागण्या शीघ्ररित्या पूर्ण करण्यावर अवलंबून असते.

२५ ऑक्टोबर रोजी दाबोळी येथील सभेत प्रमोद सावंत यांनी शिवकुमार यांच्या भाषणाला ‘येंडू-गुंडू’ घोषित करून पलटवार केला. या भागात भाजप व्यापक बिगर-गोमंतकीय नेतृत्वाच्या शोधात असल्याचे जाणवू लागले आहे. २८ ऑक्टोबरला रात्री साडेअकराच्या सुमारास वास्को येथील संडे मार्केटला लागलेल्या भीषण आगीनंतर या वास्तववादाची झलक पाहायला मिळाली. प्रसारमाध्यमांवरील संडे मार्केटमधील आगीचे व्हिडीओ पाहता प्रभावितांमध्ये बरेसचे हिंदी व इतर भाषिक दिसतात. या आगीमध्ये लक्षावधींचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. या सर्व घडामोडी होत असताना चिखलीचे सरपंच व दाबोळी मतदार संघातील भाजपचे इच्छुक उमेदवार कमला प्रसाद यादव यांनी आगीत राख झालेली संपूर्ण शेड स्वखर्चाने बांधून देण्याचे आश्वासन दिले आहे. हे वास्तववादी राजकारणाचे उदाहरण आहे.

Congress BJP Political Strategy Goa
One Goa Mega Residential Project: 161 दिवसांचे आंदोलन, आता ग्रामसभेत संघर्षाची शक्यता; 'वन गोवा' प्रकल्पाचा मुद्दा तापणार

यादव यांचे हे पाऊल ‘बाजीराव सिंघम’ किंवा ‘चुलबुल पांडे’ यांच्या श्रेणीत मोडते. या एका विधानामुळे गोव्यातील बऱ्याच लोकांनी प्रामुख्याने तरुण वर्गाने त्यांच्याविषयी इंटरनेटवर शोध घेतला असेल. त्यांनी केलेली कामे तसेच त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीचाही बऱ्याचजणांनी वेध घेतला असेल. मुलांच्या क्रिकेट सरावासाठी वेर्णा येथे स्वखर्चातून बांधलेल्या ‘१९१९ स्पोर्टस क्रिकेट स्टेडियम’ या खाजगी मैदानामुळे ते प्रकाशझोतात आले होते.

आजकाल चित्रपटांतील कलाकारांप्रमाणे राजकारणीही त्यांच्या भूमिकांपेक्षा वैयक्तिक जीवनातील कृतींसाठी तरुणांमध्ये अधिक प्रसिद्ध असतात. वास्को येथील पीडितांना पाठबळ देऊन बिगर-गोमंतकीय मतदारांना भाजप पुन्हा एकदा नव्याने संघटित करणार आहे. आर्थिक आणि सामाजिक हक्क पर्यावरणापासून वेगळे केले जातात त्यावेळी राजकीय वास्तववाद उफाळून येतो. वेगवेगळे समुदाय राजकीय व्यवस्थेचे ग्राहक होतात. हक्क पाहिजे असतील तर मते द्या. हक्कांच्या बदल्यात मते दिली जातात तेव्हाच नागरिकांचा अर्थव्यवस्थेवरील ताबा सुटतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.