पणजी : कोविडच्या तिसऱ्या लाटेमुळे यंदा राज्यातील विविध क्रिकेट स्पर्धांचे आयोजन लांबणीवर पडले, नंतर फेब्रुवारी महिन्यात स्पर्धांना सुरवात झाली, पण आता पावसाने लवकर हजेरी लावल्यामुळे वेळापत्रक विस्कळित झाले. (Rain disrupts cricket in Goa)
गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) ब व क विभागीय क्रिकेट स्पर्धा, तसेच पणजी जिमखान्याच्या बांदोडकर करंडक क्रिकेट स्पर्धेला मे महिन्याच्या मध्यास झालेल्या मोसमपूर्व पावसाचा फटका बसला असून स्पर्धेतील अखेरच्या टप्प्यातील सामने रखडले आहेत.
बांदोडकर करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य लढती शुक्रवारी, तर अंतिम लढत रविवारी नियोजित होती. या लढती कांपाल येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर होणार होत्या. गुरुवारी दुपारपासून पाऊस पडत असल्यामुळे उपांत्य फेरीतील सामने आता लांबणीवर गेले आहेत. पाऊस थांबला आणि चांगले ऊन पडले, तर मंगळवारपर्यंत स्पर्धा पूर्ण करण्याचे प्रयत्न असतील. त्यानंतर मैदानाच्या निगराणीचे काम हाती घेतले जाईल, साहजिकच त्याचा परिणाम स्पर्धेतील अखेरच्या तीन सामन्यांवर निश्चितच होईल, असे बांदोडकर करंडक स्पर्धा समन्वयक प्रशांत काकोडे यांनी सांगितले.
जीसीए सामनेही पावसामुळे प्रभावित
जीसीए ब गट क्रिकेट स्पर्धेच्या तिसवाडी विभागातील शेवटचा साखळी सामना शुक्रवारी पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर होणार होता. पावसामुळे हा सामना होऊ शकला नाही. जीसीए क्रिकेट संचालक प्रकाश मयेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिसवाडी विभागीय ब गट क्रिकेट स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना, उपांत्य लढती आणि अंतिम लढत बाकी आहे. याशिवाय ब आणि क गट स्पर्धेतील राज्यस्तरीय अंतिम लढतीही बाकी आहे. ‘‘सध्या तरी पावसामुळे नियोजित वेळापत्रक फिस्कटले आहे. पाऊस थांबला आणि चांगले ऊन पडल्यास लगेच सामने खेळविण्यात येतील. पर्वरी मैदानावर पाण्याचा निचरा लगेच होतो, त्यामुळे आम्ही पाऊस थांबण्याची वाट बघत आहोत,’’ असे मयेकर यांनी सांगितले.
मैदान अनुपलब्धते सामने लांबणीवर
जीसीएच्या तिसवाडी विभागीय ब गट क्रिकेट स्पर्धेतील सामने लांबण्यास मैदान अनुपलब्धता कारणीभूत ठरली आहे. पणजीत सामन्यांच्या मैदान मिळू शकले नाही, त्यामुळे या विभागातील सामने पर्वरीत हलवावे लागले, त्यामुळेच स्पर्धेचे वेळापत्रक लांबले, अशी माहिती प्रकाश मयेकर यांनी दिली.
प्रीमियर लीग, अ गट स्पर्धा पूर्ण
स्पर्धांना उशिरा आरंभ होऊनही जीसीएने अव्वल सहा संघांची प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा, तसेच अ गट स्पर्धा पूर्ण केली. आता ब आणि क गटातील राज्यस्तरीय टप्प्यातील सामने बाकी आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.