पाकिस्तान सुपर लीग 2024 स्पर्धा अखेरच्या टप्प्यात आली आहे. या स्पर्धेत शनिवारी लाहोर कलंदर्स आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स संघात साखळी सामना पार पडला. या सामन्यात ग्लॅडिएटर्सने शेवटच्या चेंडूवर 6 विकेट्सने रोमांचक विजय मिळवला.
या विजयासह ग्लॅडिएटर्सने पीएसएल 2024 स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे. दरम्यान, या विजयानंतर ग्लॅडिएटर्सचे मेंटॉर असलेले वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू विव रिचर्ड्स हे भलतेच खूश झाले होते.
या सामन्यात कलंदर्सने ग्लॅडिएटर्ससमोर विजयासाठी 167 धावांचे आव्हान ठेवले होते, या आव्हानाचा पाठलाग करताना ग्लॅडिएटर्सला अखेरच्या चेंडूवर 4 धावांची गरज होती.
त्यावेळी कलंदर्सकडून शाहिन आफ्रिदी गोलंदाजी करत होता, तर मोहम्मद वासिम ज्युनियर फलंदाजीसाठी स्ट्राईकवर होता. त्यावेळी शाहिन आफ्रिदीकडून चूक झाली आणि त्याने अखेरचा चेंडू फुलटॉस टाकला आणि त्याचा फायदा वासिम ज्युनियरने घेतला. त्याने योग्य टायमिंग साधत खणखणीत षटकार ठोकला, ज्यामुळे चेंडू प्रेक्षकांमध्ये जाऊन पडला.
यासह ग्लॅडिएटर्सने विजय तर निश्चित करण्याबरोबरच प्लेऑफमधील स्थानही पक्के केले. या षटकारामुळे संपूर्ण ग्लॅडिएटर्स संघात आनंदाचे वातावरण पसरले. संघातील खेळाडू धावत मैदानात आले आणि त्यांनी वासिम ज्युनियरचे भरभरून कौतुक केले.
72 वर्षीय विव रिचर्ड्स यांनाही आपला आनंद लपवता आला नाही. ते देखील पळत मैदानात आले आणि त्यांनीही खेळाडूंना मिठी मारली. या क्षणांचा व्हिडिओ सध्या व्हायरल हत आहे. वय वाढल्यानंतरही रिचर्ड्स यांचा उत्साह पाहून चाहत्यांनी कौतुक केले आहे.
दरम्यान, या विजयामुळे क्वेटा ग्लॅडिएटर्स पीएसएल 2024 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ ठरला. यापूर्वी मुलतान सुलतान, इस्लामाबाद युनायटेड आणि पेशावर झालमी या संघांनी प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.