पणजी: अखिल भारतीय सबज्युनियर मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत कर्नाटकच्या तुषार सुवीर याच्यासमोर महाराष्ट्राचा तृतीय मानांकित प्रणय शेट्टीगर याचे आव्हान असेल. मुलींच्या एकेरीत तेलंगणची के. श्रेष्ठा रेड्डी व हरियानाची जिया रावत यांच्यात शनिवारी विजेतेपदासाठी लढत होईल.
दरम्यान, स्पर्धा नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये सुरू आहे. शुक्रवारी मुलांच्या एकेरीत तुषारने सनसनाटी विजय नोंदविले. अगोदर त्याने उत्तराखंडचा चौथा मानांकित ध्रुव नेगी याला पराभवाचा धक्का दिला. नंतर उपांत्य लढतीत राजस्थानचा अव्वल मानांकित संस्कार सारस्वत याच्यावर २१-१३, २१-१८ असा धक्कादायक विजय नोंदवून आगेकूच राखली. अन्य उपांत्य लढतीत प्रणय याने हरियानाच्या गगन याच्यावर २१-११, २१-७ फरकाने मात केली.
तसेच, आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) नव्या कांदेरी हिने अगोदरच्या लढतीत आंतरराष्ट्रीय खेळाडू उन्नती हुडा हिला नमविले होते, पण उपांत्य लढतीत तिची मात्रा चालली नाही. तेलंगणच्या श्रेष्ठा हिने तिच्यावर २१-१६, १४-२१, २१-१२ अशी मात केली. दुसऱ्या उपांत्य लढतीत सातव्या मानांकित जिया हिने गुजरातच्या ऐशानी तिवारी हिला २१-१७, २१-८ असे हरविले.
अभिनव-प्रतीक लढत
मुलांच्या १५ वर्षांखालील एकेरीत नववा मानांकित अभिनव गर्ग व प्रतीक कौंडिल्य या कर्नाटकच्या (Karnataka) खेळाडूंत विजेतेपदासाठी लढत होईल. उपांत्य फेरीत अभिनवने आसामच्या रितोम हौबोरा याच्यावर २१-१२, २१-१६ असा, तर प्रतीकने आसामच्याच मोनार्क बोर्गोहेन याच्यावर २१-१२, २१-११ असा विजय प्राप्त केली.
नैशा, तन्वी अंतिम फेरीत
मुलींच्या १५ वर्षांखालील एकेरीत महाराष्ट्राची अव्वल मानांकित नैशा कौर भटोये व तेलंगणाची (Telangana) पाचवी मानांकित तन्वी रेड्डी अंदलुरी यांनी अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीत नैशा हिने गुजरातच्या २१-१५, २१-१८ असे, तर तन्वीने पंजाबच्या तन्वी शर्मा हिला २१-१५, २१-१९ असे हरविले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.