NZ vs PAK: शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या सलग चौथ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. चौथ्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला. डॅरिल मिचेल नाबाद 72 आणि ग्लेन फिलिप्सच्या नाबाद 70 धावांच्या जोरावर न्यूझीलंडने शुक्रवारी चौथ्या टी-20 सामन्यात पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला.
दरम्यान, 159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडला पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सुरुवातीलाच 20 धावांत तीन विकेट्स घेत मोठा धक्का दिला होता, पण किवी संघाचे मधल्या फळीतील फलंदाज ग्लेन फिलिप्स आणि डॅरिल मिशेल यांनी शाहीन आफ्रिदीच्या धक्क्यातून सावरुन तूफानी फलंदाजी केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 139 धावांची शानदार भागीदारी केली. विशेष म्हणजे, या दोघांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंड संघाने 18.1 षटकात तीन गड्यांच्या मोबदल्यात 159 धावा केल्या आणि सात गडी राखून विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने मालिकेत 4-0 अशी आघाडी घेतली आहे.
दुसरीकडे, ग्लेन फिलिप्सने 52 चेंडूत तीन षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने नाबाद 70 धावा केल्या तर डॅरिल मिशेलने 44 चेंडूत नाबाद 72 धावा केल्या आणि आपल्या डावात दोन षटकार आणि सात चौकार लगावले. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने तीन बळी घेतले. पहिल्यांदा फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर सॅम अयुब धावबाद झाला. यानंतर बाबर आझम 19 धावा करुन बाद झाला. तर फखर जमान मोठे फटके मारण्याच्या नादात आऊट झाला.
मात्र, यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने शानदार प्रदर्शन करत 38 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. त्याने बाबरसोबत दुसऱ्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. त्याने इफ्तिखार अहमदसोबतही पाचव्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी केली. रिझवानने आपल्या खेळीत 63 चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 90 धावा केल्या. पाकिस्तानने निर्धारित 20 षटकात 5 विकेट गमावत 158 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री आणि लॉकी फर्ग्युसनने 2-2 विकेट घेतल्या. अॅडम मिल्नेने एका फलंदाजाला बाद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.