Mohammad Rizwan short run without bat during New Zealand vs Pakistan 3rd T20I match:
पाकिस्तानचा संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात पाकिस्तान न्यूझीलंडविरुद्ध 5 सामन्यांची टी20 मालिका खेळत असून त्यांना पहिल्या तिन्ही सामन्यात पराभवाचा धक्का बसला आहे. तिसरा सामना ड्युडेडिनला पार पडला. या सामन्यात पाकिस्तान यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानच्या बाबतीत एक दुर्मिळ गोष्ट पाहायला मिळाली.
झाले असे की न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर तिसऱ्या टी20 सामन्यात 225 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने सलामीवीर सईम आयुबची विकेट लवकर गमावली होती. त्यामुळे डाव सांभाळण्याची जबाबदारी मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांच्यावर होती.
हे दोघे फलंदाजी करत असताना मॅट हेन्रीने गोलंदाजी केलेल्या 6 व्या षटकात पाचव्या चेंडूवर रिझवानने डीप मिड-विकेटच्या दिशेने शॉट खेळला. पण हा शॉट खेळताना त्याचा तोल गेला आणि त्यात त्याच्या हातून त्याची बॅट सटकली. मात्र भान राखत तो धाव घेण्यासाठी धावला.
त्याने दुसरी धाव घेण्याचाही विचार करताना घाईत हात नॉन-स्ट्रायकरच्या क्रिजमध्ये लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने क्रिजच्या लाईनला हात लावला असल्याचा विचार करत तो दुसऱ्या धावेसाठी धावला. त्यावेळी दुसरी धाव पूर्ण करण्यासाठी त्याने स्ट्रायकर एन्डला डाईव्ह देखील मारली. त्यामुळे धावबाद होण्यापासून तो वाचला.
मात्र नंतर रिप्लेमध्ये दिसले की रिझवानने पहिली धाव घेताना जेव्हा नॉन-स्ट्रायकरच्या क्रिजच्या लाईनला हात लावला होता, तेव्हा काही सेंटीमीटरचे त्यात अंतर राहिले. त्यामुळे ही धाव शॉर्ट रन म्हणून घोषित करण्यात आली. त्यामुळे रिझवानला एकच धाव मिळाली. त्याने शॉर्ट रन घेतल्याचे पाहून तो देखील आश्चर्यचकीत झाला होता.
दरम्यान, या सामन्यात रिझवान 24 धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर बाबर आझमने अर्धशतक केले. मात्र त्याला अन्य खेळाडूंकडून फारशी साथ मिळाली नाही. बाबरने 37 चेंडूत 58 धावांची खेळी केली.
त्याच्यानंतर मोहम्मद नवाझने 28 धावा केल्या. पण बाकी कोणाला 20 धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. त्यामुळे पाकिस्तानला 225 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 20 षटकात 7 बाद 179 धावाच करता आल्या. त्यामुळे न्यूझीलंडने हा सामना 45 धावांनी जिंकला.
दरम्यान, या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडकडून फिन ऍलेनने 62 चेंडूत 5 चौकार आणि 16 षटकारांसह 137 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडने 20 षटकात 7 बाद २२४ धावा उभारल्या होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.