IPL 2023 Playoff Equation for RCB, MI and RR: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी (20 मे) चेन्नई सुपर किंग्सने 77 धावांनी दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केले, तसेच लखनऊ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सला 1 धावेने पराभूत केले. त्यामुळे चेन्नई आणि लखनऊ या संघांनी प्लेऑफमध्ये थेट प्रवेश मिळवला.
गुजरात टायटन्स संघाने यापूर्वीच गुणतालिकेतील पहिले स्थान पक्के करत प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर चेन्नई आणि लखनऊ गुणतालिकेत प्रत्येकी 17 गुण मिळवत नेट रन रेटच्या फरकामुळे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यामुळे आता केवळ प्लेऑफसाठी एक जागा शिल्लक आहे.
प्लेऑफच्या अखेरच्या जागेसाठी सध्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या 3 संघात स्पर्धा आहे. सध्या गुणतालिकेत बेंगलोर चौथ्या क्रमांकावर, राजस्थान रॉयल्स पाचव्या आणि मुंबई इंडियन्स सहाव्या क्रमांकावर आहे. या तिन्ही संघांचे सध्या 14 गुण आहेत.
पण बेंगलोर आणि मुंबई संघांसाठी जमेची बाजू म्हणजे त्यांचे अद्याप साखळी फेरीतील अखेरचे सामने बाकी आहेत. राजस्थानचे मात्र, सर्व 14 साखळी सामने खेळून झाल्याने त्यांचे प्लेऑफमधील समीकरण मुंबई आणि बेंगलोर यांच्यावर अवलंबून आहे.
रविवारी (21 मे) बेंगलोरला गुजरात टायटन्स विरुद्ध सामना खेळायचा आहे, तसेच मुंबई इंडियन्सला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामना खेळयचा आहे. मुंबई आणि हैदराबाद यांच्यातील सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होणार आह, तर बेंगलोर आणि गुजरात यांच्यातील सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे.
प्लेऑफमधील स्थान मिळवायचे असेल, तर अखेरच्या साखळी सामन्यांमध्ये मुंबई आणि बेंगलोर यांना विजय मिळवावा लागणार आहे. तसेच जर रविवारी मुबंई आणि बेंगलोर हे दोन्ही संघ आपापले सामने जिंकले, तर प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी या दोन्ही संघांच्या नेट रन रेटमधील फरक लक्षात घेतला जाणार आहे. तसेच राजस्थानचे आव्हान मात्र संपुष्टात येईल.
पण, जर रविवारी मुंबई किंवा बेंगलोर यांच्यातील एकाच संघाला विजय मिळवता आला आणि एका संघाने पराभव स्विकारला, तर जो संघ विजय मिळवेल, तो थेट प्लेऑफमध्ये प्रवेश करेल. तसेच पराभव स्विकारणाऱ्या संघाचे आणि राजस्थान रॉयल्सचे आव्हान संपुष्टात येईल.
मात्र, जर मुंबई आणि बेंगलोर या दोन्ही संघांना रविवारी त्यांच्या सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागला, तर मुंबई, बेंगलोर आणि राजस्थान या तिन्ही संघांचे 14 गुण राहतील. त्यामुळे मग नेट रन रेटच्या फरकानुसार प्लेऑफमध्ये जाणारा अखेरचा संघ निश्चित होणार आहे.
ही समीकरणे लक्षात घेता मुंबई आणि बेंगलोर रविवारच्या सामन्यात आपल्या विजयाचीच आणि एकमेकांच्या पराभवाची अपेक्षा करतील. तसेच राजस्थानला मात्र आशा असेल की मुंबई आणि बेंगलोर यांनी आपापले अखेरचे साखळी सामने मोठ्या फरकाने पराभूत व्हावेत. जेणे करून राजस्थान प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकतील.