Mumbai City FC
Mumbai City FC Dainik Gomantak
क्रीडा

मुंबई सिटीने एटीके मोहन बागानचा उडवला धुव्वा

किशोर पेटकर

पणजी: इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमात मागील पराभवातून सावरलेल्या गतविजेत्या मुंबई सिटी एफसीने (Mumbai City FC) बुधवारी झंझावाती खेळ केला. त्यांनी गतउपविजेत्या एटीके मोहन बागानची (ATK Mohan Bagan) विजयी कूच रोखताना 5-1 फरकाने धुव्वा उडविला. त्याने 19 वर्षीय युवा आघाडीपटू विक्रम प्रताप सिंग (Vikram Pratap Singh) याने नोंदविलेले दोन गोल उल्लेखनीय ठरले.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम झालेल्या लढतीत विक्रम प्रताप सिंगने आयएसएलमधील गोलखाते उघडताना पहिला गोल चौथ्या, तर दुसरा गोल 25व्या मिनिटास केला. नंतर स्पॅनिश आघाडीपटू इगोर आंगुलो याने सेटपिसेसवर 38व्या मिनिटास मुंबई सिटीची आघाडी 3-0 अशी मजबूत केली. 46व्या मिनिटास एटीके मोहन बागानला जबर धक्का बसला. दीपक टांग्री याला रेड कार्ड मिळाल्यामुळे एक खेळाडू कमी झाला आणि उत्तरार्धात कोलकात्याच्या संघाला 10 खेळाडूंसह खेळावे लागले. यंदाच्या स्पर्धेतील हे पहिले रेड कार्ड ठरले.

सेनेगलचा बचावपटू मुर्तदा फॉल याने सेटपिसेसवर भेदक हेडिंग साधत मुंबई सिटीची आघाडी 4-0 अशी वाढविली. विक्रम प्रताप सिंगच्या दोन गोलसाठी असिस्ट केलेल्या बिपिन सिंगने 52व्या मिनिटास डेस बकिंगहॅम यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला 5-0 असे एकतर्फी वर्चस्व मिळवून दिले. एटीके मोहन बागानचा बदली खेळाडू ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड विल्यम्स याने 60व्या मिनिटास संघाची पिछाडी एका गोलने कमी केली.

मुंबई सिटीने नव्या मोसमाची सुरवात दणक्यात करताना एफसी गोवास 3-0 फरकाने हरविले होते, मात्र दुसऱ्या लढतीत त्यांना हैदराबाद एफसीने 3-1 फरकाने पराभवाचा झटका दिला. पुन्हा एकदा विजयी चव चाखत त्यांनी तीन लढतीत दोन सामने जिंकत गुणसंख्या सहावर नेली आहे. अंतोनियो लोपेझ हबास यांच्या मार्गदर्शनाखालील एटीके मोहन बागानने लागोपाठ दोन सामने जिंकताना अनुक्रमे केरळा ब्लास्टर्स (4-2) व ईस्ट बंगालला (3-0) हरविले होते, मात्र आजच्या पराभवामुळे त्याचे विमान जमिनीवर आले. त्यामुळे तीन लढतीनंतर सहा गुण कायम राहिले. मुंबई सिटीचा हा एटीके मोहन बागानवरील सलग दुसरा विजय ठरला. गतमोसमात अंतिम लढतीत फातोर्डा येथेच मुंबई सिटीने कोलकात्याच्या संघावर 2-1 फरकाने जिंकून आयएसएल करंडक पटकाविला होता.

गोल अर्धशतक!

आयएसएल स्पर्धेच्या आठव्या मोसमातील 14व्या सामन्यात गोलचे अर्धशतक साजरे झाले. स्पर्धेत आतापर्यंत 54 गोलची नोंद झाली आहे. ओडिशाचे स्पॅनिश खेळाडू अरिदाई सुवारेझ व हावी हर्नांडेझ, तसेच मुंबई सिटीचा स्पॅनिश इगोर आंगुलो यांनी प्रत्येकी 3 गोल नोंदविले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Gas Leakage: गॅस बंद न करता झोपी गेले; वास्कोत गुदमरुन वाराणसीच्या एकाचा मृत्यू, तिघे अत्यवस्थ

Netravali: नेत्रावळीत शिकार पार्टीचे नियोजन भोवले; कदंबच्या 16 कर्मचाऱ्यांना काडतूससह रंगेहाथ पकडले

तेलंगणात 2.07 कोटी गोवा बनावटीचे मद्य जप्त; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेशात दारु तस्करी

UP Crime: गर्लफ्रेन्डचे गोव्याला जाण्याचे स्वप्न पूर्ण करणं आलं अंगलट; सहा महिने वाचवलेले पैसे पाण्यात

Nuvem Accident : नुवेत कारच्या धडकेने दुचाकीस्‍वाराचा मृत्यू

SCROLL FOR NEXT