पणजी: तब्बल दहा गोल झालेल्या इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल सामन्यात मंगळवारी ओडिशा एफसी (Odisha FC) संघ वरचढ ठरला. त्यांनी आठव्या मोसमातील सलग दुसरा विजय नोंदविताना ईस्ट बंगालला पिछाडीवरून 6-4 फरकाने हरविले. वास्को येथील टिळक मैदानावर झालेल्या लढती गोलची बरसात झाली. त्यात दोन्ही संघांच्या मिळून एकूण सात खेळाडूंनी गोल केले. त्यापैकी सहा गोल बदली खेळाडूंद्वारे झाले. पूर्वार्धात ओडिशा संघ 3-1 फरकाने आघाडीवर होता. सलग दुसऱ्या विजयामुळे ओडिशा एफसीचे आता सहा गुण झाले आहेत. त्यांनी गुणतक्त्यात एटीके मोहन बागान व चेन्नईयीन एफसीला गाठले आहे. तिसऱ्या लढतीत दुसरा सामना गमवावा लागल्यामुळे ईस्ट बंगालचा एक गुण कायम राहिला.
ओडिशा एफसीसाठी हेक्टर रोदास व बदली खेळाडू अरिदाई सुवारेझ यांनी प्रत्येकी दोन, तर हावी हर्नांडेझ व इसाक वनलालरुआतफेला यांनी प्रत्येकी एक गोल केला. ईस्ट बंगालतर्फे डॅनियल चिमा चुक्वू याने दोन, तर डॅरेन सिडोल व बदली थोंगखोसिएम (सेम्बाई) हाओकिप यांनी प्रत्येकी एक गोल केला. नेदरलँड्सच्या सिडोल याने 13व्या मिनिटास ईस्ट बंगालला आघाडीवर नेल्यानंतर, स्पेनच्या हेक्टर रोदास याने अनुक्रमे 33 व 40व्या मिनिटास गोल करून ओडिशाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. स्पॅनिश हावी हर्नांडेझ याने यंदाच्या स्पर्धेतील तिसरा गोल करताना 45व्या मिनिटास ओडिशाची आघाडी 3-1 अशी भक्कम केली.
बदली स्पॅनिश खेळाडू अरिदाई याने 71व्या मिनिटास ओडिशाची आघाडी 4-1 अशी वाढविली. बदली खेळाडू हाओकिप याने 80व्या मिनिटास ईस्ट बंगालची पिछाडी 2-4 अशी कमी केल्यानंतर पुढील चार मिनिटांत आणखी चार गोल झाले. 20 वर्षीय बदली खेळाडू इसाक वनलालरुआतफेला याने आयएसएल स्पर्धेतील वैयक्तिक पहिला गोल करताना 82व्या मिनिटास ओडिशाची आघाडी 5-2 अशी मजबूत केली. नंतर एका मिनिटास नायजेरियन डॅनियल चुक्वू याने 90व्या आणि नंतर पेनल्टी फटक्यावर 90+2 व्या मिनिटास गोल केल्यामुळे ईस्ट बंगालची पिछाडी 4-5 अशी कमी झाली आणि बरोबरीची संधी निर्माण झाली. मात्र अरादाई याने सामन्यातील वैयक्तिक दुसरा आणि यंदाच्या स्पर्धेतील तिसरा गोल नोंदवत 90+4 व्या मिनिटास ओडिशा एफसीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.