India vs England, 1st Test at Hyderabad:
भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंडविरुद्ध रविवारी (28 जानेवारी) चालू कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने भारताला 28 धावांनी पराभूत करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
या सामन्यात भारतासमोर इंग्लंडने 231 धावांचे आव्हान ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाचा दुसरा डाव 69.2 षटकात 202 धावांवर संपुष्टात आला.
या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 64.3 षटकात सर्वबाद 246 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने 121 षटकात सर्वबाद 436 धावा करत 190 धावांची आघाडी घेतली होती.
परंतु, इंग्लंडने दुसऱ्या डावात 190 धावांची आघाडी भरून काढण्याबरोबरच 102.1 षटकात 420 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्यांना भारतासमोर 231 धावांचे आव्हान ठेवता आले. दरम्यान, इंग्लंडच्या या विजयात कोणत्या 5 खेळाडूंची कामगिरी सर्वात महत्त्वाची ठरली, याचा आढावा घेऊ.
इंग्लंडकडून सलामीला फलंदाजी केलेल्या बेन डकेट आणि झॅक क्रावली या दोघांनी मोठ्या खेळी केल्या नसल्या, तरी त्यांनी दोन्ही वेळी संघाला सुरुवात चांगली करून दिली होती. त्यांनी सुरुवातीची महत्वाची षटके खेळून काढले होते.
त्यांनी पहिल्या डावात 55 धावांची आणि दुसऱ्या डावात 45 धावांची भागीदारी सलामीला केली. त्यामुळे अगदीच सुरुवातीला इंग्लंडला धक्का न बसल्याने नंतर डाव स्थिरावत नेण्यास अन्य फलंदाजांना मदत झाली.
डकेटने पहिल्या डावात 35 आणि दुसऱ्या डावात 47 धावांची खेळी केली. तसेच क्रावलीने पहिल्या डावात 20 आणि दुसऱ्या डावात 31 धावांवर बाद झाला.
इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुट हा एक चांगला पार्ट-टाईम फिरकीपटू आहे. याचीच प्रचिती त्याने हैदराबाद कसोटीत दिली. त्याने या सामन्यात फलंदाजीपेक्षा गोलंदाजीत मोठे योगदान दिले. त्याने मोक्याच्या क्षणी संघाला विकेट मिळवून दिली.
त्याच्यामुळे इंग्लंडला गोलंदाजीतील एक्स फॅक्टर मिळाला होता. रुटने पहिल्या डावात इंग्लंडसाठी सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. या 4 विकेट्समध्ये यशस्वी जयस्वाल, रविंद्र जडेजा, केएस भरत यांच्या विकेट्सचा समावेश होता.
तसेच त्याने दुसऱ्या डावातही महत्त्वाच्या क्षणी जेव्हा केएल राहुल आणि अक्षर पटेल यांच्यात चांगली भागीदारी होत असताना विकेट घेतली. त्याने केएल राहुललाच पायचीत पकडले.
इंग्लंडचा तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज ऑली पोपला पहिल्या डावात काही करता आले नव्हते, तो एक धावेवरच बाद झालेला. परंतु, दुसऱ्या डावातील त्याची कामगिरी सर्वात महत्त्वाची ठरली. 190 धावांची पिछाडी स्विकारल्यानंतर इंग्लंडला किमान एकातरी मोठ्या खेळीची गरज होती. हीच गरज पोपने पूर्ण केली.
त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दुसऱ्या बाजूने येणाऱ्या प्रत्येक फलंदाजांच्या साथीने इंग्लंडचा डाव उभारण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, त्याने 278 चेंडूत 21 चौकारांसह 196 धावा केल्या. त्याचे द्विशतक 4 धावांनी हुकले. पण त्याच्या या खेळीमुळे इंग्लंडला भारतासमोर चांगले लक्ष्य ठेवता आले.
त्याच्याच रुपात इंग्लंडने दुसऱ्या डावात अखेरची विकेट गमावली. त्यामुळे त्याने शेवटपर्यंत फलंदाजी करताना इंग्लंड या सामन्यात कायम राहिल याची काळजी घेतली. त्याच्या याच खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सची कामगिरीही या सामन्यात महत्त्वाची ठरली. स्टोक्स पहिल्या डावात इंग्लंडने 121 धावांवर 4 विकेट्स गमावल्या असताना फलंदाजीला उतरला होता.
त्याने आक्रमक खेळताना 88 चेंडूत सर्वाधिक 70 धावांची खेळी केली आहे. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याच्या या खेळीच्या मदतीने इंग्लंडला 246 धावांपर्यंत पोहचता आले होते.
इतकेच नाही, तर दुसऱ्या डावात महत्त्वाच्या वेळी त्याने रविंद्र जडेजाला स्टंपवर अचूक थ्रो करत धावबाद केले होते. त्यामुळे आधीच भारतीय संघ संकटात असताना जडेजा 2 धावांवरच धावबाद झाल्याने भारतावरील दबाव आणखी वाढला.
या सामन्यातून पदार्पण केलेल्या टॉम हार्टलीने शानदार गोलंदाजी प्रदर्शन केले. त्याने त्याच्या फिरकीने भारतीय फलंदाजांना चांगलेच सतावले, विशेषत: दुसऱ्या डावात. अनुभवी जॅक लीचची साथ मिळत असताना आणि जो रुटही चांगली साथ देत असताना हार्टली आपलेही महत्त्वाचे योगदान दिले.
त्याने पहिल्या डावात केएल राहुल आणि शुभमन गिल यांच्या महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या, तर दुसऱ्या डावात त्याने अक्षरश: भारतीय फलंदाजांना हैराण केले. त्याने दुसऱ्या डावात 7 विकेट्स घेत भारतीय डावाला खिंडार पाडले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.