IPL 2023: आयपीएल 2023 च्या हंगामातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्ससमोर 179 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र हार्दिकच्या गुजरातने हे लक्ष्य पार केले. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने धोनीच्या CSK ला पराभूत केले.
दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्जकडून सलामीवीर ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 92 धावांची खेळी खेळली. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 9 षटकार मारले.
त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 7 चेंडूत नाबाद 14 धावा करत शानदार फिनिशिंग केली.
महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) आपल्या खेळीत 1 षटकार आणि 1 चौकार लगावला. महेंद्रसिंग धोनीने जोशुआ लिटलच्या शेवटच्या षटकात 13 धावा काढल्या.
महेंद्रसिंग धोनीने आयपीएल सामन्यांमध्ये शेवटच्या षटकात सर्वाधिक षटकार मारल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते.
आतापर्यंत महेंद्रसिंग धोनीने शेवटच्या षटकात म्हणजेच डावाच्या 20 व्या षटकात 53 षटकार मारले आहेत. या यादीत महेंद्रसिंग धोनीच्या जवळपासही कोणीही नाही.
आयपीएल सामन्यांमध्ये डावाच्या 20 व्या षटकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू कायरन पोलार्ड महेंद्रसिंग धोनीनंतर दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 20 व्या षटकात 33 षटकार मारले आहेत, तर तिसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्जचा रवींद्र जडेजा आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या रवींद्र जडेजाने आयपीएलमध्ये शेवटच्या षटकात 26 षटकार ठोकले आहेत.
या यादीत हार्दिक पांड्या चौथ्या क्रमांकावर आहे. हार्दिक पांड्याने 25 षटकार मारले आहेत. तर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा पाचव्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माच्या नावावर 23 षटकार आहेत.
अशा प्रकारे महेंद्रसिंग धोनी, कायरन पोलार्ड, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा हे आयपीएलमध्ये शेवटच्या षटकात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या टॉप-5 खेळाडूंच्या यादीत आहेत.
दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या शानदार खेळीमुळे 20 षटकांत 178 धावा केल्या. पण गुजरातने अखेरच्या षटकात 5 बाद 182 धावा करत सामना जिंकला.
त्याचबरोबर, एकाच आयपीएल (IPL) संघाकडून 200 पेक्षा जास्त षटकार मारणारा धोनी पाचवा खेळाडू ठरला आहे. त्याने सीएसकेकडून 200 षटकार पूर्ण केले आहेत.
यापूर्वी ख्रिस गेल (239 षटकार), एबी डिव्हिलियर्स (238 षटकार) आणि विराट कोहली (218 षटकार) या तिघांनीही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी 200 पेक्षा अधिक षटकार मारले आहेत. तसेच कायरन पोलार्डने मुंबई इंडियन्ससाठी 223 षटकार ठोकले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.